Home | Magazine | Madhurima | Sharayu Deshpande writes about eating together

‘ताटनीती’

डॉ. शरयू देशपांडे, हैदराबाद | Update - Aug 28, 2018, 12:36 AM IST

रात्री मी मुलांना आमच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते. त्यात आम्ही लहानपणी सुट्यांमध्ये बहीणभाऊ, चुलत- आते सगळे मिळून आम

 • Sharayu Deshpande writes about eating together

  रात्री मी मुलांना आमच्या लहानपणीच्या आठवणी सांगत होते. त्यात आम्ही लहानपणी सुट्यांमध्ये बहीणभाऊ, चुलत- आते सगळे मिळून आमच्या गावी जाऊन कसे धम्माल करत असू, नदीवर जात असू, मोठ्या वाड्यातून लपंडाव खेळत असू, आणि जो भाऊ किंवा बहीण लाडकी असेल तिच्यासोबत एका ताटात जेवण करत असू, वगैरे सांगत होते. मुलांना खूप गंमत वाटत होती. आईबाबांच्या लहानपणीच्या गोष्टी ऐकायला त्यांना खूप मजा येते. एक दिवस सुटी असल्यामुळे उशिरा उठून ब्रंचचा बेत ठरला तशी मुलं लगेच म्हणाली, ‘आई, आज आम्ही एका ताटात जेवणार.’ क्षणभर मला समजलंच नाही. तसे युवराज म्हणाले ‘तुम्ही नाही का लहानपणी...’ आई, that story you told last night!’ इति आमची इंग्रजाळलेली युवराज्ञी. आणि मग सगळा प्रकार माझ्या लक्षात आला. 😀स्वयंपाक करताना मन अलगद गावी गेलं. भावंडांनी भरलेलं घर आठवलं. सकाळी लवकर उठून परसातल्या चुलीसमोर जाऊन हात शेकत बसायचं. बाहेरून चूल आणि आत बाथरूममधून त्याच चुलीवर पाणी तापवण्याचा मोठा तांब्याचा हंडा. त्या चुलीवर तापलेल्या तांब्याच्या हंड्यातलं पाणी तांब्याच्याच मोठ्या घंगाळ्यात घ्यायचं. वाफा येणाऱ्या पाण्याला एक विशिष्ट सुंगध यायचा. ताजं ताजं दूध किंवा चहा घेऊन आम्ही नदीवर/गंगेवर पोहायला जाण्याच्या तयारीला लागायचो. आपापले कपडे टॉवेलमध्ये गुंडाळून प्रत्येकाची एक टॉवेलची छोटी वळकटी तयार होत असे. पण मुख्य असायची ती न्याहारीची शिदोरी. तक्कू, लोणचं, दाण्याची, जवसाची किंवा कारळाची अशा खलबत्त्यात केलेली चटणी आणि तेल. सोबत पोळी किंवा भाकरी. आम्ही खुश. मनसोक्त डुंबून झाल्यावर ही साधी न्याहारी करून मन तृप्त व्हायचं. दुपारी गच्चीत खेळायचो. संध्याकाळी गावात फेरफटका, शेतावर जाणे, गावातल्या सगळ्या देवळात जाणे. आणि मग घरी येऊन देवासमोर किंवा अंगणात तुळशीसमोर शुभंकरोति, रामरक्षा म्हणायचं. तिथे पाठांतराच्या स्पर्धा लागत.


  रात्री पिठलंभात, खिचडीकढी, वरणफळं, तक्कू धिरडी, यापैकी काहीतरी मेनू असे. आम्ही भावंडं आपापल्या आवडत्या बहीण किंवा भावासोबत ‘एका ताटात’ जेवायला बसत असू. ही केवळ एक पद्धत नव्हती तर अतिरिक्त ताटं वाचवण्यासाठी बायकांनी काढलेली एक क्लृप्ती होती पण त्याही पलिकडे जाऊन आमच्यासाठी कधी कधी भावंडांत आपापसांत चालणाऱ्या भांडणातली ती एक ‘कृष्णनीती’ होती. आपल्या बाजूने कोण कोण आहे हे ‘शत्रुपक्षाला’ दर्शविण्यासाठी ती एक ‘ताटनीती’ 😀होती. विशेषतः मोठी ताई आपल्यासोबत एका ताटात जेवायला बसली की मग आपली बाजू आता भक्कम आहे असा विश्वास वाटत असे. पण हे सगळं तेवढ्यापुरतंच. पुन्हा सकाळी गंगेवर जायला आमची गँग मोठ्या ताई आणि दादाच्या मार्गदर्शनाखाली एकत्र सज्ज! किती सुरेख दिवस होते ते.


  मी केलेला बेत साधाच होता. पण बालपणीच्या आठवणींची सोनेरी झालर त्याला जोडली गेली होती. मुगाची धिरडी, कमी तिखटाचा गोड कैरीचा तक्कू, सोबत दह्याचा सट, आणि लहानपणीच आम्हाला मिळायची तशी दाणेगुळाची वाटी. मुलांनी यम्मी यम्मी करत खाल्लं. पण मी तृप्त होते ते त्यांनी माझ्या बालपणाच्या आठवणींना उजळा दिला म्हणून आणि आईच्या बालपणीचा अनुभव हसण्यावारी न नेता तो स्वतः अनुभवण्याची इच्छा व्यक्त केली म्हणून!

  - डॉ. शरयू देशपांडे, हैदराबाद
  dsharayu@yahoo.com

Trending