बैठक निष्फळ / साताऱ्याच्या राजेंचा वाद विकोपाला; शरद पवारांची मध्यस्थीही अयशस्वी, रामराजे-उदयनराजेंनी काढली एकमेकांची उणीदुणी

लाेकांवर अन्याय होत असेल तर चक्रम : उदयनराजे
 

विशेष प्रतिनिधी

Jun 16,2019 10:06:00 AM IST

मुंबई - नीरा देवघर धरणातील पाणीवाटपावरून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर निशाणा साधल्याने या दोन राजांमध्ये उफाळलेला वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. दोन राजांमधला वाद संपुष्टात आणण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत बैठक बोलावली होती. बंद खोलीत झालेल्या या बैठकीतून उदयनराजे रागाने बाहेर पडल्याने शरद पवारही मध्यस्थी करण्यात अयशस्वी ठरल्याने आता हा वाद कोणते रूप घेतो त्याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


उदयनराजे यांनी रामराजे निंबाळकर यांच्यावर स्वयंघोषित भगीरथाने जाणीवपूर्वक भागातील कालव्यांची कामे रखडवल्याने हे तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचित राहिले, अशी टीका केली होती, तर रामराजे यांनी उदयनराजे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. स्वयंघोषित छत्रपती, चक्रम असे शब्दप्रयोग त्यांनी केले होते. एवढेच नव्हे तर उदयनराजेंना आवरा, अन्यथा पक्षातून बाहेर पडू, असा इशाराही त्यांनी शरद पवार यांना दिला होता. यावरून या दोघांमध्ये चांगलेच युद्ध पेटले. हा वाद मिटून साताऱ्यात राष्ट्रवादी बलवान राहावी यासाठी शरद पवार यांनी बैठक बोलावली खरी, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही.


रामराजेंचा पुतळा जाळला
साताऱ्यातील राजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रामराजेंचा निषेध करून त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला. यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

लाेकांवर अन्याय होत असेल तर चक्रम : उदयनराजे
बैठकीतून चिडून बाहेर पडलेल्या उदयनराजे म्हणाले, मी स्वयंघोषित छत्रपती नव्हे, तर लोकांनी त्यांच्या मनात मला ते स्थान दिले आहे. छत्रपतींच्या घराण्याचा मी कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केला नाही. हो, मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतो. मला अन्याय सहन होत नाही. मी मोठ्या माणसांचा मान राखला आहे. माझ्या वयाचे असते तर जीभ हासडून बाहेर काढली असती. मी बैठकीतून बाहेर पडलो अन्यथा हे पिसाळलेले कुत्रे मलाही चावले असते, अशी टीकाही त्यांनी रामराजे यांच्यावर केली.

नाे कॉमेंट : रामराजे
बैठकीनंतर रामराजे निंबाळकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी नो कॉमेंट सांगत या विषयावर बोलणे टाळले. या वादामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीवर फुटीचे ढग घोंगावत असल्याने यावर तोडगा कसा काढायचा, असा प्रश्न आता शरद पवार यांच्यासमोर उभा राहिला आहे. एकूणच हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

X
COMMENT