आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अकोले - हे अमित शहा जाईल तिकडे काय विचारतात शरद पवार तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले. कधी नाही ते आता झाले गृहमंत्री... चांगली गोष्ट आहे... मोदींच्या मागे मागे राहून तुम्हाला संधी मिळाली... आम्हाला आनंद आहे असा टोला शरद पवार यांनी अकोले येथे जाहीर सभेत अमित शहा यांच्या टिकेला उत्तर देताना लगावला. तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केले अशी विचारणा करणाऱ्या अमित शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड भाषेत उत्तर दिलेच शिवाय भाजप सरकारने नेमकं काय केलं याचा पाढाही वाचला. एकेकाळी देशात महाराष्ट्र उद्योगधंद्यात एक नंबरवर होता. ते कॉंग्रेसने कष्ट घेतले नाही का? असा सवाल करतानाच आम्ही सत्तेत असताना मुंबई बाहेर उद्योगधंदे काढायचा निर्णय घेतला. नाशिकला, औरंगाबाद, पुणे, नागपुर, रांजणगाव याठिकाणी कारखानदारी काढली हजारो हातांना काम देण्याची काळजी घेतली आणि हे विचारतात तुम्ही काय केले. या देशात प्रागतिक निर्णय घेण्यात आले. रोजगार हमी योजनेचा कायदा १९७८ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला त्यावेळी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मी होतो. किती गोष्टी सांगू. या देशातील महिलांना ५० टक्के आरक्षण व समान संधी हा पहिला निकाल महाराष्ट्रात झाला. आणि मग तो देशात गेला त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. मंडळ आयोगाचा निर्णय झाला. हे शहा साहेब बोलतात त्यावेळी मंडळ आयोगावरुन त्यांच्या राज्यात दंगली झाल्या होत्या. लहान समाजावर हल्ले झाले होते. महाराष्ट्रातील जनतेला विश्वासात घेऊन आम्ही त्याचा निर्णय घेतला आणि राबवला त्यावेळीही मी मुख्यमंत्री होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यायला काही लोकांचा विरोध होता. मात्र त्याची तमा न बाळगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं विद्यापीठ आम्ही उभं केलं आणि हे लोक विचारतात तुम्ही काय केले. यावेळी शरद पवार यांनी आपल्या भाषणात भाजपाने काय केलं आहे महाराष्ट्रात हेही सांगितले. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्याचे जाहीर केले आम्ही त्याचं स्वागत केले. पंतप्रधानांना बोलावून त्याठिकाणी जलपुजन केले आणि पाच वर्षांत एक वीटसुद्दा रचली नाही. छत्रपतींचे स्मारक झाले नाही. बंद पडलेल्या इंदू मिलच्या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक कॉंग्रेसचे सरकार बांधणार होते. मात्र सत्ता गेली त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तिथे स्मारक बांधणार असे जाहीर केले. आज त्याठिकाणी एका नव्या पैशाचे काम झालेले नाही. एक घटनातज्ज्ञ व सर्वसामान्य जनतेचं राज्य निर्माण करणार्यांचे स्मारक पाच वर्षांत करता आले नाही आणि मला विचारतात तुम्ही काय केले. यांनी केलं काय तर... रोज जाहिरात येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादाने राज्य करतो सांगतात आणि मंत्रीमंडळात निर्णय घेतला ज्या किल्ल्यांवर शौर्याचा इतिहास घडला त्या किल्ल्यावर आम्ही पर्यटन केंद्र काढणार. त्याठिकाणी हॉटेल, बार काढायला परवानगी देणार त्यात छमछमची व्यवस्था करणार. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले त्यात तलवार तेजाने व शौर्याने चमकल्या त्याठिकाणी दारुचे अड्डे काढण्याचा प्रयत्न करत आहे. यांना शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा अधिकार नाही अशा शब्दात शरद पवार यांनी भाजप सरकारचे कान टोचले. आज त्यांनी जाहीर केले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी पोटी ५० हजार कोटी रुपये दिले. तुम्हाला मिळाले का असा सवाल जनतेला केला मग हे ५० हजार कोटी रुपये गेले कुठे. अहो बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात. तुम्ही - आम्ही कढी खात नाही त्यामुळे भात आणि कढी त्यांनाच माहीत तेच करु शकतात असा टोलाही लगावला. महाराष्ट्र देशाचे महत्वाचे राज्य... जो शेतीबाबत आस्था असलेला घटक... आज राज्याचं नावलौकिक सगळ्यात जास्त आत्महत्या झालेले राज्य म्हणून झालं आहे. सगळ्यात जास्त १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याबाबत शरद पवार यांनी दु:ख व्यक्त केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.