political / मोदींनी एका धर्माची बाजू घेऊन दुसऱ्या धर्माबद्दल आकस निर्माण केला - शरद पवार; संवाद साधण्यासाठी शरद पवारांनी प्रथमच घेतला सोशल मीडियाचा आधार

विषय भरकटवण्यासाठी विलीनीकरणाचा मुद्दा

विशेष प्रतिनिधी

Jun 10,2019 10:33:00 AM IST

मुंबई - आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न व बेरोजगारीचे मुद्देच प्रचारात मांडले. परंतु मोदींनी राष्ट्रवादाचा मुद्दा मांडल्याने देशावर संकट आले असून अगोदर त्याचा सामना करणे आवश्यक असल्याचे मत जनतेचे झाले. मोदी यात यशस्वी झाले. घरात घुसून मारू, असे त्यांनी म्हटले ते जनतेला आवडले. परंतु त्यांनी पाकिस्तानात घुसून नव्हे तर काश्मिरातच हल्ले केले, हे लोकांना ठाऊक नाही. त्यांनी एका धर्माची बाजू घेऊन दुसऱ्या धर्माबाबत आकस निर्माण केला. भविष्याच्या दृष्टीने चांगले नाही. पुढील वेळी आणखी नवीन विषय काढून लोकांच्या भावना चेतवण्याचा प्रयत्न करतील, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे.


फेसबुक लाइव्हवरून ते लोकांशी संवाद साधत होते. प्रथमच संवादासाठी त्यांनी अशा माध्यमाचा वापर केला आहे. थेट संवाद साधण्यात जी मजा आहे ती यात नाही, मला थेट सुसंवाद साधण्यास आवडतो असेही ते म्हणाले. पवार म्हणाले, पराभवाने निराश होण्याची गरज नाही. भाजपचे २ खासदार होते आज ३०० वर आहेत. २ खासदार होते तेव्हा ते नाऊमेद झाले नाहीत. त्यांनी काम सुरु ठेवले. १९७७ मध्ये इंदिरा गांधी, संजय गांधी यांचाही पराभव झाला परंतु १९८० ला इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. पराभव झाला याचा अर्थ संपलो असे नाही. त्यामुळे पराभवाची चिंता करायची नसते. सरकारने कर्जमाफीबाबत प्रचार केला. तासंनतास बसवले पण सरसकट कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही त्याच्याबाबत जनतेच्या मनात राग आहे. आम्ही याची माहिती गोळा करीत आहोत. तसेच पिक विम्याबाबतही माहिती गोळा करीत असून जलयुक्त शिवारमध्ये झालेल्या बोगस कामाची माहिती जमा करीत आहोत आणि त्यानंतरच याबाबत बोलणे योग्य होईल असेही एका प्रश्नाच्या उत्तरात शरद पवार यांनी सांगितले.

विषय भरकटवण्यासाठी विलीनीकरणाचा मुद्दा
काँग्रेसमध्ये विलीनीकरणाबाबत एकाने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, कोणतेही कारण नसताना विषय ड्रायव्हर्ट करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने झाला आहे. आम्ही आमच्या विचाराने काम करतो. समाजाच्या हितासाठी काही विषयावर मान्यता प्राप्त अंजेडावर काम करतो. दोन्ही पक्ष एका समान विचारावर काम करीत आहेत आणि राहतील.

X
COMMENT