आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​'माझी मैना..' ओठांवर नसलेला तरुण तेव्हा नव्हता: शरद पवाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - "माझी मैना गावाकडं राहिली' हे शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे गीत ओठांवर नाही, असा तरुण साठच्या दशकात महाराष्ट्रात नव्हता. त्या वेळी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो. अण्णाभाऊ साठेंच्या या गीतानं उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते, अशी आठवण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी पुण्यात सांगितली. ज्येष्ठ साहित्यिक आणि ८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या फकिरा कादंबरीचे इहवादी मूल्यमापन' आणि 'आंबेडकरवादी प्रतिभावंत' या दोन ग्रंथांचे प्रकाशन पवार यांनी केले. त्यानंतर ते बोलत होते. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे अध्यक्षस्थानी होते. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, खासदार वंदना चव्हाण, सचिन इटकर, भगवान वैराट आदी या वेळी उपस्थित होते. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. 
पवार म्हणाले, अण्णाभाऊ साठे यांनी लेखणीच्या माध्यमातून वंचितांचे दुःख, वेदना मांडल्या. नुसते लिहून ते थांबले नाहीत. तर संघर्ष करण्याचेही काम केले. त्यांना शिक्षणाची संधी मिळाली नाही. बालपणी शाळेत गेल्यावर अस्पृश्याची जाणीव त्यांना करून दिली गेली. त्यांनी शाळा सोडली. घरची गरिबी इतकी की गाडी भाड्यालाही पैसे नव्हते. सांगली जिल्ह्यातील वाटेगावापासून मुंबईपर्यंतची वाट त्यांनी पायी तुडवली. त्या कठीण काळातही त्यांची प्रतिभा फुलत राहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत समाज जागृत करणाऱ्यांमध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, गव्हाणकर यांचे मोठे योगदान होते. उपेक्षित माणसावरील अन्यायाला वाचा फोडणे हाच त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिला, असे पवार म्हणाले. 


"अर्धा गांधी' आणि आंबेडकरांचे वारसदार 
'भाजपला अलीकडे गांधीवादाची मिठी पडली आहे. पण 'अर्धा गांधी' आणि 'अर्धा गोळवलकर' ही भेसळ चालणार नाही. संघाने-भाजपने गोळवलकर पूर्ण नाकारले पाहिजेत,' असे मत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेबांना आज कोणी हिरव्या रंगात, तर कोणी भगव्या रंगात बुडवायला लागले आहेत. त्यांचे वारसदारच जर उजवीकडे किंवा डावीकडे जात असतील तर आंबेडकरवादी विचारधारा धोक्यात असल्याचे म्हणावे लागेल. 


शिकलेल्या पिढ्या आंबेडकरांसोबतच "फकिरा'ही वाचतात 
'फकिरा' या कादंबरीतून त्यांनी समाजाचे दुःखच मांडले. हा महत्त्वाचा विषय डॉ. सबनीसांनी योग्य वेळी आणला आहे, असे कौतुक पवार यांनी केले. तर, "दलितांमधल्या शिकलेल्या पिढ्या जसे डॉ. आंबेडकर वाचतात त्याच जोडीने 'फकिरा'ही वाचतात,' असे सुशीलकुमार शिंदे म्हणाले. अवघ्या ४९ वर्षांच्या आयुष्यात अण्णाभाऊंनी निर्माण केलेली विपुल ग्रंथसंपदा पाहिली की ते किती प्रतिभावंत होते, हे समजते, असे शिंदे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...