आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांचे गुगली अस्त्र, 18 दिवसांमध्ये 10 विधाने! 'आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला' ते 'महाआघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करत आहोत'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक : राज्याच्या राजकारणात सध्या दोन व्यक्तींची वक्तव्ये लक्षवेधी ठरत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. यापैकी राऊत यांनी पहिल्या दिवसापासून 'शिवसेनेचाच मुख्यमंत्री बनणार' हे एकच पालुपद लावून धरले आहे, तर पवारांचे प्रत्येक दिवसाचे प्रत्येक वाक्य गुगली ठरत आहे. 'पवार जे बोलतात त्याच्या नेमके उलट करतात' या त्यांच्याबद्दलच्या धारणेस या वेळीही पुष्टी मिळत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत बिनीचे सूत्रधार असूनही त्यांच्या विधानांचा आणि ते खेळत असलेल्या राजकीय चालींचा कोणताच थांगपत्ता लागताना दिसत नाही.


'जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे' या वाक्यापासून सुरू झालेला पवारांच्या विधानांचा हा प्रवास गेल्या १८ दिवसांच्या विविध वळणांनंतर 'महाआघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करत आहोत' यावर आला आहे.


मतदानाच्या आधी पत्रकार परिषदेत तोल गेलेले पवार मतदान झाल्यापासून प्रत्येक पत्रकार परिषदेत आपल्या गुगलीने काहींच्या पोटात गोळा आणत आहेत तर काहींच्या मनात गुदगुल्या निर्माण करीत आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्ताने दिल्ली मुक्कामी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यावर पुन्हा एकदा 'सरकार कधी बनवणार हे शिवसेना-भाजपला विचारा' हे विधान करून त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसह सेनेच्या आमदारांच्या पोटात गोळा आणला, तर भाजपच्या गोटात गुदगुल्या निर्माण केल्या.


'आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला' ते 'महाआघाडीतील मित्रपक्षांशी चर्चा करत आहोत'


१ नोव्हेंबर, मुंबई : सोनिया गांधींचा फोन आला होता, देशातील आर्थिक अस्थिरतेबाबत चर्चा झाली, राजकीय संभाषण झाले नाही


२ नोव्हेंबर, सटाणा : संजय राऊतांनी माझी भेट घेतली, पण राजकारणाबद्दल चर्चा झाली नाही.


४ नोव्हेंबर, दिल्ली : शिवसेनेकडून आम्हाला सत्तास्थापनेचा कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळे त्यांना पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही.


६ नोव्हेंबर, मुंबई : सत्तास्थापनेचा कौल भाजप आणि शिवसेनेला आहे. त्यांनी राज्यात लवकरात लवकर सरकार स्थापन करावं.


८ नोव्हेंबर, मुंबई : राज्यातील जनतेने आम्हाला विरोध बसण्याचा कौल दिला आहे, आम्ही जबाबदार विरोधी पक्ष बनू.


११ नोव्हेंबर, मुंबई : फक्त राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेनेला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही.


१२ नोव्हेंबर, मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषद : आम्हाला कसलीही घाई नाही. राज्यपालांनी भरपूर वेळ दिला आहे.


१३ नोव्हेंबर, मुंबई : लवकरच राष्ट्रपती राजवट संपेल, पुन्हा निवडणूका लागणार नाहीत.


१५ नोव्हेंबर, नागपूर : शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष प्रयत्न करत आहोत. राज्यात आमचे सरकार बनेल आणि पाच वर्ष चालेल.


१८ नोव्हेंबर, दिल्लीत सकाळी : शिवसेना-भाजपने एकत्रितरीत्या निवडणूक लढवली आहे. आम्ही त्यांच्यासोबत लढलो नव्हतो. यामुळे सरकार स्थापनेबद्दल त्यांनाच विचारा.


१८ नाेव्हेंबर, दिल्लीत सायंकाळी : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत साेनिया गांधींना माहिती दिली. सत्ता स्थापनेबाबत मात्र अामच्यात काेणतीही चर्चा झाली नाही. मित्रपक्षांशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ.


पवार समजून घ्यायला १०० जन्म लागतील : राऊत
शरद पवार यांनी मंगळवारी सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले होते. यावरून अनेक तर्क-वितर्कही सुरू झाले होते. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले, 'आपल्याला पवारांवर अजिबात शंका नाही. काही दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईतील एका नेत्याने नरेंद्र मोदी यांना समजून घेण्यासाठी राऊतांना २५ जन्म लागतील असे वक्तव्य केले होते. तसेच मी या देशातील सर्वांना सांगू इच्छितो की शरद पवार यांना समजून घेण्यासाठी १०० जन्म लागतील.'
 

बातम्या आणखी आहेत...