आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसानेसुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत', मोदींवर शरद पवारांचा घणाघात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नड- "पंतप्रधान हे पद देशाच्या इज्जतीचे पद आहे. आम्ही त्याचा सन्मान करतो. आम्ही पंतप्रधान पदाची बेइज्जत कधी होवू देणार नाही. परंतु पंतप्रधान पदावर बसलेल्या माणसाने सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा राहिल अशी पावले टाकली पाहिजेत", असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कन्नडच्या जाहीर सभेत मोदींना दिला. 
"सत्तेवर आल्यावर सर्व समाजघटकाला न्याय मिळवून देणे हे तुमचे कर्तव्य होते. परंतु, आज काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर खटला दाखल केला जात आहे. यासाठीच तुम्हाला सत्ता दिलीय का? सत्तेचा गैरवापर होत आहेत. ठिकठिकाणी आम्ही बघत आहोत, विरोधकांवर खटला भरला जातोय. काँग्रेस पक्षाचा आवाज बंद करायची पावले ते टाकत आहेत. 371 कलमामुळे नागालॅंड, मेघालय, अरुणाचल, सिक्कीम येथे आपल्याला जमिन घ्यायचा अधिकार नाही. त्यामुळे देशात 370 किंवा 371 हा प्रश्न नाहीय. तर माझ्या शेतकर्‍यांच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, कपाशीला भाव कसा मिळेल हा खरा प्रश्न आहे." असा घणाघात पवारांनी केला. 

पुढे ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते त्यावेळी त्यांनी सत्तेवर आल्यावर कपाशीला 7 हजाराचा भाव देवू असे सांगितले होते. दिला का? असा सवालही शरद पवार यांनी केला. तसेच, कपाशीला भाव द्या, बाजरीला भाव द्या, मक्याला भाव द्या म्हटलं तर 370 बद्दल बोलतात. नोकरी, बेरोजगारीबाबत बोललो तर 370 सांगितले जाते. काय करावं या लोकांचं... हे लोक रात्री झोपेतही 370 बडबडत असतील", असा टोलाही शरद पवार यांनी लगावला. 
"जळगावला पंतप्रधान आले होते. त्यावेळी 370 बद्दल तुमचं काय मत आहे असं मला विचारलं होतं. चला माझा पाठिंबा आहे, पण काय फरक पडणार आहे का. आम्ही साथ दिली. त्यावेळी आम्ही काश्मीरमधील लोकांना विश्वासात घ्या. म्हणजे दुसर्‍या देशातील लोक गैरफायदा घेणार नाही असा सल्ला सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी दिला होता. मात्र, आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला हे सांगत आहेत." असेही शरद पवार म्हणाले. "पंतप्रधान व अमित शहा देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही गेले की, त्यांच्या तोंडात एकच नाव शरद पवार... काय करावं यांचं सांगा... मी या देशात काय केलं हे देशातील जनतेला माहित आहे. कन्नडची पंचायत समिती आहे त्यात महिला आहेत. त्यांना 50 टक्के आरक्षण कुणी दिले. मंडळ आयोगाचा निर्णय झाला त्यावेळी देशात दंगली झाल्या. परंतु महाराष्ट्रात तो एकमताने राबवला गेला त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो," याची आठवण प्रश्न विचारणा करणार्‍या अमित शहा यांना करुन दिली.
"आज कन्नड हे राज्यातील सर्वात खराब रस्ते असलेलं शहर म्हणून ओळखलं जात आहे. या भागाचा विकास करण्यासाठी एक अनुभवी व्यक्तीमत्व निवडून येणं गरजेचं आहे. ज्यांच्या हाती सत्ता आहे ते विभाग न सुधारण्याची त्यांची रणनीती असेल तर त्यांना बाजूला हटवण्याची गरज आहे. आपल्या भागात संतोष कोल्हे अनेक वर्ष नगराध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळे विकासाचा दांडगा अनुभव असलेले संतोष कोल्हे यांना संपूर्ण तालुक्याची जबाबदारी देण्याची वेळ आली आहे," असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

मुख्यमंत्र्यांचं स्वागत शेतकरी जीव देवून करत आहेत


कन्नडनंतर वैजापूरमध्ये बोलत असताना शरद पवार म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांचे स्वागत जीव देवून विदर्भातील एका जिल्हयात शेतकरी करत आहेत. आज भाजपच्या हातात सत्ता असल्याचे परिणाम भोगावे लागत आहेत हे चित्र बदलायला हवे की नको," असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी वैजापूरच्या जाहीर सभेत जनतेला केला. 

 
बुलढाणा जिल्हयातील शेगाव येथे एका तरुण शेतकर्‍याने मुख्यमंत्री बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर असताना कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. तोच धागा पकडत शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. शेतकरी पिकवतात त्याची किंमत त्यांना मिळत नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे पीक वाया गेलं. आजचे मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना भाजपाची सत्ता आल्यावर कापसाला 7 हजार रुपये भाव देतो असं सांगत होते. सत्ता आली परंतु पाच वर्षांत कापसाला 7 हजार नव्हे 5 हजार रुपयेही भाव दिला नाही. एका बाजूला पिकाचे नुकसान, दुसर्‍या बाजूला विहिर गेली म्हणून नुकसान, तिसर्‍या बाजुने किंमत मिळत नाही म्हणून नुकसान. या सगळ्या गोष्टीने त्रासलेला शेतकरी आत्महत्या करत आहे असेही शरद पवार म्हणाले.