आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरे कॉलनीतील झाडे वाचवण्यासाठी शर्मिला ठाकरे मैदानात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - मेट्रो कारडेपोसाठी विरोध करणाऱ्या शिवसेनेने आपल्या सत्तेचा वापर करून केंद्र व राज्य सरकारला परावृत्त करावे, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी रविवारी केले. गोरेगावच्या आरे वसाहतीत मेट्रो कारडेपो उभारण्यासाठी २८०० झाडे तोडली जाणार आहेत. त्याविरुद्ध विविध सामाजिक संस्थांचे आझाद मैदानावर आंदोलन चालू आहे.  या आंदोलनात शर्मिला ठाकरे तसेच त्यांचे चिरंजीव अमित रविवारी काही काळ सहभागी झाले होते. प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना ठाकरे म्हणाल्या, ‘मुंबई पहिल्या पाच प्रदूषित शहरांमध्ये आहे. येथे प्राणवायू मिळत नाही. अशा वेळी प्राणवायू देणारी झाडे तोडल्यास लोकांना ऑक्सिजन मास्क घेऊन फिरावे लागेल. आमचा मेट्रोला विरोध नाही. दुसरीकडे जागा असताना आरेमध्येच डेपो उघडायला कशाला हवा?’  शिवसेनेने यासाठी विरोध केला असल्याचे सांगताच त्या म्हणाल्या की, ‘हे चांगलेच आहे. पण, ते सत्तेत आहेत. तेथे त्यांनी आग्रह धरावा. १० कोटी वृक्ष लागवड केली असल्याच्या राज्य सरकारच्या जाहिरातीची त्यांनी खिल्ली उडवली. इतकी झाडे त्यांनी लावली असल्यास मी आंदोलन मागे घेईन. ‘आरे’चे आंदोलन राजकीय नाही. आॅक्सजन जसा मंत्र्याला लागतो, तसा सामान्य माणसालाही लागतो. सामान्य मुंबईकर म्हणून आपण या आंदोलनात उतरलो असल्याचे त्यांनी सांगितले. आरे काॅलनीत काँग्रेसनेही रविवारी आंदोलन केले.

राज यांना गुंतवून ठेवण्यासाठी नोटीस
कोहिनूर प्रकरणातून आम्ही २००८ मध्येच बाहेर पडलो होतो. पण सरकारचे आमच्यावर भरपूर ‘प्रेम’ आहे. कोणाचेही सरकार असो. ईडी, सीबीआय, आयटीच्या नोटिसा आम्हाला येतातच. हा दबावतंत्राचा प्रकार आहे. राज ठाकरे यांना निवडणुकीच्या काळात गुंतवून ठेवण्याचा हा प्रकार असल्याचा दावा शर्मिला यांनी केला. 

बातम्या आणखी आहेत...