आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली. दाेघांत सुमारे ५० मिनिटे चर्चा झाली. यादरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही माेदींनी बाेलावले हाेते, मात्र शहा काही मिनिटांतच निघून गेले. दरम्यान, महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू असताना पवार-माेदींच्या भेटीने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली हाेती. मात्र माेदींशी राजकीय चर्चा झाली नसल्याचे पवारांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, ‘अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याच्या मुद्द्यावर मोदींशी चर्चा झाली. केंद्र सरकारने विनाअट शेतकऱ्यांना सरसकट व संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी आपण केली. मोदींनीही शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले.’ वसंतदादा इन्स्टिट्यूटकडून ३१ जानेवारीपासून पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे निमंत्रणही पवारांनी माेदींना दिले. महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू आहेत.
राज्यपालांची मदत ताेकडी, केंद्र सरकारला साकडे
‘अतिवृष्टीमुळे राज्यात ५४.२२ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. नाशिक व नागपूर जिल्ह्यातही माेठा फटका बसला. राज्यपालांनी दिलेली मदत तोकडी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट असल्याने केंद्राने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययाेजना कराव्यात. शेतकऱ्यांना विनाअट आणि सरसकट कर्जमाफी द्यावी,’ या मागणीचे निवेदन माेदींना दिल्याची माहिती शरद पवार यांनी टि्वटरवरून दिली.
जागा बदलल्याने नाराज खा. राऊतांचे नायडूंना पत्र
राज्यसभेत आधी तिसऱ्या रांगेत बसणाऱ्या शिवसेना खा. संजय राऊत यांची जागा बदलून पाचव्या रांगेत करण्यात आली आहे. त्यावर नाराजी व्यक्त करत राऊत यांनी सभापती व्यंकय्या नायडूंना पत्र पाठवले आहे. ‘शिवसेनेचा आवाज दडपण्यासाठी हेतुपुरस्सरपणे हा निर्णय घेतला आहे. जनतेचा आवाज मांडण्यासाठी आपल्याला पूर्वीप्रमाणे पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या रांगेतील जागा द्यावी,’ असेही राऊत यांनी म्हटले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.