हाफपँट घातलेल्यांनो, या वयात तुमच्या मांड्या पाहायची वेळ येऊ देऊ नका - शरद पवारांचा उपरोधिक टोला

दिव्य मराठी

Apr 20,2019 10:54:00 AM IST

नातेपुते (सोलापूर) - शंकरराव मोहिते पाटील यांनी स्वाभिमानाची लढाई लढत राजकारण केले. आम्ही विजय दादांना मोठी संधी दिली. बांधकाममंत्री, साखर कारखान्याचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्र्यापासून उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक संधी दिली. त्या वेळेस त्या काळात त्यांना स्थिरीकरणाचे डोक्यात आले नाही का? आता साधी कुस्ती नाही तर चितपटच. पाठ खाली टेकल्याशिवाय ही कुस्ती सुटणार नाही, असा पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.


इथल्या नेत्यांनी हाफ पँट, डोक्यावर काळी टोपी घातली. मात्र, या वयात तुमचे पाय-मांड्या बघायची वेळ येऊ देऊ नका, असा उपरोधिक टोलाही त्यांनी मोहिते पाटलांना लगावला. माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी नातेपुतेत आयोजित सभेत ते बोलत होते. दरम्यान, त्यांनी पुन्हा मोदींवर प्रहार केला. पवार म्हणाले, इंदिरा गांधी यांनी देशाचा इतिहास नाही तर भूगोल बनवला इतकी कामे केली आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील गरीब जनता ही इंदिरा गांधी यांच्याशी एकरूप झाली होती. त्यामुळे त्या लोकप्रिय बनल्या होत्या. मात्र आजचे प्रधानसेवक देशात गेल्या ६० वर्षात काय केले, अशी भाषा करतात. हे कोणालाही न पटणारे आहे. ज्या घरण्यावर आजचे पंतप्रधान टीका करतात त्या इंदिरा गांधी देशाला स्थिर सरकार दिले. देशाची प्रतिष्ठा वाढवली, राजीव गांधी यांनी आधुनिकतेची कास धरल्याने आज देशात तंत्रज्ञान विकास झाला त्यांनी देशासाठी योगदान दिले.

मोदींनी दुसऱ्याच्या घरात वाकून पाहणे बंद करावे
सध्या मोदीबाबाला कळले की, आमच्या कुटुंबात भांडणे झालीत. त्यांना आमच्या कुटुंबाची काळजी लागलेली आहे. स्वतःचे कुटुंब नसल्याने त्यांना एकीचे महत्व समजणार नाही. पण आमच्यावर आईचे संस्कार आहेत. माझ्या घरात मी, बायको व मुलीचे लग्न झालेले आहे. आम्ही जीवा-भावाने एक आहोत. त्यामुळे मोदींनी दुसऱ्याच्या घरात वाकून बघायचे बंद करावे, असा टोलाही पवारांनी लगावला.

मी ५० वर्षांत कारखान्याचा साधा संचालकही नाही
पवार फक्त साखर धंद्यात जास्त लक्ष देतात. अशी अकलुजमध्ये मोदींनी टीका केली होती. त्याच्या उत्तरात पवार म्हणाले, गेल्या ५० वर्षात मी कोणत्याही कारख्यानाचा साधा संचालकही नाही. तरीदेखील श्वास चालेपर्यंत मी शेतकऱ्यांसाठी झटणार. भाजपने पाच वर्षांत कोणत्याही वर्गाचे प्रश्न सोडवले नाही. मोदीच्या राजवटीत शेतकरी उध्वस्त झाला, असा आरोपही पवार यांनी केला.

X