Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Sharad Pawar's command again on district NCP

जिल्हा राष्ट्रवादीवर पुन्हा शरद पवारांचीच कमांड! छगन भुजबळ गटाला मिळाले झुकते माप

अनिरुध्द देवचक्के | Update - Aug 22, 2018, 12:16 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून नगर जिल्ह्यात शरद पवारांना मनोभावे साथ देणाऱ्या निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यां

  • Sharad Pawar's command again on district NCP

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून नगर जिल्ह्यात शरद पवारांना मनोभावे साथ देणाऱ्या निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यांची, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री झाल्यापासून होत असलेली घनघोर उपेक्षा नवीन जिल्हाध्यक्ष निवडीनंतर आता संपल्यात जमा आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी कर्जतचे ज्येष्ठ नेते राजेंद्र तात्या फाळके यांची निवड झाल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच आता नगर जिल्ह्याची कमान पुन्हा एकदा हाती घेतल्याचे स्पष्ट झाले. नगर जिल्ह्यामध्ये पहिल्यापासूनच फक्त आणि फक्त शरद पवारांना 'डिमांड' होती आणि त्यांची जिल्ह्यावर कमांडही होती. मधल्या काळात अजितदादा पवारांनी नगर जिल्ह्यामध्ये स्वतःला मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा वेगळा पक्षांतर्गत गट निर्माण केला होता. मूळ पवार साहेबांचा गट आणि अजितदादांचा गट असा एक सुप्त संघर्ष नगर जिल्ह्यामध्ये अस्तित्वात होता. त्याकाळात पक्षामध्ये फक्त अजितदादांची चलती असल्यामुळे जुने निष्ठावान कार्यकर्ते पक्षापासून काहीसे अलिप्त झाल्याचं चित्र पहायला मिळत होतं. त्याचाच फटका लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. आता ऐन निवडणुकांच्या तोंडावर विद्यमान जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले पाटील यांची उचलबांगडी करून त्यांच्याजागी राजेंद्र फाळके यांची नियुक्ती करण्यात आली. इतकेच नाही राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यकारिणीवर एक नजर टाकली, तर त्यामध्ये छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनाही झुकते माप दिले असल्याचे लक्षात येईल.


    नगर जिल्ह्यातून शरद पवार समर्थक ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या आग्रहाखातर राजेंद्र फाळके आणि त्याचबरोबर संदीप वर्पे यांची कार्याध्यक्ष, तर अविनाश आदिक यांची सचिव म्हणून नियुक्ती झाली. नगर जिल्ह्याच्या यादीमध्ये असलेली आणखी दोन नाव म्हणजे अंबादास गारूडकर आणि पांडुरंग अभंग. हे दोघेही छगन भुजबळ यांचे समर्थक आहेत. भुजबळांच्या कार्यकर्त्यांमध्ये कृष्णकांत कुदळे (पुणे), कैलास कामोद (नाशिक), सुरेंद्र जयस्वाल (नांदेड), प्रा. दिवाकर गमे (वर्धा), प्रा. भंडारे (सोलापूर), बापूसाहेब भुजबळ (मुंबई), रमेश बारस्कर या भुजबळ समर्थकांचा समावेश आहे.


    या कार्यकारिणीमध्ये असलेली बरीचशी नावं शरद पवार यांच्यासमवेत एस काँग्रेसचा स्थापनेपासून असलेली आहेत. त्यामुळे पवार आणि भुजबळ यांनी पुन्हा एकदा पक्षावर कमांड मिळवल्याचे स्पष्ट होते आहे. नगर जिल्ह्यातील अजित पवार समर्थक म्हणून ओळखले जाणारे सुजित झावरे, वैभव पिचड ही नावं बाजूला पडले आहेत. एकेकाळी या नावाचा दबदबा फार मोठा होता. नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या संबंधाने दादाभाऊ कळमकर यांनी शरद पवारांकडे नाराजी व्यक्त केली होती. पक्षाचे जुने कार्यकर्ते पक्षापासून दूर चालले असल्याचे त्यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. अजित पवारांनीही ही परिस्थिती विचारात घेऊन शरद पवार गटाशी मिळतंजुळतं धोरण ठेवले. कर्जत जामखेड मतदारसंघांमध्ये अंबालिका कारखाना चालवण्यास घेतल्यापासून राजेंद्र फाळके यांच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न अजितदादांनी केल्याचे दिसते आहे. पूर्वी फाळके आणि अजितदादा या दोघांमधून विस्तवही जात नसल्याचे खासगीत सांगितले जात होते. आता मात्र परिस्थिती बदललीय.


    नगर जिल्ह्याच्या राजकारणात राष्ट्रवादीने खेळलेली ही खेळी आगामी निवडणुकांच्या कालखंडामध्ये एखादं वेगळं चित्र निर्माण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीचे तिकीट वाटप आणि विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात येणारी मातब्बर नावं ठरवण्याची जबाबदारी या नव्या जिल्हा कार्यकारिणीवर असेल आणि त्यामध्ये शरद पवार यांच्याशी थेट संपर्क असलेल्या दादाभाऊ कळमकर यांचा पुन्हा एकदा वरचष्मा प्रस्थापित होईल, असेच आजचे जिल्हा राष्ट्रवादीचे चित्र आहे.

Trending