आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आता ‘पुलवामा’ घडवून आणले नाही तर राज्यात सत्तांतर अटळ, नरेंद्र मोदी-देवेंद्र फड‌णवीसांवर शरद पवारांचे टीकास्त्र

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. युवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्यामुळे लोकसभेच्या वेळी जसा पुलवामा हल्ला घडवून आणला त्याप्रमाणे आता कारस्थान केले गेले नाही तर राज्यात सत्तांतर अटळ आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी आयोजित (२१ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत केला.  ते म्हणाले, ‘जिल्हानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठकांचे मेळाव्यात रूपांतर झाल्याचे मी पाहिले. मोदी-फडणवीसांच्या धोरणांनी युवक सध्या त्रस्त आहेत. त्यामुळे आम्हाला जनतेची साथ मिळेल असे दिसतेय.’ शंभर दिवसांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाले. मग शंभर दिवसांतच असा बदल कसा काय दिसतो..?  असा सवाल ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने विचारला. त्यावर पवार म्हणाले, ‘लोकसभेच्या वेळी पुलवामा हल्ला करण्यात आला. आता त्याविषयी संदिग्धता आहे. पण पुलवामा हल्ल्यामुळे मोदीच पाकिस्तानला धडा शिकवू शकतात असे चित्र निर्माण केले गेले. त्यामुळे केंद्रात सत्ता आली. आता असले कारस्थान झाले नाही तर सत्तांतर अटळ आहे.’ धर्मनिरपेक्ष पक्षांना एकत्र केले जात आहे.  समाजवादी पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी, डावे पक्ष आणि रिपाइंला सोबत घेतलेच आहे. मनसेलाही सोबत घेण्याची आमची इच्छा आहे, पण काँग्रेसला ते नकोय. मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी उसाची लागवड थांबवण्याची शिफारस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी शासनाकडे केल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले तर ते म्हणाले, 'ते कोण आहेत हे मला नाही माहिती. पण बहुदा त्यांचा शेती आणि पाण्याचा खूप दांडगा अभ्यास असेल.  मी देशातील सर्वात मोठ्या ऊसविषयक संस्थेचा अध्यक्ष आहे. उसाला ३५ ते ४० दिवसांच्या खंडानंतर पाणी दिले तरी चालते. पण त्यांना प्रशासनातील अनुभ‌व अन् अलौकिक ज्ञान जास्त असेल म्हणून ते असे म्हटले असतील,' अशी टिप्पणी पवारांनी केली. वंचित आणि एमआयएमचे तुटते, कधी जुळते, त्यांचे काहीच समजत नाही. त्यांची युती तुटावी यासाठी कोणत्या शक्तीने प्रयत्न केले मला माहिती नाही. पण ते एकत्र लढले तर भाजपला फायदा होईल. पण त्यांचे काय चालले काहीच कळत नाही, असेही पवार म्हणाले. पत्रकार परिषदेला नेते धनंजय मुंडे, आमदार सतीश चव्हाण, माजी आमदार संजय वाघचौरे, जिल्हाध्यक्ष कैलाश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, द्वारकाभाऊ पाथ्रीकर, बाबुराव कदम, रंगनाथ काळे आदी उपस्थित होते.

अनेक सरकारे पाहिली पण सत्तर वर्षांत अशी भीती कधीही निर्माण झाली नाही
मी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सरकारे पाहत आहे. त्या वेळी युवक काँग्रेसचे काम करत होतो. पुढे लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह रावांपासून ते सर्वच पंतप्रधानांचे कामकाज जवळून पाहिले आहे. यापूर्वी ईडी, सीबीआय, सीव्हीसी अशा संस्थांची भीती दाखवून गलिच्छ राजकारण कधीही केले गेले नाही. ईडीचे तर कुणाला नावही माहिती नव्हते. पक्षांतरे अशी भीती दाखवूनच करवून घेतली जात अाहेत, असा आरोप पवारांनी केला. 

पवारांनी हे मुद्देही मांडले 
१. महागाई, आत्महत्या, बेरोजगारी, कारखाने बंद होताहेत, अर्थव्यवस्था डबघाईस आलीय यावर बोलण्याऐवजी सीएम अन् पीएम फक्त माझ्याच नावाचा जप करत आहेत.
२. निर्यात वाढावी, गुंतवणूक वाढवण्यासाठी धोरणे आखावीत,  शेतीसह उद्योगांची उत्पादकता वाढण्यासाठी काहीच करत नाहीये.
३. ईव्हीएमवर आमच्यासह  
सर्वच विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला आहे, पण आमची दखल घेतली जात नाही. 
४. धनंजय मुंडेंनी पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे आरोप केले, पण सरकारला निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावीशीही वाटत नाही, 
५. सत्तेबाहेर राहण्याची इच्छा नाहीये म्हणून पक्षांतर होताहेत.

0