दिव्य मराठी विशेष / मी इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतोय आणि त्यांचे ‘पाकिस्तान, पाकिस्तान’ सुरू आहे!

sharad pawar interview divyamarathi

Sep 21,2019 08:06:17 AM IST

संजय आवटे/कृष्णा तिडके

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आक्रमक पवित्रा, सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरू आहे. सूडभावनेने विरोधकांना त्रास द्यायचा, हे चित्र कधी नव्हते...


प्रश्न : सुरक्षित सत्ता सोडून अनेकदा तुम्ही वेगळ्या मार्गाने गेलेला आहात. आताच्या या राजकारणाच्या टप्प्याकडे नेमके कसे बघता?


पवार : सध्या देशात आणि राज्यात एकंदर काळजी करण्यासारखी परिस्थिती आहे. आपण बघितले असेल - पंडित नेहरू अथवा इंदिरा गांधी यांच्या कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाची जबरदस्त शक्ती होती, तरीही राममनोहर लोहिया यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्यांची मोठी फळी होती. ते संसदेमध्येसुद्धा दुसरी बाजू प्रभावीपणे मांडत. धोरणांमध्ये जिथे दुरुस्ती करणे आवश्यक होते, त्यासंदर्भात स्पष्ट मते मांडणारी मंडळी होती. त्यामुळे विरोधकांचीही भूमिका महत्त्वाची असते, हे आपण पाहिले आहे. विरोधकांची भूमिका राष्ट्रहिताला धोका पोहोचवणारी आहे, असे कधी मानले गेले नाही. आज विरोधकांनी दुसरी बाजू मांडली तर ते राष्ट्रद्राेही आहेत, असे कळत-नकळत भासवले जाते, तसा प्रयत्न केला जातो. विरोधकांच्या संबंधी, मग ते राज्याचे मुख्यमंत्री असोत किंवा देशाचे पंतप्रधान, कुठल्याही प्रश्नावर सुसंवादच करायचा नाही, ही त्यांची नीती आहे.


प्रश्न : २०१४ ते २०१९ या कालावधीत विरोधक म्हणून तुम्ही थोडेसे कमी पडलात. त्याचा यांना फायदा झाला, असे वाटते का?

पवार : संसदेत विरोधकांची संख्याच अत्यल्प होती. अशी स्थिती कधी झाली नव्हती. मला आठवते - राजीव गांधी पंतप्रधान होते त्या वेळी मी संसदेत होतो. आज जो भाजप सत्तेत आहे त्या वेळी त्यांचे दोनच सदस्य हाेते. त्या वेळी विरोधकांची कामगिरी व्ही. पी. सिंग यांनी बजावली. आता काय चित्र दिसते आहे? संसदेत सत्ताधाऱ्यांकडे मोठ्या जागा आहेत. दुसरी गोष्ट मान्य केली पाहिजे, संसदेत प्रभावी चित्र निर्माण करायचे असेल तर देशाच्या मोठ्या भागाला त्यात समाविष्ट करून घेणे गरजेचे आहे. मोठा भाग म्हणजे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार ही जी हिंदी भाषिक राज्ये आहेत, त्यांना सहभागी करून घ्यावे लागेल. देशातील अनेक चळवळी बिहारमधून सुरू झाल्या आहेत. आज संसदेत जो विरोधी पक्ष आहे, त्यातील ८० टक्के लोक हे दक्षिणेतील वा हिंदी पट्ट्याबाहेरचे आहेत. केरळ, तामिळनाडूमधून ते निवडून आले आहेत. आणि या सर्वांचा ‘भाषा’ हा प्रश्न आहे. संसदेमध्ये इंग्रजी भाषणांचा परिणाम होतो, परंतु जेवढा प्रसार हिंदीचा होतो तितका अन्य भाषांचा होत नाही.


प्रश्न : भाषेच्या अनुषंगाने अमित शहा म्हणाले की, ‘वन नेशन, वन लँग्वेज!’


पवार : हे सगळे लोक असे आहेत की यांनी कधी राष्ट्रीय विचारच केलेला नाही. आता ठीक आहे, ते राष्ट्रीय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, पण त्यांची आतापर्यंतची विचारधारा प्रादेशिक होती. ज्या वेळी सबंध देशातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया येतात त्या वेळी त्यांना माघार घ्यावी लागते!


प्रश्न : नरेंद्र मोदी आले तेव्हा शरद पवारांचे प्रचंड कौतुक करत होते आणि आता पवार एकटेच टार्गेट, हा जो प्रवास झाला आहे… हे नेमके काय आहे?


पवार : आज चुकीच्या धोरणांवर बोलणारे जे काही थोडे लोक आहेत त्यापैकी कदाचित मी आहे. योग्य गोष्टीला ‘योग्य’ आणि जे चूक आहे त्याला ‘अयोग्य’ म्हणण्याची भूमिका मी मांडतो. ही भूमिका अडचणीची ठरते! ज्या वेळी ते माझे कौतुक करत होते, त्याला एक पार्श्वभूमी होती. मी देशाचा कृषिमंत्री होतो तेव्हा मनमोहनसिंग पंतप्रधान होते. मनमोहनसिंग यांच्यावर व्यक्तिगत हल्ला करण्याचे काम मोदी करायचे. त्यामुळे काँग्रेस मंत्र्यांची मोदींबाबत तीव्र मते होती. त्यांच्यात कधी संवाद नव्हता. खरे म्हणजे राज्यप्रमुख आणि केंद्रप्रमुख यांचा संवाद असणे आवश्यक असते. त्या वेळी गुजरातचा काही प्रश्न असेल तर मोदी माझ्याकडे हक्काने यायचे. मी सांगायचो, प्रश्न मोदींचा नाही, गुजरातमधील शेती करणारा जो शेतकरी आहे, त्यांचा प्रश्न आहे. त्यासाठी गुजरातमधील कृषी खात्याला विश्वासात घ्यावे लागेल. मनमोहनसिंग यांनाही ते पटायचे. हे सगळे होत असताना शेतीशिवाय गुजरातच्या अन्य प्रश्नांवरसुद्धा जेव्हा केंद्राशी संवाद करायचा असेल तेव्हा मोदी माझ्याकडे यायचे. मी मध्यस्थी करायचो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात माझे कौतुक केले असेल. आता धोरणात्मक कमतरता दिसताहेत, त्यावर मी स्पष्ट मत मांडतो आहे. त्यामुळे आता मी टार्गेट असेल! मला लोकांचे असे संदेश येत आहेत की, ‘शरद पवार शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आहेत, आत्महत्येचे प्रश्न मांडताहेत, बेरोजगारीचे प्रश्न मांडताहेत, विभागीय असमतोलाचे प्रश्न मांडतोहत, पाण्याच्या संदर्भातील प्रश्न मांडताहेत, कायदा-सुव्यवस्थेच्या संदर्भात बोलताहेत. तर दुसऱ्या बाजूला मोदी काय म्हणतात… पाकिस्तान, कलम ३७०, पवार...पवार आणि पवार…! अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.


प्रश्न : मुख्यमंत्री गेल्या पाच वर्षांतील कामांची ज्या प्रकारची मांडणी करत आहेत त्याबद्दल काय?


पवार : या पाच वर्षांत महाराष्ट्राचा ग्राफ खाली आला आहे. उद्योग असेल, शेती असेल… या सर्वच बाबतीत हे झाले आहे. महाराष्ट्र हे देशातील औद्योगिकीकरणाच्या बाबतीतील एक अग्रेसर राज्य होते. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने त्यासाठी चांगले कार्यक्रम जाणीवपूर्वक राबवले. त्यातून गुंतवणुकीचे वातावरण निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून देशात आपण पहिल्या क्रमांकावर आलो. या पाच वर्षांत काय दिसते आहे? महाराष्ट्रात जास्तीत जास्त कारखाने बंद पडले. नवीन येण्याचे तर सोडा. मुख्यमंत्री विदर्भातील आहेत. विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा काेणताही जिल्हा घ्या. तेथे काेणते उद्योग आले? महाराष्ट्रातील इतर भागांचीही हीच स्थिती आहे. आज हे उद्योग देशातील इतर राज्यांत जाऊ लागले. गुजरातमध्ये जाऊ लागले. अन्य राज्यांतही गेले तरी तक्रार नाही, तेही देशाचाच भाग आहे. मात्र अशी परिस्थिती जेव्हा महाराष्ट्रात निर्माण होते त्याला काय म्हणणार... या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते की, मी नाशिक दत्तक घेतो. दत्तक घेतले तर तिकडे ढुंकून तरी पाहिले का? मग कारखाने बंद पडत आहेत तर हे काय करताहेत?


प्रश्न : पाच वर्षांत सिंचन क्षमता वाढली त्याबद्दल..


पवार : काय, किती वाढवली, हे प्रकल्प कुणी सुरू केले? या प्रकल्पांना चार वर्षांत कुणी पैसे दिले नाहीत. मागच्या सरकारच्या काळात गैरप्रकार झाल्याचे वातावरण निर्माण करून या प्रकल्पांना निधी देणे बंद केले. आणि त्यामुळे जे प्रकल्प विशिष्ट रकमेत पूर्ण होणार होते त्याची किंमत वाढली आहे. जे प्रकल्प पूर्वीच्या सरकारच्या काळात सुरू होणार होते तेवढेच प्रकल्प आता सुरू होत आहेत. ते अधिक खर्चिक होत आहेत. यामुळे राज्यावर खर्चाचा बोजा पडला आहेच, परंतु शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.


प्रश्न : जलयुक्त शिवारची जी आकडेवारी सांगितली जाते त्यासंदर्भात तुमचे काय मत आहे?


पवार : जलयुक्त शिवार ही योजना उपयुक्त ठरली आहे, तर मग २५-२५ हजार कोटी रुपये खर्च करून ग्रीड करण्याची काय आवश्यकता होती? सगळे कल्याणच झाले आहे सगळीकडे. पाझर तलाव, तलाव निर्माण करणे हा कार्यक्रम पूर्वीपासून महाराष्ट्रात राबवला जातो आहे. पाऊस चांगला झाला तर तलावात पाणी येते. तलाव भरले तर त्याचा फायदा होतो. पाऊस पडला नाही तर संकटे वाढतात. यात कायमची उपाययोजना करण्यासाठी सरकारने काहीच केले नाही. याउलट काँग्रेस सरकारच्या काळात जे प्रयत्न झाले होते त्याला खीळ घातली. आता तेच करायला निघाले आहेत, मात्र त्याचा खर्च वाढला आहे.


प्रश्न : काँग्रेस जगेल की नाही, असे विचारले जाते?


पवार : काँग्रेस व आम्ही एकत्रच आहोत. स्वत:चे काम काहीच नसल्याने ते लपवण्यासाठी असे बोलायचे म्हणून हे बोलत आहेत. विरोधक ‘बुद्धू’ आहेत किंवा ‘ढ ’आहेत असा शब्द मुख्यमंत्री वापरतात. असे आहे
की, संसदीय लोकशाहीत दुसऱ्या बाजूचे ऐकून घेताना एक सभ्यता आणि संस्कृती पाळावी लागते. तसे होत नाही.


प्रश्न : विरोधक म्हणून तरी काँग्रेस उभारी घेईल?


पवार : मला नक्कीच वाटते. १९७७ मध्ये जेव्हा काँग्रेसचा पराभव झाला तेव्हा सगळे लोक म्हणत होते, आता २५ वर्षे काँग्रेस येणार नाही. १९७७ गेले आणि १९८० ला काँग्रेस सत्तेवर आली.


प्रश्न : तुम्ही एवढे राजकारण पाहिले आहे. पक्षांतर होत असते. परंतु सध्या जे चालले आहे ते अभूतपूर्व आहे. एकूणच राजकारणाचा डिस्कोर्स काय आहे?


पवार : सत्तेचा प्रचंड गैरवापर सध्या सुरू आहे. सूडभावनेने सत्तेच्या विरोधी लोकांना त्रास द्यायचा, हे चित्र कधी नव्हते. आज लोक घाबरतात. एक प्रकारे ही सरळ-सरळ अघोषित आणीबाणी या देशात सुरू झाली आहे. राज्यात इथले मुख्यमंत्री करतात, देशात पंतप्रधान करतात. त्यात आता आणखी एकाची अधिकृत भर पडली आहे… देशाचे नवे गृहमंत्री.


प्रश्न : राज्यात वंचित बहुजन आघाडी मोठा रोल प्ले करते आहे, असे चित्र आहे?


पवार : लोकसभा निवडणुकीएवढा प्रभाव आता असेल, असे मला तरी वाटत नाही.


प्रश्न : रोहित पवारांकडे काही वेगळा रोल असणार आहे आगामी काळात?


पवार : असे काही आम्ही निश्चित नाही केले. तो काम करतो आहे. त्याच्याकडे ‘डेव्हलपमेंट’चा अँगल जास्त आहे आणि आम्हाला तो हवा आहे.


प्रश्न : राष्ट्रवादीची पुनर्बांधणी तुम्ही सुरू केली आहे. ती कशी असेल?


पवार : आम्ही सगळं नव्या पिढीच्या हाती देणार आहोत. काल बीडमध्ये बैठक घेतली. ते म्हणाले, आतापासून निवडणुकीची तयारी करायची आहे. एकमताने नावे निश्चित झाली. प्रकाश सोळंके सोडले तर सर्व नवीन आहेत. आम्हाला नवीन पिढी घडवायची आहे. आम्ही यात दोन भाग करतो. विधिमंडळात असलेले, यापूर्वी सरकारमध्ये काम करून अनुभव घेतलेले आणि न्यू कमर्स. अनुभवी लोकांचा नव्या पिढीला लाभ व्हावा हा उद्देश. यशवंतराव चव्हाण यांनी आमच्यासारख्या ५०-६० लोकांना उमेदवारी दिली. मी, जालन्यातून अंकुशराव टोपे, असे अनेक युवक होते. या माध्यमातून चव्हाण साहेबांनी नवी पिढी निर्माण केली. तिने काम केले. आता आमची जबाबदारी आहे, पुढची दहा - वीस वर्षे काम करणारी पिढी तयार करायची.

X