Home | Editorial | Agralekh | sharad-pawar-rpi-shivsena-ncp

पवारांचा 'ट्रोजन' हत्ती !

दिव्य मराठी | Update - May 31, 2011, 04:28 PM IST

शरद पवारांनी अस्सल रजनीकांत शैलीत एकाच फटक्यात १-१२ पक्षी मारले आहेत. म्हणूनच काही जणांना वाटू लागले आहे की आठवले हे शिवसेनेच्या गडावर गेलेले पवारांचे 'ट्रोजन हॉर्स' आहेत.

  • sharad-pawar-rpi-shivsena-ncp

    रामदास आठवले शिवसेनेच्या गडावर दाखल झाले तेव्हाच काही चाणाक्ष राजकीय निरीक्षक म्हणाले की, ही पण शरद पवारांची नवी खेळी असणार. दादर रेल्वेस्थानकाच्या नामांतराचा प्रस्ताव शरद पवारांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12 व्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर सादर केला जाणार आहे. 'दिव्य मराठी'च्या पहिल्याच अंकात प्रस्तुत बातमी प्रसिद्ध झाल्याबरोबर महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमध्ये एकच खळबळ उडाली. रामदास आठवलेंनी 'शिवशक्ती'चा सल्ला न घेताच दादरचे नाव 'चैत्यभूमी' करण्याच्या सूचनेचे लगेच स्वागत केले. मनोहर जोशी, सुभाष देसाई व अन्य नेत्यांनी हात झटकले आणि राज ठाकरेंनी त्यांच्या शैलीत या नामांतराला विरोध केला. राष्ट्रवादीतील काही पुढाऱ्यांनी खासगीत तीव्र विरोधी सूर लावला आणि काँग्रेसचे पुढारी नेहमीप्रमाणे हतबल झाले. आता यापुढे काही दिवस हा जणू महाराष्ट्रापुढचा सर्वांत मोठा प्रश्र आहे, अशा आविर्भावात चर्वितचर्वण होईल. तिकडे उत्तर प्रदेशात मायावतींच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या काँगे्रसला या प्रश्रावर भूमिका घेणे अडचणीचे होईल आणि आठवलेंच्या विरोधात असलेल्या दलित नेत्यांची चांगलीच गोची होईल. सर्व दलित नेते या प्रश्राच्या निमित्ताने एकत्र आणण्याची पवारांना संधी मिळेल आणि आठवलेंना 'शिवशक्ती'चा हात सोडून द्यायला निमित्त मिळेल. पण बाळासाहेब ठाकरेंनी दादरच्या 'चैत्यभूमी' या नामांतराला अनपेक्षितपणे समर्थन दिले तर? खरे म्हणजे बाळासाहेबांना ते तितके सोपे जाणार नाही, कारण ते स्वत: अस्सल 'दादरकर' आहेत. (जरी सध्या त्यांचे वास्तव्य बांद्रा येथे असे तरी!) परंतु अलीकडे बाळासाहेबांनी म्हटले होते की, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला त्यांचा कधीही विरोध नव्हता! प्रत्यक्षात त्यांचे औरंगाबाद येथील नामांतरविरोधी विखारी भाषण एका तत्पर पत्रकाराने लगेच प्रसिद्ध केल्यानंतर शिवसेनेच्या गडावर चांगलीच तारांबळ उडाली. बाळासाहेबांना वाटते तितकी पत्रकारांची स्मृती अधू नसते; परंतु तेव्हा तो प्रश्र औरंगाबादच्या जिव्हाळ्याचा होता. वस्तुत: नामांतर या संकल्पनेला शिवसेनेचा विरोध नाही. ज्या औरंगाबादमधील विद्यापीठाच्या नामांतराला ठाकरे यांचा विरोध होता. त्याच शहराला 'संभाजीनगर' असे नाव त्यांनीच दिले आहे. शिवाय मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजींचे नाव त्यांच्याच नेतृत्वाखाली दिले गेले. आपलेही शिवप्रेम कमी नाही हे सिद्ध करण्यासाठी मग सुरेश कलमाडींनी पुढाकार घेऊन मुंबईच्या व्हीटी ऊर्फ व्हिक्टोरिया टर्मिनसचे छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे नामांतर केले. शिवसेना त्या रेल्वेस्थानकाच्या नामांतराला विरोध करू शकली नाही. मग आता कोणत्या तोंडाने ते 'चैत्यभूमी' नावाला विरोध करणार? थोडक्यात, शरद पवारांनी अस्सल रजनीकांत शैलीत एकाच फटक्यात १-१२ पक्षी मारले आहेत. म्हणूनच काही जणांना वाटू लागले आहे की, आठवले हे शिवसेनेच्या गडावर गेलेले पवारांचे 'ट्रोजन हॉर्स' आहेत. रोमच्या रोमहर्षक इतिहासात अशाच 'ट्रोजन हॉर्स'ने शत्रुपक्षाच्या सैन्यात दाणादाण उडवून दिली होती. एका भव्य लाकडी घोड्याच्या आत सशस्त्र सैनिक भरून तो घोडा उचित स्थळी पोहोचताच त्यातील सैनिकांनी अनपेक्षितपणे बाहेर येऊन हल्ला चढविला होता. त्या 'ट्रोजन हॉर्स' संकल्पनेत दोन सूत्रे होती. एक होते अनपेक्षित व आकस्मिक हल्ला करण्याचे आणि दुसरे होते. शत्रूच्या थेट अड्ड्यात गनिमी पद्धतीने घुसण्याचे. गंमत म्हणजे शरद पवारांनी आजवर अनेकांना कात्रजचा घाट दाखविला आहे. शिंगांना मशाली लावून पाठविलेले बैल एकीकडे आणि खरा फौजफाटा दुसरीकडे! असो. रिपब्लिकन पक्षाचे चिन्ह हत्ती आहे. त्यामुळे पवारांनी हॉर्सऐवजी 'ट्रोजन एलिफंट' पाठविला, असे म्हणावे लागेल. या खेपेस मात्र शिवाजी महाराजांच्या गनिमी तंत्राऐवजी रोममधील 'ट्रोजन हॉर्स'ची खेळी पवारांनी केली. रोम ही इटालीची राजधानी. आपण इटालियन तंत्राचाही वापर करू शकतो असे तर पवारांना सुचवायचे नसेल ना? काही राजकीय निरीक्षकांच्या मते ही रोमन गनिमी कल्पना खुद्द रामदास आठवलेंचीच असावी. शिवसेनेने मराठवाड्यात आपली मुळे रुजविली आणि विस्तारली ती मुख्यत: त्यांच्या जाज्वल्य दलित व मुस्लिमविरोधी राजकारणातून. बरेच दंगेही झाले. परिणामी, खुद्द काँग्रेस पक्षातही जाती-जातीत तट पडले. एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या गेलेल्या मराठवाड्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार निवडून आले. त्यानंतर पवारांनीही त्यांच्या राजकारणाचा पाया बदलून मराठा जातीला ओबीसी दर्जा मिळावा म्हणून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू केले; परंतु त्यामुळे छगन भुजबळ दुरावले गेले. तिकडे भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे दुरावले गेलेच होते. त्यातून भुजबळ-मुंडे अशी प्रच्छन्न ओबीसी युती जन्माला येण्याची चिन्हे निर्माण झाली. अशा स्थितीत आठवलेंनाही वाटले असणार की, आपल्याभोवतीची राष्ट्रवादींनी घातलेली कोंडी फोडायची तर थेट शिवसेनेच्या गडावरच जायचे. परिणामी, सेनेचा दलित-रिपब्लिकन विरोध मवाळ होईल! मुंबई, ठाणे, नाशिक महापालिकांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ही जातीय नेपथ्यरचना योग्य वठली तर सर्वच पक्षांना आपापली समीकरणे पुन्हा बसवावी लागणार हे उघड आहे. आठवले हे पवारांचे 'ट्रोजन हॉर्स' म्हणजे आजच्या संदर्भात 'ट्रोजन हत्ती' असतीलच तर हा रोमन गनिमी कावा यशस्वी झाला आहे, असे म्हणून साहेबांचे अनुयायी एकमेकांना टाळया देतील! नाही तरी त्यांच्या अनुयायांना टाळया देण्यापलीकडे पक्षात फारसे काही करता येतच नाही!

Trending