आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाचा एक नियम मोडून शम्मी कपूर यांनी थाटले होते लग्न, कमी वयातच झाले पत्नीचे निधन, या कारणाने लागली होती करिअरला उतरती कळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः पृथ्वीराज कपूर यांचे चिरंजीव आणि शो मॅन राज कपूर यांचे धाकटे भाऊ शम्मी कपूर यांची रविवारी (21 ऑक्टोबर) रोजी 87वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. 21 ऑक्टोबर 1931 रोजी मुंबईत जन्मलेल्या शम्मी कपूर यांच्या अभिनय आणि स्टाइलसोबतच त्यांच्या अफेअरचे किस्से प्रसिद्ध आहेत. त्यांनी गुपचुप गीता बालीसोबत लग्न केले होते. 1965 मध्ये वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी त्यांचे निधन झाले होते. पत्नीच्या निधनाने शम्मी कपूर कोलमडून गेले होते. त्यांनी स्वतःकडे लक्ष देणे सोडून दिले होते. त्यामुळे त्यांचे वजन खूप वाढले. वाढलेल्या वजनामुळे हीरो म्हणून त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली आणि हळूहळू त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले होते. 


घरच्यांच्या दबावामुळे एका अटीवर दुस-या लग्नासाठी तयार झाले होते शम्मी...

शम्मी आणि गीता यांची दोन मुले मुलगा आदित्य आणि मुलगा कंचन खूप लहान होते. त्यामुळे कुटुंबीय त्यांच्यावर दुस-या लग्नासाठी दबाव टाकत होते. शम्मी मात्र दुस-या लग्नासाठी तयार नव्हते. पण अखेर त्यांना कुटुंबीयांच्या हट्टापुढे हार पत्करावी लागली आणि ते लग्नासाठी तयार झाले. गीता बाली यांच्या निधनाच्या चार वर्षांनी 1969 मध्ये त्यांनी भावनगरच्या रॉयल फॅमिलीतील नीला देवी यांच्यासोबत दुसरे लग्न केले. पण लग्नाच्या वेळी त्यांनी नीला यांच्यासमोर अट ठेवली की, त्या कधीही आई होऊ शकणार नाहीत. गीता यांच्या मुलांनाच त्यांना स्वतःची मुले मानावी लागतील. नीला देवी यांनी शम्मी यांची अट मान्य केली आणि आयुष्यभर स्वतःचे बाळ होऊ दिले नाही. नीला यांनी गीता यांच्या मुलांचे स्वतःच्या मुलांप्रमाणे पालनपोषण केले.

 

शम्मी यांनी स्वतःपेक्षा वयाने मोठ्या गीतासोबत गुपचुप केले होते लग्न...

गीता बाली आणि शम्मी कपूर यांची लव्ह स्टोरी 'रंगीला रतन'च्या चित्रीकरणावेळी सुरु झाली होती. ही 1955 ची गोष्ट आहे. शम्मी आणि गीता एकमेकांना पसंत करु लागले होते. त्याकाळी कपूर घराण्याचा नियम होता की, घरातील कुणीही अभिनेत्रीसोबत लग्न करणार नाही. पण शम्मी यांनी कपूर घराण्याचा हा नियम मोडित काढला आणि दोघांनी गुपचुप लग्न केले. गीता बाली शम्मी यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. दोघांच्या पहिल्या भेटीच्या चार महिन्यांची त्यांनी मुंबईतील एका मंदिरात गुपचुप लग्न केले आणि त्यानंतर कुटुंबीयांना सांगितले होते.

 

कुटुंबीयांनी बोलणे टाकून दिले होते....
शम्मी कपूर यांनी जेव्हा त्यांच्या लग्नाविषयी कुटुंबीयांना सांगितले, तेव्हा सगळेच त्यांच्यावर नाराज झाले आणि त्यांनी त्यांच्याशी बोलणे बंद केले होते. पण कालांतराने परिस्थिती सावरली. त्यांची मुले आदित्य राज कपूर आणि कंचनचा जन्म झाला. आदित्य राज कूपरला फिल्म इंडस्ट्रीत लाँच करण्यात आले, पण त्याला यश मिळाले नाही. तर मुलगी कंचनचे लग्न मनमोहन देसाईंचा मुलगा केतन देसाईसोबत झाले.


मुमताजसोबत करायचे होते शम्मी कपूरला लग्न...
मुमताज 18  वर्षांची असताना शम्मी कपूर यांनी त्यांना लग्नाची मागणी घातली होती. त्याकाळी मुमताजही शम्मी कपूर यांच्यावर प्रेम करायची. करिअर सोडून मुमताजने लग्न करावे आणि संसारात रमावे, अशी शम्मी यांची इच्छा होती. पण मुमताज फिल्मी करिअर सोडू इच्छित नव्हती. त्यामुळे तिने शम्मी यांना लग्नासाठी नकार दिला आणि दोघांचे मार्ग विभक्त झाले. दोघांनी 'ब्रह्मचारी' या एकमेव चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील मुमताज-शम्मी यांच्यावर चित्रीत झालेले  'आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान...' हे गाणे प्रचंड गाजले होते. शम्मी यांचे नाव नंतर राजश्रीसोबतही जोडले गेले.

 

वयाच्या 22 व्या वर्षी चित्रपटांत आले होते शम्मी...
शम्मी कपूर यांनी वयाच्या 22 व्या वर्षी 'जीवन ज्योति' (1953) या चित्रपटाद्वारे अभिनय करिअरला सुरुवात केली होती. 'नकाब' (1954), 'हम सब चोर है' (1956), 'उजाला' (1958), 'एन इवनिंग इन पेरिस' (1967), 'प्रिंस' (1968), 'सच्चाई' (1969), 'अंदाज' (1970), 'पगला कहीं का' (1970) सह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. गाणे वाजताच शम्मी थिरकू लागायचे, त्यामुळे त्यांना कोरिओग्राफरची गरज पडत नसे. 

 

बातम्या आणखी आहेत...