आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुमच्या 'ईडी'ला 'येडी' केल्याशिवाय गप्प बसणार नाही', पंढरपूरमधील सभेत शरद पवारांचा टोला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- "राज्यात ठिकठिकाणी चितपट कुस्ती खेळणार्‍या पैलवानांची फळी तयार केली आहे, त्यामुळे येत्या 21 तारखेच्या मतदानानंतर 24 तारखेला कळेल की यावेळी लोकांचा मुड काही वेगळाच होता." अशा स्पष्ट शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाच्या सत्ता स्थापन करण्याच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले.
 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भारत भालके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा आज पंढरपूर येथे पार पडली. " राज्याचे मुख्यमंत्री जिथे जातात तिथे सांगतात या निवडणुकीत काही दमच नाही. आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत, परंतु आम्हाला कोण पैलवानच दिसत नाही. त्याचे उत्तर आम्ही 'कुणाशीही कुस्ती खेळत नसतो' असे दिले होते. तुम्ही कुठलातरी धरुन आणलेला पैलवान समोर आणता आहात, मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे. जिल्ह्या-जिल्ह्यात तालुक्या-तालुक्यात पैलवान तयार करण्याचे काम न बोलता गेले अनेक वर्षे करतोय." असेही शरद पवार यांनी सांगितले.
"मी पंढरपुरात अनेक वेळा आलो, परंतु आजचे चित्र काही वेगळेच आहे. तुमचं ठरलं वाटतं" असं शरद पवार यांनी विचारताच सभेला जमलेल्या समुदायाने भारत भालके यांचं नाव जोरजोरात ओरडत सांगितले.  "मी महाराष्ट्राचा दौरा करतोय, जाहीर सभा घेतोय. आज सर्वात पुढे तरुण पिढी दिसत आहे. नाहीतर काही ठिकाणी बाप एकीकडे आणि पोरगा दुसरीकडे. त्यामुळे आता बापानेच ठरवलं पोरगं म्हणतंय तेच खरं. त्यामुळे या दोघांची शक्ती संपुर्ण महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या पाठीशी उभी राहिलेली दिसत आहे." असेही शरद पवार म्हणाले.


तसेच, " या सोलापूरात अमित शहा येवून गेले. ते गृहखात्याबद्दल काही सांगतील असं वाटलं होतं, परंतु त्यांनी भाषणाची सुरुवात 'पवारसाबने महाराष्ट्र के लिए क्या किया' अशी केली. यांनी दिवे लावले आणि आम्हाला विचारतात आम्ही काय केले." अशी खोचक टिकाही शरद पवार यांनी केली. "आम्ही महाराष्ट्रात शेतीउदयोग उभे केले, महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था उभ्या करण्याचे काम केले, समाजातील सर्व घटकांना सवलती देण्याचा प्रयत्न केला, राज्य चालवत असताना सर्वांच्या हिताची जपणूक केली. मग त्यामध्ये स्त्रियांना 50 टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. हिंदुस्थानात पहिल्यांदा महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न केला." असेही शरद पवार यांनी सांगितले. 

"ज्यांच्या हाती सत्ता आहे, ते सत्तेचा गैरवापर करताना दिसतात. त्यांच्याविरोधी कोणी बोलले तर तो देशद्रोही ठरवला जातो. आजचे राज्यकर्ते गुन्हेगारांवर कारवाई न करता त्यांच्याविरोधात जो बोलतो त्यावर ईडीचे हत्यार वापरतात. आता तुमची ईडी असो वा काही तिला 'येडी' केल्याशिवाय गप्प बसणार नाही." असा स्पष्ट इशाराही शरद पवार यांनी दिला.