आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानागपूर- "परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे आमचं कंबरडं मोडलं आहे. होतं नव्हतं सारं गेलं. राज्यात सरकार नसल्यामुळे मदतकार्य सुरू झालं नाही. शेतकरी अडचणीत आहेत साहेब, राज्यात लवकर सरकार स्थापन करा", अशी मागणी काटोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी दुष्काळी पाहाणी दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडे केली.
काटोल तालुक्यातील चारगाव येथील रवींद्र पुनवटकर यांच्या शेतात झालेल्या नुकसानीची पाहाणी शरद पवारांनी केली. यावेळी शेतकऱ्यांनी आपले दु:ख पवारांसमोर व्यक्त केले. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील कापूस, सोयाबीन आदी पिके नष्ट झाली आहेत. नुकसानीची पाहाणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आज (14 नोव्हेंबर) सकाळी दहा वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरून ते थेट काटोलकडे रवाना झाले. यावेळी आमदार अनिल देशमुख यांनी स्वत: गाडी चालवली. त्यांच्या गाडीत आमदार प्रकाश गजभिये, काँग्रेसचे युवा नेते आशिष देशमुख हेही रवाना झाले.
राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सतीश शिंदे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते स्वागतासाठी उपस्थित होते. पवारांनी काटोल तालुक्यातील सहा ते सात विविध गावातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन परिस्थिती जाणून घेतली. दिवसभर पवारांनी दौरा करत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. रात्री नागपुरात मुक्कामी राहिलेल्या पवारांनी विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उद्या (15 नोव्हेंबर) रोजी सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद आहे. त्या नंतर दुपारी एका स्थानिक कार्यक्रमाला उपस्थित राहून पवार सायंकाळी पुण्याला रवाना होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.