Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Sharad Pawar committed on Modi in Ashti

मोदी साहेब, हे वागणं बर नव्हं.. नको तिथं तोंड घालू नका, काहीही दिसंल ; शरद पवारांचे टीकेला प्रत्युत्तर

प्रतिनिधी | Update - Apr 15, 2019, 11:17 AM IST

माजी आमदार सुनील धांडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

  • Sharad Pawar committed on Modi in Ashti

    आष्टी - माझ्या घरात माझे कोणी ऐकत नाही. नातूही ऐकत नाही, असे मोदी म्हणतात. परंतु माझ्या घराची त्यांना का चिंता पडली आहे? आम्ही सात भाऊ एकजीवाने राहत असून एकमेकांना साथ देतो. मोदी साहेब, तुम्ही एकटे आहात, घरात कोणी नाही. हा एकटा गडी असूनसुद्धा त्याला घराची माहिती नाही. पण दुसऱ्याच्या घरात काय दिसते हे ताे पाहतो. मोदी साहेब, हे वागणं बरं नव्हं.. नको तिथं तोंड घालू नका. तुम्हाला काहीही दिसंल, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.
    राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड लोकसभा उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ आष्टी येथील ईदगाह मैदानावर रविवारी दुपारी बारा वाजता आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला आरक्षण दिले नाही . मराठा समाजाचे आरक्षण कोर्टात गेले आहे. तीच परिस्थितीत मुस्लिम समाजाची आहे. जो फसवतो, जो धोका देतो अशांच्या हातात देशाची सूत्रे देऊ नयेत. मोदींनी सांगितले मी अभिनंदन यांना सोडवून आणले. माझी ५६ इंचाची छाती आहे. आम्ही काही त्यांची छाती तपासली नाही. तुम्ही कधी सोडवून आणले अभिनंदन यांना. खरे तर जगाने रेटा लावला म्हणून अभिनंदन सुटला. आज पाकिस्तानच्या तुरुंगात कुलभूषण जाधव अडीच वर्षांपासून असून त्याला आधी सोडवून आणा मगच तुमची ५६ इंचाची छाती दाखवा, असे शरद पवार म्हणाले. दुष्काळावर मोदी बोलत नाहीत. बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत. दुष्काळात छावण्या नाहीत. या प्रश्नाकडे मोदींचे लक्ष नाही. मोदी आजकाल माझ्या पेक्षा अधिक टीका नेहरू- गांधीवर करतात. जवाहरलाल नेहरू नऊ वर्षे तुरुंगात होते. इंदिरा गांधींनी भारताची ताकद जगाला दाखवली. राजीव गांधी यांनी लोकांचे जीवन सहज सोपे केले. मोदी म्हणतात त्यांनी काय केले. अहो मोदी साहेब ज्यांनी देशाला उभे केले त्यांचा सन्मान करा, असा सल्लाही पवारांनी दिला.

    माजी आमदार सुनील धांडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये
    शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख माजी आमदार प्रा.सुनील धांडे व जामगाव येथील युवती आश्विनी मच्छिंद्र धस यांनी रविवारी आष्टीतील प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस सोडणाऱ्या क्षीरसागरांची वाट लागल्या शिवाय राहणार नाही सुरेश धस यांनाही पक्षाने कसलीच कमी केली नाही असेही आमदार धांडे यांनी सांगितले.

Trending