कोल्हापूर / कोरेगाव-भीमा प्रकणाचा तपास एनआयएकडे सुपुर्द, उद्धव ठाकरेंच्या निर्णयावर शरद पवारांनी व्यक्त केली नाराजी

राज्याकडून अधिकार काढून घेणे अयोग्यच आणि महाराष्ट्राने त्याला पाठिंबा देणंही अयोग्य - शरद पवार 

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 10:56:00 AM IST

कोल्हापूर - कोरेगाव-भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णयावरून केंद्र-राज्य सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. अशातच कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास एनआयएकडे सुपुर्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत नाराजी वर्तवली आहे. ते म्हणाले की, घटनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे, असे असतानाही राज्याकडून अधिकार काढून घेणे योग्य नाही. तसेच त्यांनी जर काढून घेतला तर महाराष्ट्राने त्याला पाठिंबा देणंही योग्य नाही. कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या पवारांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली.

पवार म्हणाले की, भीमा कोरेगावबाबत राज्य सरकारमधील गृह खात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक आक्षेपार्ह असल्याची आमच्याकडे तक्रार आली. याबाबत चौकशी करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरु झाली. सकाळी 9 ते 11 वाजताच्या दरम्यान बैठक झाली आणि तीन वाजता केंद्र सरकारने तपास आपल्याकडे काढून घेतला, असे शरद पवारांनी सांगितले.


दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपला अधिकार वापरून हा निर्णय घेतल्याने महाआघाडी सरकारमध्ये कोरेगाव-भीमा तपास प्रकरणावरून मतभेद निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.


X
COMMENT