आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरसकट कर्जमाफीवरून शरद पवारांचा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यासाठी सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी इंदापुरात सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर फडणवीस सरकारची कोंडी करण्यासाठी पवार यांनी सरसकट कर्जमाफीचा विषय उपस्थित केला असून त्यायोगे राष्ट्रवादी आपला गमावलेला शेतकरी जनाधार शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात आहे.

 
पवार यांनी रविवारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील दुष्काळी गावांचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी राज्यात दुष्काळाचे अभुतपूर्व संकट असून राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे. त्यासाठी आपण सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. तसेच केंद्रात नव्या सरकारचा शपथविधी पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे सांगितले.  राज्यातल्या फडणवीस सरकारने २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. त्यात ५ एकरापर्यंतच्या थकबाकीदार अशा ८९ लाख शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी होणार होती. प्रत्यक्षात ३८ लाख ५२ हजार शेतकऱ्यांची एकूण १४ हजार ९८३ कोटींची म्हणजेच थकबाकीदार पैकी ४३ टक्के शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. राज्यात १ कोटी ३६ लाख वहिती शेतकरी खातेदार आहेत. त्यात अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांची ९० टक्के संख्या आहे. राज्यातील ९० टक्के शेतकरी कर्जदार आहेत. त्यातील ४४ लाख शेतकरी थकबाकीदार असून ३५ लाख शेतकरी नियमित कर्ज भरतात. राज्यावर सध्या ४ लाख १४ हजार ४११ कोटी रुपयांचे सार्वजनिक असे कर्ज आहे. सरसकट शेतकरी कर्जमाफी केल्यास दीड लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळेच हे शक्य नाही, याची पवारांना चांगली माहिती आहे. म्हणूनच अशक्य अशी मागणी करत पवार यांनी फडणवीस सरकारला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे.
 

राज्य सरकारही मास्टर स्ट्रोक मारण्याच्या तयारीत
फडणवीस सरकारने २०१६ ते २०१८ या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मास्टर स्ट्रोक मारण्याची तयारी चालवली आहे, असे मंत्रालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...