आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन चार रुपयांत कपभर चहा तरी मिळतो का? शरद पवार यांचा मोदी सरकारला सवाल  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारामती - केंद्राने अर्थसंकल्पात शेतकरी कुटुंबाला दरवर्षी ६ हजार रुपये देण्याची घोषणा केली. मात्र, कुटुंबात साधारण ५ व्यक्ती असतात. त्यामुळे त्यांच्या वाट्याला रोज फक्त ३ ते ४ रुपये येतील. इतक्या पैशात हॉटेलामध्ये चहा तरी मिळतो का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. 


बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये विकासक संस्थेने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, तुटपुंजी मदत देऊनही सरकार शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढत असल्याचे मिरवत आहे. शेतकऱ्यांवर दया दाखवू नका. तर शेतमालाला भाव देऊन घामाची किंमत द्या. शेतकऱ्यांना साधनसामग्री दिल्यास शेतकरी खात्रीने देशासमोरील प्रश्न सोडवेल. लाचारीने कोणापुढे काही मागणार नाही. मराठवाडा, विदर्भात रोज शेतकरी आत्महत्या होत आहेत. आमच्या काळातही आत्महत्या झाल्या. मात्र ७१ हजार कोटींची कर्जमाफी देऊन त्यांना मदतीचा हात दिला. कर्जावरील व्याजदर १२ टक्क्यांवरून अगदी ३ टक्क्यांवर आणला. परिणामी, भारत जगाला अन्नधान्य पुरवू शकत आहे. देशात उद्योगपतींची कर्ज माफ होत आहेत. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक हातून गेल्याने मुलीचे लग्न लावू न शकणारा शेतकरी आत्महत्या करत आहे, असेही ते म्हणाले.
 
शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी अन्य व्यवसाय करावा 
निवडणुका जवळ आल्याने सरकार २० टक्के ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विचार न करता ८० टक्के खाणाऱ्यांचा विचार करत आहे. शेतकरी कुटुंबातील प्रत्येकांनी केवळ शेतीवर अवलंबून राहणे आता योग्य नाही. कारण, वाटण्या झाल्याने शेतीचे तुकडे पडत आहेत. ८२ टक्के लोकांकडे २ हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. त्यापैकी ६० टक्के शेतीला पाणी उपलब्ध नाही. म्हणून शेतकरी कुटुंबातील इतरांनी अन्य उद्योग व्यवसाय करावे, असा सल्ला पवारांनी दिला.


 

बातम्या आणखी आहेत...