विधानसभा 2019 / 'जे दिलेली आश्वासने पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही', शरद पवारांचे सरकारवर टीकास्त्र

'महाराष्ट्रातील जनतेला परिवर्तन हवंय'

प्रतिनिधी

Oct 09,2019 10:37:00 PM IST

बाळापूर- मुख्यमंत्र्यांनी सरसकट कर्जमाफी करणार अशी घोषणा केली मात्र ही घोषणा फसवी निघाली. त्यामुळे जे आश्वासन पूर्ण करत नाही त्यांना खुर्चीवर राहण्याचा हक्क नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला ठणकावून सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची अकोला जिल्ह्यातील बाळापुर येथे संग्राम गावंडे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आज सकाळी पार पडली.

"गेल्या अनेक दिवसांपासून मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरतोय. या दौऱ्यात मला एक चित्र दिसतंय की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोक भाजप आणि शिवसेनेवर नाराज आहेत. लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानने पुलवामा येथे एक शहाणपणा केला. त्याला आपल्या वायूदलाने चोख प्रतिउत्तर दिले. या देशात सत्ताधाऱ्यांनी कधी सैन्याच्या कामगिरीचा उपयोग मतासाठी केला नाही. ज्यावेळी पाकिस्तान आणि भारत युद्ध झाले तेव्हा सैन्याने पाकिस्तानला धडा शिकवला आहे."


"तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भूगोल बदलला. पाकिस्तानचे दोन तुकडे केले. मात्र त्यांनी सैन्याच्या शौर्याचे श्रेय निवडणुकीत घेतले नाही मात्र मोदींनी ते श्रेय घेतले असा आरोपही शरद पवार यांनी केला. एका ठिकाणी ते म्हणाले होते की घुसके मारूंगा, लढले सैन्य मग यांचा काय संबंध ? लोकांना वाटलं यांनीच केलं, मतं दिली. सरकार आलं पण आता कशावर निवडणूक लढवणार ? असा सवालही शरद पवार यांनी केला. आज अवस्था बिकट आहे. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही. मुख्यमंत्र्यांनी कापसाला भाव देण्याचे आश्वासन दिले होते मात्र कापसाला भाव नाही, सोयाबीनीला भाव नाही."


"एकदा कांद्याचे भाव वाढले तेव्हा लोकसभेत माझ्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. विरोधक कांद्याच्या माळा गळ्यात घालून आले होते. तेव्हा कांद्याच्या माळा घाला नाहीतर कवड्याच्या माळा घाला मी शेतकऱ्यांना मदत केल्याशिवाय स्वस्त बसणार असे ठणकावून सांगितले होते. मात्र आजचे राज्यकर्ते तसं करताना दिसत नाही. आज नव्या कंपन्या येत नाही, कारखाने बंद पडले आहेत. पाच वर्षात मोदी सरकारच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढले. शेतकरी हैराण आहे, तरुण बेरोजगार आहे, सामान्य माणूस पिचला आहे. मग हे सरकार आहे कुणासाठी ? असा सवाल पवारांनी केला.


"आम्ही ठरवले आहे की नवी पिढी राजकारणात आणायची आहे. काँग्रेसच्या विचारांनी, गांधी, नेहरुंच्या विचारांनी हा देश बनला आहे. स्वातंत्र्यकाळातही हा भाग घाबरला नव्हता. आता मोदींनाही आम्ही ठणकावून सांगू की तुम्हाला आम्ही घाबरणार नाही. त्यामुळे महाआघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या," असे आवाहनही शरद पवार यांनी केले."

X
COMMENT