आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विक्री वाढल्यामुळे श्याओमी रेडमीला बनवणार स्वतंत्र ब्रँड; भारतात 27.3% बाजार भागीदारीसह श्याओमी अव्वल कंपनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग/नवी दिल्ली- रेडमी सिरीजचे यश पाहता चिनी मोबाइल फोन कंपनी श्याओमीने यावर्षी या नावाचा स्वतंत्र ब्रँड बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रेडमी सिरीजला श्याओमीने जुलै २०१३ मध्ये स्वस्त स्मार्टफोन म्हणून बाजारात आणले होते. भारतीय बाजारात या सिरीजची मोबाइल फोन विक्री चांगलीच यशस्वी ठरली आहे. चीनमध्ये १० जानेवारी रोजी ४८ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर असलेला फोन लाँच होणार असून त्याचबरोबर रेडमीला स्वतंत्र ब्रँड म्हणून उतरवण्यात येणार आहे. 

 

श्याओमीचे स्वस्तातील रेडमी आणि रेडमी नोट सिरीजचे फोन सर्वाधिक लोकप्रिय आहेत. कंपनीचे संस्थापक ली जून यांनी चायनीज मायक्रो ब्लॉगिंग साइट वीबोच्या माध्यमातून सांगितले की, श्याओमी आणि रेडमीला स्वतंत्र ब्रँड बनवण्याचे सर्वात प्रमुख कारण दोन्हीचे वेगवेगळे उद्दिष्ट आहे. रेडमी ब्रँड स्वस्तातील स्मार्टफोनची निर्मिती करतो, तर एमआय ब्रँड उच्च दर्जाचे डिव्हाइस बनवतो. रेडमी फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक विक्री होतात, तर एमआय डिव्हाइसचे मुख्य लक्ष्य ई-कॉमर्स नाही. भारतात रेडमी सिरीजला चांगला प्रतिसाद मिळाल्यानेच श्याओमीने २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये नवीन उच्चांक गाठला आहे. इंटरनॅशनल डाटा कॉर्पोरेशन (आयडीसी) नुसार २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये कंपनीने १.१७ कोटी युनिटची विक्री केली आणि २७.३ टक्के बाजार भागीदारीसह भारतातील अव्वल ब्रँड ठरला आहे. रेडमी-५- ए, रेडमी नोट-५-प्रो, रेडमी-६, रेडमी-६-ए आणि रेडमी ६-प्रो ने कंपनीला चांगले यश मिळवून दिले आहे. भारतासह युरोपातही चांगल्या विक्रीमुळे श्याओमीने २०१७ च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेमध्ये २०१८ मध्ये ४९.१ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ नफा वाढून २५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे.

 

ओप्पोनेही रिअलमीला बनवले होते स्वतंत्र ब्रँड 
एकाच मोबाइल फोन कंपनीचे दोन स्वतंत्र ब्रँड नवीन बाब नाही. आणखी एक चिनी कंपनी ओप्पोने आधी असे केले आहे. कंपनीने जुलै २०१८ मध्ये रिअलमी नावाने स्वतंत्र ब्रँड सुरू केला होता. रिअलमी ब्रँड युवकांवर लक्ष केंद्रित करून स्वस्तात हँडसेट बनवतो, तर ओप्पोचे लक्ष जास्त किमतीच्या डिव्हाइसवर आहे.