Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | sharad pawar and mhada loksabha seat politics

शरद पवारांनी एकाच दगडात मारले दोन पक्षी!

प्रतिनिधी | Update - Mar 13, 2019, 09:27 AM IST

पार्थसाठी माढ्याबाबत लवचिक भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी अहमदनगरबाबत मात्र ताठर भूमिका घेत आपल्या दोन प

  • sharad pawar and mhada loksabha seat politics

    नांदेड - पार्थसाठी माढ्याबाबत लवचिक भूमिका घेणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी अहमदनगरबाबत मात्र ताठर भूमिका घेत आपल्या दोन परंपरागत राजकीय वैमनस्य असणाऱ्या घराण्यांना अडचणीत आणले आहे. शरद पवार एकाच दगडात दोन पक्षी मारतात असे नेहमीच म्हटले जाते. त्यांची आताची राजकीय खेळी ही त्याचेच द्योतक आहे.


    राज्याच्या राजकारणात काही घराण्यांचे राजकीय हाडवैर हे जगजाहीर आहे. त्यात वसंतदादा पाटील-राजारामबापू पाटील, शंकरराव चव्हाण-शरद पवार, शरद पवार-शंकरराव बाजीराव पाटील अशी काही घराणे आहेत. एका व्यासपीठावर आल्यानंतर हे राजकीय नेते अत्यंत गोडीगुलाबीने वागताना दिसून येत. परंतु जेथे राजकीय पत्ता कापण्याची संधी मिळेल तेव्हा हेच राजकारणी एकमेकांना शह-काटशह देत असत. बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांचे राजकीय वैमनस्य जगजाहीर आहे. या वैमनस्याने न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले आहेत. त्यामुळे विखे पाटलांना अडचणीत आणण्याची संधी शरद पवार सोडणे शक्य नव्हतेच. पार्थ निवडणूक लढणार नाही, असे ठासून सांगणाऱ्या शरद पवारांनी शेवटी यू टर्न घेत माढ्यातून पार्थसाठी माघार घेतली. परंतु नगर राष्ट्रवादीचेच आहे असे म्हणत ते शेवटपर्यंत त्यावर ठाम राहिले. शरद पवारांच्या या ताठर भूमिकेमुळेच अखेर विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या मुलाला भारतीय जनता पक्षात प्रवेश करावा लागला. सुजय भाजपत गेल्याने राधाकृष्ण विखे पाटील राजकीयदृष्ट्या अत्यंत अडचणीत आले आहेत. त्यांना आता भाजपवर टीका करण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली. त्यात तथ्य आहेच. परंतु पक्षांतर्गतही त्यांना आब राखणे कठीण होणार आहे.


    अशोक चव्हाणही अडचणीत
    शंकरराव चव्हाण आणि बाळासाहेब विखे पाटील यांचे संबंध अत्यंत जवळचे होते. शंकररावांच्या अडचणीच्या काळातही विखे पाटील त्यांच्यासोबतच राहिले. १९७८ मध्ये शंकरराव चव्हाणांनी महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस काढली. त्यात बोटावर मोजण्याएवढे जे नेते सहभागी झाले त्यात बाळासाहेब विखे पाटील होते. चव्हाण घराण्याचे हेच संबंध आजही कायम आहेत. अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष आहेत तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत. विरोधी पक्षनेतेपदी असणाऱ्या काँग्रेस नेत्याचा मुलगा जर भाजपत जात असेल तर प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याची थोडीफार झळ अशोक चव्हाणांनाही बसणार हे चाणाक्ष असणाऱ्या शरद पवारांना माहीत असणार. त्यामुळे त्यांनी सुजय भाजपत जाईल अशाच पद्धतीने जाळे फेकले व आपल्या परंपरागत विरोधी असणाऱ्या चव्हाण आणि विखे घराण्याला अडचणीत आणले. याचा फटका काँग्रेसला काही प्रमाणात निवडणुकीतही बसेल.

Trending