आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजवर दोन वेळा शरद पवारांनी केले होते काँग्रेसविरोधात बंड; पवार काकांच्या पावलावर अजितदादांचे पाऊल

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रकांत शिंदे 

मुंबई - शुक्रवारी रात्रीपर्यंत काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसाेबत सत्ता स्थापनेवर चर्चा करणारे अजित पवार शनिवारी सकाळी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन अाले आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली. या घडामाेडींमुळे १९७८ मध्ये शरद पवारांनी केलेल्या बंडाची म्हणजेच खंजीर खुपसण्याच्या प्रकरणाची आठवण झाली. शरद पवार यांनी दोन वेळा काँग्रेसमध्ये बंड केले; परंतु नंतर दोन्ही वेळेला सत्तेसाठी काँग्रेससोबत जुळवून घेतले. पहिल्या वेळी ते मुख्यमंत्री झाले, तर दुसऱ्या वेळी स्वतःचा वेगळा पक्ष स्थापून काँग्रेससोबत सत्तेत बसले. 

काँग्रेसमध्ये फाेडाफाेडी करून शरद पवार यांनी १९७८ मध्ये पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद आघाडी स्थापन करून ३८व्या वर्षी मुख्यमंत्रिपद मिळवले हाेते. त्यांनी वसंतदादा पाटील यांचे सरकार एका रात्रीत पाडले होते. मात्र, शरद पवार यांच्या या पहिल्या बंडाकडे जाण्यापूर्वी राजकीय इतिहास घडलेले महत्वाचे बदल पाहणे आवश्यक आहे. १२ जून १९७५ ला अलाहाबाद हायकोर्टाने १९७१ च्या निवडणुकीत सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग केल्याप्रकरणी इंदिरा गांधींना दोषी ठरवून निवडणूक रद्द केली आणि त्यांच्यावर सहा वर्षांसाठी बंदीही घातली. त्यामुळे त्यांच्याविरोधात देशभर आंदोलने सुरू झाली. काँग्रेस वगळून अन्य राजकीय पक्ष जयप्रकाश नारायण यांच्या लोकसंघर्ष समितीच्या छत्राखाली एकवटले, मात्र इंदिरा गांधींनी ही परिस्थिती पाहून २५ जून १९७५ ला देशात आणीबाणी जाहीर केली. आणीबाणीनंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे २० खासदार निवडून आले. तेव्हा अाणीबाणीच्या वेळी शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तर आणीबाणीनंतर वसंतदादा पाटील यांना या पदावर बसवण्यात आले. इंदिरा गांधी यांच्याविरोधात जात यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी रेड्डी काँग्रेसची स्थापना केली. शरद पवार हे रेड्डी काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे राज्यातही काँग्रेसमध्ये फूट पडली. १९७८ च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या आणि त्यात जनता पक्षाने ९९ जागा, तर इंदिरा काँग्रेसला ६२ आणि रेड्डी काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस एकत्र आले आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री आणि नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. शरद पवार यांच्याकडे उद्योग खाते सोपवण्यात आले. नासिकराव तिरपुडे यांनी यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. १९७८ च्या पावसाळी अधिवेशनात शरद पवार ४० आमदार घेऊन वसंतदादा सरकारमधून बाहेर पडले आणि सरकार पडले. शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेसची स्थापना करीत जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षाची आघाडी करून पुलोदचे सरकार स्थापन केले आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले. मात्र, केंद्रात पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या आणि त्यांनी पुलोदचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावली.

शरद पवार यांनी नंतर १९८७ मध्ये पुन्हा राजीव गांधी यांच्या नेतृत्वात इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, लोकसभेत विरोधी पक्षनेता असताना १९९९ मध्ये त्यांनी दुसरे बंड केले. सोनिया गांधी विदेशी असल्याने त्यांनी पंतप्रधान होऊ नये असा पवित्रा शरद पवार यांनी घेतला. त्यामुळे काँग्रेसने शरद पवार यांना निलंबित केले आणि १९९९ ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.

१९९१ मध्ये शरद पवार यांनी शिवसेनेतून छगन भुजबळ यांना फोडले आणि त्यांना काँग्रेसमध्ये घेतले. त्यानंतर १९९९ मध्ये जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा भुजबळही त्यांच्यासोबत गेले आणि अजित पवार यांना डावलून छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले हाेते.
‘खंजीर खुपसण्या’ची इतरही उदाहरणे


> २००५ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर नाराज होत नारायण राणे यांनी शिवसेना सोडली आणि ते काँग्रेसमध्ये गेले. मात्र, तेथेही त्यांचे योग्य मूल्यमापन न झाल्याने त्यांनी स्वाभिमानी पक्ष काढला; परंतु २०१९ मध्ये त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली.
>  २००५ मध्येच राज ठाकरे यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होत शिवसेना सोडली व मनसेची स्थापना केली. पहिल्या प्रयत्नात चांगले यश मिळाले. नंतर त्यांची जादू ओसरत गेली आणि २०१९ मध्ये त्यांनी लोकसभा लढवली नाही आणि विधानसभेलाही फक्त एक आमदार निवडून आला.
>  आणि आता अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचे पत्र घेऊन भाजपला समर्थन दिले आणि शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकले. मात्र, अजित पवार यांनी आपण अजूनही राष्ट्रवादीतच असल्याचे स्पष्ट केले.