आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांना छळणाऱ्यांना उभे करू नका: शरद पवार, पारनेरमधील सभेत सरकारवर हल्लाबोल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - गेल्या पाच वर्षांत राज्याचा कारभार अशा लोकांच्या हाती आहे, ज्यांच्याकडून शेतकरी, कष्टकरी, कामगार, उद्योजक, दलित, ओबीसी, तसेच आया-बहिणींच्या हितासाठी सत्तेचा वापर केला गेला नाही. त्यामुळे या निवडणुकीस आम्ही विशेष महत्त्व दिले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्यात परिवर्तन घडवण्याचे अावाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी केले. राष्ट्रवादीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शहरातील बाजारतळावर झालेल्या सभेत पवार बोलत होते. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे अध्यक्षस्थानी होते. माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आदी उपस्थित होते.  पवार म्हणाले, शेतकऱ्यांना आत्महत्येच्या वाटेवर नेणारे मत मागण्यासाठी आल्यावर त्यांना दारात उभे करून नका. त्यांची ती लायकी नाही. एकीकडे शे-पाचशे धनिकांची ७८ हजार कोटींची थकबाकी भरणारे सरकार कर्जाच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरातील भांडी बाहेर काढत आहेत. भाजप-सेनेवाल्यांना शेतीविषयी आस्था नाही. शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी होण्याची त्यांची तयारी नाही. दोन पैसे मिळू लागताच सत्ताधाऱ्यांनी कांद्याची निर्यात बंद केली. हे त्यांचे शेतकऱ्यांप्रती प्रेम आहे.

कर्जमाफीचा ३१ टक्के शेतकऱ्यांनाच फायदा 
सरकारने कर्जमाफीची घोषणा केली, प्रत्यक्षात मात्र केवळ ३१ टक्के शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. उर्वरित ६९ टक्के शेतकरी अजूनही कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रात तब्बल १६ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, असे सांगत आम्ही सत्तेत असताना सरसकट ७१ हजार कोटींची कर्जमाफी केल्याची आठवण पवारांनी करून दिली.