Home | Magazine | Madhurima | She cycle and man, Jyoti Thombare article

ती, सायकल अन् पुरुष

ज्योती ठोंबरे | Update - Apr 16, 2019, 12:08 PM IST

‘सायकल’ आठवली की ते दोन कधीही न पाहिलेले चेहरेही तिला आठवत अन् मन कृतज्ञतेने भरून जाई.

  • She cycle and man, Jyoti Thombare article
    मुलगी खूप दिवसांपासून हट्ट करत होती सायकल हवीच म्हणून. पडेल, लागेल, अभ्यास करणार नाही, अशी किती कारणं पुढं करत तिला सायकल घेऊन द्यायचं टाळत राहिलो आपण. शेवटी आज वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून घेऊन दिली सायकल. किती खुश झाली ती! सायकलचं कौतुक,सगळ्या मित्र-मैत्रिणींना चक्कर देण्याचा कार्यक्रमही पार पडला, मुलीला सायकल खेळताना पाहून कितीतरी विचार तिच्या मनात चमकून गेले. तिनं खिडकीबाहेर पाहिलं. अंधार पडला होता. तिला तो दिवस आठवला. तिला क्लासवरून घराकडं निघायला उशीर झालेला. तेव्हाही असाच अंधार पडलेला. तिनं घाईत बॅग पुढच्या बास्केटमध्ये टाकली. सायकलचं लॉक उघडलं, स्टँड काढलं. पटकन सायकल रस्त्यावर आणली अन् पेडल मारलं. रस्त्यानं मोठ्या वाहनांची रहदारी असते. पायी चालणारे विरळच. चौक ओलांडून स्मशानभूमीच्या रस्त्यापर्यंत पोहोचल्यावर अचानक सायकल थांबली. सायकलच्या मागच्या चाकात तिची ओढणी गुरफटली होती. आजूबाजूला अंधारगुडुप. ती घाबरली. उतरून चाकातलं ओढणीचं कापड काढायचा प्रयत्न करू लागली. पेडल पुन्हा फिरवू लागली. ओढणी गच्च अडकली होती. मदत मागावी तर कोणी दिसतच नव्हतं. मोठी वाहनं भर्रकन निघून जायची. सामसूम रस्त्यात थांबण्याचं कारणच नव्हतं. तिला भीती वाटायला लागली. मोबाइलही नव्हता. अचानक कोणीतरी चालत येत असल्याचं जाणवलं. दोन तरुण गप्पा मारत येत होते. ती अजूनच घाबरली. यांनी त्रास दिला तर? अंगाला हात लावला तर? तिच्या मनात हजार प्रश्न आले. तिनं पुन्हा ओढणी काढायचा प्रयत्न केला. ती माणसं एकमेकांशी बोलत पुढं निघून गेली. तिच्या मनात भीती दाटलेली,आजवर घरातल्यांनी हेच सांगितलं होतं की अनोळखी माणसांशी बोलायचं नाही. माणसं वाईट असतात. छेड काढतात. तिनं हिंमत करून त्या दोघांना आवाज दिला. “दादा....” गप्पांच्या नादात दोघांचंही तिच्याकडे लक्षच नव्हतं. दुसऱ्यांदा हाक मारल्यानंतर दोघं मागे वळाले. ते तिच्याजवळ आले, “सायकल खराब झालीय, दुरुस्त करता येईल का प्लीज? तिनं विचारलं. त्यातल्या एकानं सायकल हातात घेतली. पेडल मारून चाक फिरवलं. पाचदहा मिनिटं खटपट करुन ओढणी चाकातून सोडवली. सायकल चालतेय का पाहिलं. तोवर दुसरा शांत पाहत उभा होता. दुरुस्त केलेली सायकल तिच्या हातात सोपवत “ताई नीट घरी जा, सायकल चालवताना लक्ष ठेवायचं जरा.” म्हणून चालतीही झाली. काहीच घडू नये इतक्या सहज ते दोघं तिला मदत करुन निघून गेले होते. मुलींना पाहून शिट्ट्या वाजवणारे, अश्लील गाणी म्हणणारे, गर्दीत संधी साधून स्पर्श करू पाहणारे पुरुष तिनं पाहिले, वाचले होते. पण अशी प्रामाणिकपणे मदत करणारी, एकट्या बाईकडं वाकड्या नजरेने न पाहणारी माणसंही असतात. हे तिनं पहिल्यांदा अनुभवलं. तिनं सुटकेचा श्वास सोडला. निश्चित मनानं तिनं सायकलचं पेडल मारलं आणि घराकडं निघाली. या घटनेनंतर ती कधीच कुठल्याच पुरुषाला घाबरली नाही. पुरुष कधी तिला नीच भासला नाही. एकाच्या चुकीचं खापर तिनं अख्ख्या पुरुष जातीवर कधी फोडलं नाही. रात्रीच्या काळोखात तिला ते अनोळखी चेहरे नजरेत साठवता आलेच नव्हते. पण काळोखातल्या त्या दोन अनोळखी चेहऱ्यांनीच तिला आयुष्यभराची ‘सुरक्षितता’ दिली होती. स्वत:ला घडवण्याचं ‘निर्भयपण’ दिलं होतं. ‘सायकल’ आठवली की ते दोन कधीही न पाहिलेले चेहरेही तिला आठवत अन् मन कृतज्ञतेने भरून जाई.

Trending