NCP / शरद पवार विभागनिहाय घेणार पक्षकामाचा आढावा, गुरुवारपासून घेणार जिल्हानिहाय बैठका

विधानसभेलाही काँग्रेसपेक्षा वरचढ ठरण्याचे ध्येय

विशेष प्रतिनिधी

Jun 12,2019 09:54:00 AM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत आघाडी असतानाही काँग्रेस राज्यात विशेष करामत दाखवू शकली नाही. त्यांचा एकच खासदार निवडून आला, तोही शिवसेनेतून आयात केलेला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र काँग्रेसपेक्षा चांगले यश मिळवल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आणून सत्ता गाठण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवले आहे. यासाठी ते स्वतः निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेवणार असून याची सुरुवात गुरुवारपासून केली जाणार आहे.


सोमवारी पक्षाच्या २० व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर आता १३ जूनपासून प्रदेश कार्यालयात जिल्हानिहाय बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकांना जिल्हाध्यक्ष, आमदार, माजी आमदार, नेते, पदाधिकारी यांना बोलावण्यात आले असून त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे. लोकसभेला आपले काय चुकले, कोठे मते कमी पडली, काय केले पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर प्रचार केला पाहिजे आदी विषयांवर या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे राष्ट्रवादीतील सूत्रांनी सांगितले.


राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार
या बैठकांना प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस व खासदार सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुप्रिया सुळे हे नेते उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


नाशिक, जळगाव, नगरला साधणार संवाद
१३ जून रोजी सकाळी १० ते १२ मुंबई, १२ ते १२.३० वसई, १४ जून रोजी सकाळी १० ते ११ नाशिक शहर, ११ ते १२ नाशिक ग्रामीण, मालेगाव, १२ ते १ धुळे शहर, ग्रामीण, २ ते २.३० नंदुरबार, २.३० ते ३. ३० जळगाव शहर, ग्रामीण, ३.३० ते पुढे अहमदनगर शहर, ग्रामीण येथील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधणार आहेत.

X
COMMENT