आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीतील राजकारण : नातवासाठी पवारांची माघार, माढा मतदारसंघ सोडला; पार्थ मावळमधून लढणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर माढा लाेकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून माघार घेतली. साेमवारी पवारांनीच पुण्यात हा निर्णय जाहीर केला. बारामतीमधून कन्या सुप्रिया खासदार आहेत, अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना मावळमधून उमेदवारी मिळावी यासाठी पवारांकडे कुटुंबातूनच आग्रह केला जात आहे. त्यातच स्वत:ही माढ्यातून उभे राहिल्यास घराणेशाहीचा आराेप हाेऊ शकताे. हे टाळण्यासाठी स्वत: माघार घेत पवारांनी नातू पार्थला उमेदवारी दिली. 


‘मावळमधून यापूर्वी दाेनदा राष्ट्रवादीचा पराभव झाला. आता पार्थ यास उमेदवारी द्यावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. शेकापचीही तशी मागणी आहे. नव्या पिढीला संधी दिल्यास हा मतदारसंघ आम्ही जिंकू, असा विश्वास असल्यानेच पार्थला संधी दिली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. पवारांचे दुसरे नातू राेहित राजेंद्र पवारही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, ‘विधानसभा अजून दूर आहे,’ एवढेच सांगत पवारांनी जास्त बाेलणे टाळले. अगतिकतेतून माघार. पान ४


माेहिते गटाचा तीव्र विराेध, हेही माघारीचे कारण
माेदी लाटेतही निवडून आलेल्या विजयसिंह माेहितेंचे तिकीट कापून शरद पवार माढ्यातून उभे राहणार हाेते. त्यामुळे माेहिते गटात तीव्र नाराजी हाेती. त्यांनी पवारांविराेधात उघडपणे मते व्यक्त करणे सुरू केले हाेते. ‘भावी पंतप्रधानांचा माढ्यातून पराभव करू,’ असे मेसेज साेशल मीडियातून फिरत हाेते. हा राेष लक्षात घेऊन पवारांनी माढा साेडल्याचे सांगितले जाते.


पवार बाेलतात एक.. करतात दुसरंच..!
१९ फेब्रुवारी (पुणे)

पार्थ किंवा अजित पवार लाेकसभा लढवणार नाहीच. पवार कुटुंबातून फक्त मी आणि सुप्रियाच ही निवडणूक लढवू,  असे शरद पवार यांनी पुण्यात स्पष्ट केले हाेते. मात्र, आता स्वत: माघार घेऊन पार्थला उमेदवारी.
१ मार्च (अकलूज)
नगरची जागा सुजय विखेंसाठी साेडण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचे पत्रपरिषदेत सांगितले. काही वेळातच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याचा इन्कार केला. नंतर याच निर्णयावर पवार व पक्ष ठाम राहिले.


इतर पक्षांतही घडामोडींना वेग
प्रकाश आंबेडकर सोलापुरातून?

अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी साेलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. या राखीव मतदारसंघात काँग्रेसकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे. आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे शिंदेंसमाेर अडचणी निर्माण हाेऊ शकतात.


सुजय विखेंना गांधी गटाचा विराेध
नगर लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी डाॅ. सुजय विखे पाटील भाजपत प्रवेश करत आहेत. त्यांच्यामुळे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट हाेईल. या पार्श्वभूमीवर गांधींच्या समर्थकांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांसमाेर गाेंधळ घालत विखेंच्या पक्षप्रवेशास विराेध केला.


..तर चौथी आघाडी : जानकर
आघाडी व युतीच्या राजकारणात छोट्या पक्षांची फरपट होत आहे. जागावाटपात या पक्षांचा विचारच केला जात नाही. जर आम्हाला जागा साेडण्याचा विचार झाला नाही तर छाेटे पक्ष मिळून चाैथी आघाडी स्थापन करू, असा इशारा रासपचे नेते महादेव जानकर यांनी भाजपला दिला.

बातम्या आणखी आहेत...