आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - मुंबईतील पादचारी पुलांच्या दुरवस्थेबाबत मध्य रेल्वेने साडेतीन वर्षांपूर्वीच एका पत्राद्वारे अवगत केलेले असतानाही सरकारने ती बाब गांभीर्याने न घेतल्याबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही केली. याशिवाय मुंबईतील या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले असतानाही तो कोसळल्याने या संपूर्ण ऑडिट प्रक्रियेचीही चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.
मध्य रेल्वेने ११ नोव्हेंबर २०१५ ला एका पत्राद्वारे मुंबईतील पादचारी पुलांच्या दुरवस्थेची माहिती राज्य सरकारला दिली होती. हे पत्रच पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत वाचून दाखवले. ते म्हणाले, ‘मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. या राजधानीत विरार ते चर्चगेट व कर्जत ते सीएसटी या दोन प्रमुख रेल्वेमार्गांवर दररोज १ कोटी लोक प्रवास करतात. या प्रवासादरम्यान दिवसाला किमान दहा ते पंधरा अपघात होऊन या अपघातात वर्षाला जवळपास अडीच ते तीन हजार लोकांचा मृत्यू होतो, तर दर महिन्याला साधारण दोन ते तीन हजार प्रवासी जखमी होतात, असे सांगत एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अपघातांबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
बुलेट ट्रेनचा निधी रेल्वेवर खर्च करा
रेल्वेशी संबंधित असुविधांचा पाढा वाचताना शरद पवार यांनी बुलेट ट्रेनच्या मुद्द्याकडेही लक्ष वेधले. बुलेट ट्रेनसाठी सव्वा लाख कोटींचा खर्च होणार आहे. मात्र, सरकारने हा प्रकल्प रद्द करून तो पैसा मुंबई उपनगरीय रेल्वे व इतर रेल्वे सर्कल्सवर खर्च करावा, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय मुंबई, दिल्ली, कोलकाता ते चेन्नई या शहरांदरम्यानच्या रेल्वे मार्गाचे जाळे सक्षम करण्यासाठीही हा निधी वापरावा, अशी सूचनाही केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.