आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातेवाईकही सोडून जात असल्याबद्दल विचारताच शरद पवार पत्रकारावर भडकले 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीमुळे पक्षाचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार प्रचंड अस्वस्थ आहेत. याचा प्रत्यय शुक्रवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत आला. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आता नातेवाईकही (डॉ. पद्मसिंह पाटील) सोडून जात असल्याबद्दल विचारले आणि पवारांचा पारा चढला. त्या पत्रकारावर डाफरून पवार चक्क उठून निघू लागले. नंतर काही जणांनी समजूत काढल्यावर त्यांनी पुन्हा राग गिळून पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

सध्या पक्षांतराचे लोण पवारांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले आहे. उस्मानाबादमधील वजनदार नेते पद्मसिंह पाटील भाजपच्या वाटेवर आहेत. याबद्दल पत्रकाराने विचारले तेव्हा पवार भडकले. "इथं नातेवाइकांचा प्रश्न येतोच कुठं? असे प्रश्न तुम्ही कसे काय विचारू शकता? माफी मागा' असे म्हणत पवार उठून निघाले. मात्र, सोबतच्या नेत्यांनी त्यांना व प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला शांत केले. दरम्यान, पुन्हा पत्रकार परिषद सुरू झाल्यावर पवार म्हणाले, 'पक्षात आणि राजकारणात नात्यागोत्यांना स्थान नसते. पक्षनिष्ठा, पक्षीय विचारांना स्थान असते. लोकशाहीत कोणी कोणत्या पक्षात असावे किंवा जावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या पत्रकार परिषदेत पक्षातील आऊटगोइंगबद्दल एका प्रश्नाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांमध्ये असलेली अस्वस्थता मात्र नकळत अधोरेखित झाली. 

काय म्हणाले पवार 
किमान सभ्यता न पाळणाऱ्या लोकांना तुम्ही बोलवत जाऊ नका. त्यांना बोलवायचे असेल तर मग मला बोलावू नका. आपण गेलात तर बरे होईल, असेही पवारांनी संबंधित पत्रकाराला हात जोडून सांगितले. 

'तो' पत्रकार म्हणाला... 
मी माफी मागण्याचा येथे प्रश्नच उद््भवत नाही. एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे की नाही हा अधिकार तर आपलाच आहे. 

बातम्या आणखी आहेत...