आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्करोगावर उपचार सुरु असताना 'अग्निहोत्र 2'साठी झाली होती विचारणा, शरद पोंक्षेंनी सांगितले खास अनुभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टार प्रवाहवर 2 डिसेंबरपासून रात्री 10 वाजता सुरु होणाऱ्या 'अग्निहोत्र' मालिकेविषयी कमालीची उत्सुकता आहे. त्याच निमित्ताने या मालिकेत महादेव अग्निहोत्रींची भूमिका साकारणाऱ्या शरद पोंक्षे यांच्याशी साधलेला हा खास संवाद.

  • तब्बल 11 वर्षांनंतर स्टार प्रवाहवर ‘अग्निहोत्र 2’ पुन्हा एकदा भेटीला येत आहे. काय असेल नव्या पर्वाचं रहस्य?

'अग्निहोत्र' मालिका आणि मालिकेतलं महादेव हे पात्र माझ्या अत्यंत जवळचं आहे. त्यामुळे ‘अग्निहोत्र 2’ साठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी तातडीने होकार कळवला. मात्र तेव्हा माझ्यावर कर्करोगावरचे उपचार सुरु होते. पण स्टार प्रवाह वाहिनी आणि प्रोडक्शन हाऊसचे आभार की, मी पूर्ण बरा होईपर्यंत ते थांबले. यासाठी मी नेहमी आभारी राहिन. दहा वर्षांपूर्वी मालिकेत मी कसा वावरलो, माझी देहबोली कशी होती याचा थोडा अभ्यास केला. शूटिंगच्या पहिल्या दिवशी जेव्हा महादेवचा पोशाख धारण केला आणि सेटवर आलो तेव्हा अकरा वर्षांपूर्वीची एक एक गोष्ट आठवत गेली. पहिला शॉट दिला आणि मालिकेचे निर्माते श्रीरंग गोडबोले यांनी जेव्हा उत्स्फुर्तपणे दाद दिली तेव्हा खूपच कौतुक वाटलं.

  • आजारावर मात करत तुम्ही पुन्हा एकदा मालिका विश्वात पदार्पण करत आहात त्याविषयी...

इच्छा तिथे मार्ग म्हणतात ते खरंच आहे. तुमची इच्छाशक्ती दांडगी असायला हवी. सकारात्मक रहायला पाहिजे असं मला वाटतं. पहिल्या दिवशी जेव्हा शूटिंगला गेलो तेव्हा वाटलं नव्हतं, मी इतके तास शूटिंग करु शकेन. पण कुठेही थकवा जाणवला नाही. मुळात अभिनय हे नटाचं टॉनिक आहे. ते मिळालं की आपोआपच नवी ऊर्जा संचारते.

  • 'अग्निहोत्र 2' मध्ये नेमकं काय पहायला मिळेल?

नव्या पीढीची नवी गोष्ट आहे. ‘अग्निहोत्र 2’ पहाताना जरी तुम्ही पहिलं पर्व पाहिलं नसेल तरी हरकत नाही. ‘अग्निहोत्र 2’ची गोष्ट तुम्हाला तितकाच आनंद देईल. वाड्याच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. नव्या पीढीची नवी गोष्ट असल्यामुळे काही नवे कलाकार आहेतच मात्र जुने कलाकार देखिल कथानकात दिसतील. त्यामुळे अतिशय उत्कंठा वाढवणारी ‘अग्निहोत्र 2’ ही मालिका असेल.

  • 'अग्निहोत्र' मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं होतं... ‘अग्निहोत्र 2’ साकारणं आव्हान वाटतं का?

नक्कीच.. .खूप मोठी जबाबदारी आहे. आजही जगभरातले प्रेक्षक मालिकेचे जुने भाग काढून पहातात. त्यामुळे ‘अग्निहोत्र 2’ करताना तो दर्जा सांभाळणं याचं मोठं आव्हान आहे. मालिकेचे सीन्स खूप उत्तमरित्या लिहिले जात आहेत. पहिलं पर्व सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलं होतं. ‘अग्निहोत्र 2’ चं दिग्दर्शन भीमराव मुडे करतो आहे. दिग्दर्शक म्हणून दोघंही उत्तम आहेत. योगायोग असा की, अकरा वर्षांपूर्वी सतीश दिग्दर्शक म्हणून मालिकेशी जोडला गेला होता आणि आता स्टार प्रवाहचा कार्यक्रम प्रमुख म्हणून तो धुरा तो सांभाळतो आहे. त्यामुळे ‘अग्निहोत्र 2’ मध्येही त्याचा मोलाचा सहभाग आहे. काही मोजक्या दिग्दर्शकांपैकी सतीश राजवाडे हा माझा अत्यंत आवडीचा दिग्दर्शक आहे. तो तुमची एनर्जी वाया घालवत नाही. कोणता शॉट कशा पद्धतीने आणि किती वेळात करायचा याचं गणित त्याच्या डोक्यात पक्क असतं. कलाकारांना उत्तमरित्या सीन समजावून सांगून त्यांच्याकडून ते चोखपणे वठवणं ही कला आहे आणि सतीशला ती अवगत आहे.  ‘अग्निहोत्र 2’ च्या प्रोमोजना खूप भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे मी आवर्जून सांगतो 2 डिसेंबरपासून रात्री 10 वाजता ही मालिका सुरु होतेय, सहकुटुंब पहायचीच. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पहात आहोत.