आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यासह देशभर सरकारकडून सत्तेचा गैरवापर होतोय, पत्रकार परिषदेत शरद पवारांचा भाजप-शिवसेनेवर घणाघात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील चालू राजकीय परिस्थितीवर रविवारी सकाळी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला. सोबतच राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या आणि निवडणूक येताच पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. सत्ताधारी भाजपकडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या चौकशा लावल्या जातील. अशा प्रकारचा दबाव टाकला जात असल्याने ते सत्ताधीर पक्षात जात आहेत. अशी परिस्थिती केवळ आपल्या राज्यात नाही, तर देशभर आहे. मुळातच, सत्ताधारी पक्षाकडून सत्तेचा गैरवापर केला जात आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची रेड पडली. मात्र, हातात काहीच लागले नाही. राजकीय भूमिका वेगळी मांडतात म्हणून सरकारी यंत्रणेचा गैरवापर भाजपकडून सुरू आहे. अशा शब्दात पवारांनी भाजपवर टीका केली.


शिवेंद्रसिंहराजे म्हणाले मी पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही
पवार पुढे म्हणाले की, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्या पतीची एसीबीची केस चालू आहे. तसेच माझ्या सहकारी संस्थांची देखील एसीबीची चौकशी लावण्यात आली आहे. त्यामुळे मला बाहेर जाण्यास परवानगी द्या. असे सांगून त्या बाहेर पडल्याचे त्यांनी सांगितले. कालच माझ्याकडे शिवेंद्रसिंहराजे दीड तास बसले होते. मी पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर आमदार संग्राम जगताप आणि राहुल जगताप यांचा देखील आजच सकाळी फोन आला होता. दोघांनी पक्ष सोडणार नसल्याचं सांगितले आहे. आमच्या विषयी अफवा पसरवल्या जात आहे.


विद्यमान जागा ठेवणे हाच आघाडीचा धर्म
काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेला आम्ही आघाडीचा धर्म पाळला आता विधानसभेला राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळावा अशी भूमिका मांडली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, आम्ही आघाडीचा धर्म पाळतच आहोत. यात ज्याच्या विद्यमान जागा आहेत या जागा त्या त्या पक्षाला तशाच ठेवायच्या असतात आणि त्यातील काही जागा इकडे तिकडे होऊ शकतात. कोणती जागा सुटणार कोणती नाही ते दोन्ही पक्षाचे नेते ठरवतील.