आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५६ इंचांची छाती आहे, तर मग कुलभूषणला सोडवून आणा : माेदी सरकारला शरद पवारांचे आव्हान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 कराड   -  भाजप सरकारला सत्तेतून पायउतार करण्याचा निर्धार करणाऱ्या काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ रविवारी कराडमध्ये फोडण्यात आला. या सभेत बोलताना शरद पवार यांनी शेतकरी कर्जमाफीसह इतर मुद्द्यांवरून भाजप सरकारला घेरले. राज्यातील पन्नास टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. ‘५६ इंचांची छाती असल्याचा अभिमान जर या सरकारला आहे तर पाकिस्तानी तुरुंगातून  कुलभूषण जाधवला सोडवून का आणत नाही? पाकला गुपचूप शुभेच्छा का देता? असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

 


राफेलचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांनी या प्रकरणी चौकशीला का घाबरता, अशी विचारणा केंद्र सरकारला केली. हवाई दलाचा अभिमान असल्याचे सांगत भाजप सरकार सैनिकांच्या पराक्रमाचा राजकीय लाभासाठी वापर करत असल्याची टीका पवारांनी केली. सैनिकांच्या पराक्रमाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनता या निवडणुकीत जागा दाखवून देईल, असे ते म्हणाले. या वेळी अजित पवार, काँग्रेस नेते  व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार उदयनराजे भाेसले यांच्यासह घटक पक्षांचे नेते उपस्थित होते.

 

 

शेतकऱ्यांची स्थिती बदलण्यासाठी सत्तेत बदल करा
साताऱ्याचे लोकसभा मतदारसंघातील अाघाडीचे उमेदवार  खासदार उदयनराजे म्हणाले, ‘जेव्हा लोक एका विचाराने एकत्र येतात, तेव्हा त्यांचे उद्दिष्ट एक असते. ज्या वेळी स्वार्थासाठी एकत्र येतात तेव्हा ते स्वार्थाचाच विचार करतात. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत लोकांची दिशाभूल केली गेली. जनता त्याला बळी पडली. आज सत्ताधाऱ्यांना त्याच लोकांचा विसर पडला. अन्यायकारक  निर्णय घेण्यात आले. मोदींच्या आश्वासनाला जनता बळी पडली. भाजपला मत देऊन काय मिळाले, ते समजत आहे. शेतकऱ्यांची स्थिती बदलायची असेल तर सत्तेत बदल करा.’

 

आता नरेंद्र मोदी पंतप्रधान असणार नाहीत. मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी केवळ २८ टक्केच पूर्ण झाली आहेत. या सरकारने महागाई वाढू नये म्हणून जाणीवपूर्वक शेतीमालाचे दर पाडले. शिवाय, गेल्या ४५ वर्षांत प्रथमच बेरोजगारीचा दर प्रचंड वाढला आहे. - पृथ्वीराज चव्हाण 
 

 

भाजपचे ‘अच्छे दिन’ नव्हे  तर लुच्चे दिन : राजू शेट्टी 
माेदी सरकारने शेतकऱ्यांना फक्त आश्वासने दिली. भाजपने अच्छे दिन नाही तर लुच्चे दिन दिले. शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकऱ्याने कुटुंबासह बँकांचे उंबरठे झिजवले तरी अजूनही कर्जमाफी मिळाली नाही, असे खा. राजू शेट्टी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...