आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनिल अंबानींसमोर नवे संकट; वित्त संस्था विकताहेत गहाण शेअर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अनिल अंबानी यांच्यासमोर नवीन संकट उभे राहिले आहे. त्यांच्या समूहाच्या कंपन्यांना कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्थांनी ४ ते ७ फेब्रुवारीदरम्यान सुमारे ४०० कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत. संचालकांनी हे शेअर गहाण ठेवून या संस्थांकडून कर्ज घेतले होते. या शेअरची विक्री करण्यात आल्यानंतर कंपनीमध्ये संचालकांची भागीदारी तीन ते आठ टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. या विक्रीमुळे चार दिवसांत समूहाच्या कंपन्यांचे मूल्य ५५ टक्के म्हणजेच १३,००० कोटी रुपयांनी घटले आहे. ज्या कंपन्यांचे शेअर शेअर खुल्या बाजारात विकले त्यांच्यामध्ये रिलायन्स पॉवर, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिलायन्स कॅपिटलच्या शेअरचा समावेश आहे.  


एलअँडटी फायनान्स आणि अॅडलवाइज समूहाने गहाण ठेवलेल्या शेअरची अवैध विक्री केली असल्याचा आरोप शुक्रवारी अनिल अंबानी समूहाने केला होता. अशा प्रकारे खुल्या बाजारात शेअरची विक्री केल्याने प्राइझ मॅनिप्युलेशन आणि इनसायडर ट्रेडिंगसारख्या सात नियमांचे उल्लंघन झाले आहे. यामुळे एलअँडटी आणि अॅडलवाइजच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, रिलायन्स पॉवर आणि त्यांच्या उपकंपन्या चांगला परफॉर्म करत असल्याचा दावा समूहाने केला आहे.  


अनिल अंबानी समूहाची कंपनी आरकॉमने मागील शुक्रवारीच दिवाळखोरी प्रक्रियेसाठी अर्ज करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये तेजीने विक्रीचा मारा दिसून आला. शुक्रवारी या चारही कंपन्यांचा मार्केट कॅप १०,९२५ कोटी रुपयांवर आला होता.  


धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर २००५ मध्ये मुकेश आणि अनिल या दोन्ही भावांमध्ये संपत्तीची जवळपास बरोबरीत वाटणी झाली होती. मात्र, आज दोघांच्या संपत्तीत बरेच अंतर आहे. अनिल अव्वल-५०० श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले, तर मुकेश या यादीत अव्वलस्थानी आहेत. 

बातम्या आणखी आहेत...