आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बळीराजा कृतज्ञता दिन' म्हणून साजरा झाला शरद पवारांचा 80 वा वाढदिवस, शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांना करणार मदत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस गुरुवारी मुंबईत बळीराजा कृतज्ञता दिन साजरा करण्यात आला. बळीराजाच्या मदतीसाठी १ कोटी ८० लाख रुपयांचा कृतज्ञता कोष या निमित्ताने उभारण्यात आला आहे. यातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जाणार आहे. आपली बांधिलकी शेवटच्या माणसाशी, तरुण पिढीशी आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी काम करायला हवे, असे शरद पवार या वेळी म्हणाले.

शरद पवार म्हणाले, माझा जन्मदिवस माझ्या लक्षात राहत नाही, परंतु माझ्या आईचा जन्मदिवसही १२ डिसेंबरच असल्याने तो लक्षात राहतो. माझ्या पत्नीचा जन्मदिवस १३ डिसेंबर आहे. ज्येष्ठ अभिनेते व माझे जवळचे मित्र दिलीपकुमार यांचा ११ डिसेंबर आहे. माझ्या काही मित्रांचा वाढदिवस ११, १२,१३ डिसेंबर असाच आहे. त्यामुळे आम्ही कोणाच्या तरी घरी खासगीरीत्या भेटतो आणि वाढदिवस साजरे करतो. माझ्या आईने कष्टाने आम्हाला शिकवले. १९३६ मध्ये लोकल बोर्डावर निवडून आलेल्या माझ्या आईने महिलांसाठी काम केले. मुलींचे शिक्षण व्हावे असा तिचा आग्रह होता, असेही पवार यांनी सांगितले.

स्वाभिमान काय असतो हे पवारांनी दाखवले - पाटील


मंत्री जयंत पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारा हा महाराष्ट्र असून दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे छत्रपतींनी दाखवून दिले. आता दिल्लीला स्वाभिमान काय असतो हे शरद पवार यांनी दाखवून दिले आहे.


आकाशगंगेचा तळ सापडत नाही त्याप्रमाणे पवारसाहेब यांच्या कामाचा तळ सापडत नाही. ८० व्या वर्षात नव्या पिढीला उभे करण्याचे काम फक्त पवारसाहेब करत आहेत. पवारसाहेबांनी ऐतिहासिक कर्जमाफी केली त्याची नोंद होईल. इतिहास पुरुष म्हणून आम्ही त्यांची ओळख सांगतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांचे अभीष्टचिंतन केले. या वेळी सुप्रिया सुळे व अजित पवारही उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलांना करणार मदत

पवार म्हणाले, या धनादेशातून गरजू-संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत, तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलाच्या आईच्या नावावर बँकेत ५० हजार रुपये फिक्स डिपॉझिट म्हणून जमा करण्यात येतील. त्याच्या व्याजातून मुलाच्या शिक्षणाचा खर्च ती माऊली करू शकेल. ही रक्कम कमी असली तरी त्याची व्याप्ती वाढवली जाईल.