तामिळनाडू / शशिकलांची 1600 कोटींची बेनामी मालमत्ता केली जप्त, नोटबंदीनंतर जुन्या नोटांनी केली होती खरेदी

या सर्व मालमत्ता बनावट नावाने खरेदी करण्यात आल्या होत्या

वृत्तसंस्था

Nov 06,2019 09:51:00 AM IST

नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची प्रदीर्घ काळ असलेली मैत्रीण व्ही. के. शशिकला यांची १६०० कोटी रुपयांची ‘बेनामी’ संपत्ती जप्त केली आहे.


शशिकला सध्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा जास्त मालमत्ता बाळगल्याच्या प्रकरणात बंगळुरूच्या तुरुंगात २०१७ पासून चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनुसार, अद्रमुकच्या नेत्या शशिकला यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटबंदीनंतर लगेचच १५०० कोटी रुपये किमतीच्या ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांनी चेन्नई, पुद्दुचेरी आणि कोइम्बतूरमध्ये ९ ‘बेनामी’ मालमत्ता खरेदी केल्या होत्या.


या सर्व मालमत्ता बनावट नावाने खरेदी करण्यात आल्या होत्या आणि सर्व रक्कम ‘रोख’ देण्यात आली होती. या मालमत्तांची सध्याची किंमत १६०० कोटी रुपये सांगितली जाते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई मोदी सरकारने २०१६ मध्ये लागू केलेल्या बेनामी खरेदी-विक्री (प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम २४ (३) नुसार करण्यात आली.


प्राप्तिकर विभागाने २०१७ मध्ये ऑपरेशन ‘क्लीन मनी’ अंतर्गत शशिकला आणि त्यांच्या नातेवाइकांवर छापे टाकले होते. जप्त केलेल्या मालमत्तांशी संबंधित दस्तऐवज त्याच वेळी जप्त करण्यात आले होते, असे समजते. असे सांगितले जाते की, शशिकला यांनी आपल्या मालमत्तेच्या तपशिलात कधीही या मालमत्तेची घोषणा केली नाही.


डिसेंबर २०१६ मध्ये जयललिता यांच्या निधनानंतर अद्रमुकचे नेतृत्व सांभाळणाऱ्या शशिकलांची तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील गटाने पक्षातून हकालपट्टी केली होती. जयललितांच्या मृत्यूसंबंधातही शशिकलांची चौकशी झाली आहे.

X
COMMENT