विधानसभा 2019 / दाेन्ही काँग्रेसला प्रत्येकी 125 जागा; आघाडीत 10 जागांची अदलाबदली

'या' कारणामुळे मनसेला आघाडीत जागा नाही

प्रतिनिधी

Sep 17,2019 01:23:45 PM IST

नाशिक - 'पुढील मुख्यमंत्री म्हणून भाजप देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करत आहेे, तर विराेधकांकडे मात्र चेहरा नसल्याची टीका हाेत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत चेहरा महत्त्वाचा नसून स्थानिक प्रश्न आणि राज्याच्या मुद्द्यांचा लाेक जास्त विचार करत असतात,' असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी साेमवारी दिले. मध्य प्रदेश आणि राजस्थानात विराेधकांनी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नव्हते याचीही त्यांनी आठवण करून दिली.


राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. दाेन्ही पक्ष प्रत्येकी १२५ जागा लढवतील, तर मित्रपक्षांना २८ जागा साेडल्या आहेत. दहा जागांवर अदलाबदलीची चर्चा सुरू असल्याचे पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काॅंग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडीत शेतकरी कामगार पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना, जाेगेंद्र कवाडे यांचा रिपब्लिकन पक्ष, डावे हे मित्रपक्ष आहेत.


भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्र देशात अव्वल क्रमांकावर पोहोचल्याचा प्रचार मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेतून करण्यात येत आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता पवार म्हणाले, 'आपले राज्य कितव्या क्रमांकावरून कुठे गेले याचे पुरावे लवकरच प्रकाशित करण्यात येणाऱ्या जाहीरनाम्यात मांडण्यात येतील. जगात फक्त चारच देशांत ईव्हीएमवर मतदान घेण्यात येते. आपल्याकडे बॅलेेट पेपरवर मतदान घ्यावे यासाठी देशातील सर्व विरोधकांसह आपणही मागणी केली आहे,' असे पवार म्हणाले.


भाजपमधील मेगाभरतीबद्दल विचारले असता पवारांनी १९५७ च्या निवडणुकीची आठवण सांगितली. 'त्या वेळी संपूर्ण राज्यात काँग्रेसचा पराभव होऊन संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरकार आले होते. परंतु काही महिन्यांतच सोडून गेलेले नेते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. या वेळच्या पक्षांतराचा वेग मात्र अधिक आहे,' असे पवार म्हणाले. शिवसेना - भाजप एकत्रच लढतील अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. सोडून जाणाऱ्यांपैकी एकानेही त्यांच्यावर झालेला अन्याय मला सांगितला नाही, उलट मी त्यांच्या अंत:करणातच असल्याचे ते म्हणतात, असा टोलाही त्यांनी लगावला.


छगन भुजबळांच्या उमेदवाराला माणिकराव शिंदे यांचा तीव्र विराेध
पवार नाशिकमध्ये असताना छगन भुजबळ मात्र साेमवारी मुंबईत हाेते. 'आघाडीच्या बैठकीसाठी ते गेले,' असे स्पष्टीकरण पवारांनी दिले. दरम्यान, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी येवल्यातून भुजबळांच्या उमेदवारीला विराेध केला. 'आम्हीच २००४ मध्ये भुजबळांना येवल्यात आणले. तेव्हा मला विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिला हाेता, ताे पाळला नाही. त्यामुळे आता स्थानिक असल्याने मलाच उमेदवारी द्या,' असा आग्रह शिंदेंनी धरला.


'राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात २ झेंडे हा निर्णय अजित पवार यांचा वैयक्तिक'
- राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात दाेन झेंडे हे अजित पवारांचे मत वैयक्तिक, पक्षाचा निर्णय नाही
- निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची मनसेची भूमिका आम्हाला मान्य नाही, म्हणून त्यांच्याशी आघाडीचा निर्णय नाही
- वंचित आघाडीमुळे लोकसभेच्या ८ मतदारसंघांमध्ये आघाडीवर परिणाम झाला
- राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला म्हणजे निवडणूक जवळ आली असे समजावे

X
COMMENT