विधानसभा 2019 / ‘लोकशाही’ जिंकावी म्हणून या आखाड्यात मी उतरलो - शरद पवार 

दिव्य मराठी : या आक्रमकपणामुळे तुम्ही जिंकाल असे वाटते?

दिव्य मराठी

Sep 21,2019 07:49:00 AM IST

जालना - ‘मी सत्तेत होतो आणि विरोधी बाकांवरही प्रदीर्घ काळ बसलो आहे. सत्ता येते आणि जाते. कोणता पक्ष जिंकेल आणि कोण हरेल, यापेक्षा ‘लोकशाही’ जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यासाठीच मी या आखाड्यात पूर्ण शक्तिनिशी उतरलो आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


जालन्याच्या ‘सॅफ्रॉन’ हॉटेलात शरद पवार थांबलेले! एकेक नेता पक्ष सोडत असल्याच्या बातम्यांनी प्रत्येक दैनिकाचे पान रंगलेले. अशा वेळी तरुणालाही लाजवेल, अशा आत्मविश्वासासह पवार दौऱ्यावर निघालेले आहेत. त्यांच्या देहबोलीतून ते जाणवत असते. त्यांना भेटण्यासाठी होणारी गर्दी, तरुण- तरुणींचा मोठा प्रतिसाद यामुळे या निवडणुकीत मोठे आव्हान उभे करण्याची उमेद राष्ट्रवादी काँग्रेस बाळगून असल्याचे चित्र दिसत होते. धनंजय मुंडे, राजेश टोपे असे नेतेही पवारांच्या सोबत होते.


‘पंतप्रधान म्हणतात, तुम्हाला पाकिस्तानविषयी आस्था आहे’, या प्रश्नावर ‘दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत पवार म्हणाले, ‘मी काय सांगितले होते? एक तर मी कुठेही जाहीर सभेत बोललो नाही. माझ्या पक्षाच्या कार्यालयामध्ये चर्चा करत असताना कुणी तरी मला प्रश्न विचारला. तेव्हा मी असे म्हणालो, मी पाकिस्तानला गेलो होतो क्रिकेट संघटनेचा प्रमुख असताना. माझे निरीक्षण असे आहे ः पाकिस्तानमधील नेते आणि लष्करप्रमुख हे सातत्याने भारताच्या विरोधी माहोल तयार करण्याची भूमिका घेत असतात. तेथील जनतेची भूमिका अशी नसते. भारताच्या संकटाला तोंड देण्याची धमक आमच्यातच आहे, हे दाखवून तिथले लष्करप्रमुख सत्ता आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यातून ते पाकिस्तानी जनतेची फसगत करत असतात, असे माझे वक्तव्य होते. यात काय पाकिस्तानची बाजू आहे‌? पाकबद्दलच्या माझ्या वक्तव्यावर मुख्यमंत्री बोलले तर मी समजू शकतो. मुख्यमंत्री अनेक वेळा माहिती न घेता बोलतात, तसे ते बोलले. पण, पंतप्रधानांकडून तरी अशी अपेक्षा नाही. पंतप्रधानपद ही लोकशाहीतील ‘इन्स्टिट्युशन’ आहे.


ज्येष्ठांना तुम्ही ‘ईडी’चे भय दाखवू शकता. तरुणांच्या खांद्यांवर कोणतेही "बॅगेज' नाही. त्यांच्यासमोर फक्त वर्तमान आणि भविष्यकाळ आहे. या तरुणांच्या बळावर लोकशाही जिंकणार आहे. अघोषित आणीबाणीच्या या कालखंडात मला खात्री आहे की तरुणच यावर मार्ग काढतील.’

X