आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुरशरणप्रीत काैर
पंजाब मधील सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. आई माझ्याकडे खूप लक्ष द्यायची, शाळेत वेळेवर पाठवायची, भरपूर जेऊ घालायची. त्यामुळे मी सुदृढ बनले. वडील दिदारसिंह यांची किडनी खराब झाली. त्यांना डायलिसिसवर ठेवून उपचार सुरू झाले त्या वेळी राेज दाेन हजार रु. खर्च येत असल्यामुळे आमची आर्थिक स्थिती खराब हाेत राहिली. १२ वर्षांची असताना पितृछत्र हरवले. त्या वेळी माझा भाऊ एक वर्षाचादेखील नव्हता. एकट्या आईवर आम्हा दाेघांना सांभाळण्याचा भार पडला. आईकडे पाहून मला वाटायचे, जर मी लवकर माेठी हाेऊ शकले, चांगली नाेकरी करून आईला आधार देऊ शकले तर!
१२ वीमध्ये शिकत असताना शिक्षकांनी क्रीडा स्पर्धेत भाग घेण्यास सुचवले. मला खेळाविषयी फारशी आवड नव्हती, परंतु मी गाेळाफेक सुरू केली. पहिल्यांदा ३६ मीटर फेकला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकदा कॅरम टीमसाेबत स्पर्धेसाठी बाहेर जावे लागले. येथे पंजाब पाेलिसचे डीजीपी महलसिंह खुल्लर प्रमुख पाहुणे हाेते. ते मला म्हणाले, तू सदृढ आहेस तर वेगळ्या क्रीडा प्रकारात सहभागी झालं पाहिजे. त्या वेळी मी म्हणाले, मी सध्या ३६, ४५ मीटर गाेळाफेक करते. त्या वेळी ते म्हणाले, जर तू ४५ मीटरपेक्षा १ सेंमीदेखील जादा लांब फेकला तर पंजाब पाेलिस दलात दाखल करून घेईन. मी म्हणाले, नाेकरीचे आश्वासन सारेच देतात, नंतर ताेंड फिरवतात. तुम्ही लेखी द्याल का? त्यांनी हसत हसत तसे लिहून दिले आणि स्वाक्षरीदेखील केली.
१२ वीच्या परीक्षेनंतर माझी प्रात्यक्षिक चाचणी झाली. मी ४५ मीटरपेक्षा जास्त लांब गाेळाफेक करून दाखवला आणि त्यांनी आश्वासन पूर्ण केले. २००१ मध्ये प्रशिक्षणाच्या दरम्यान दंगलीत नॅशनल चॅम्पियन साेनिका कालीरामण येणार हाेती. माझे प्रशिक्षणार्थी डीआयजी कर्तारसिंह चेष्टेने म्हणाले, तू साेनिकाशी कुस्ती खेळशील? मी म्हणाले, जर तुम्ही सायंकाळच्या प्रशिक्षणातून सूट देणार असाल तर! ते हसले आणि म्हणाले, जिंकून तर दाखव. मी कुस्तीचा सराव सुरू केला. काेणताही डावपेच मला माहीत नव्हता. इतकेच माहीत हाेते की, तिला उचलून चीत करायचे आहे आणि मी साेनिकाला उचलले आणि चीत केले. त्यानंतर प्रेक्षकांनी मला बक्षीस दिले. अशा पद्धतीने आयुष्यातील पहिल्याच कुस्ती दंगलीत मी १३ हजार रु. जिंकले. येथूनच माझ्या आयुष्याला नवे वळण मिळाले. मी याेग्य प्रशिक्षण घेऊ लागले. २०१३ पर्यंत ७२ किलाे गटात चार वेळा नॅशनल चॅम्पियनशिपचे गाेल्ड जिंकले. तीन वेळा नॅशनल गाेल्ड जिंकले. त्याच वर्षी पाेलिस हवालदार संदीपसिंह सहकुटुंब माझ्या घरी आले. आईस म्हणाले, आपल्या मुलीशी विवाह करू इच्छिताे. त्यांनी खूप काही जमीन-मालमत्ता असल्याचे सांगितले, परंतु लग्नानंतर कळले की, तसे काहीही नव्हते. सासरच्यांनी आक्षेप घेतल्याने माझी कुस्ती सुटली. नवरा राेज मारहाण करायचा. २०१६ मध्ये मुलगी झाली. तेव्हा सासरच्यांनी जाणीवपूर्वक छळ सुरू केला. माझ्या प्रकृतीवर परिणाम हाेऊ लागला.
एके रात्री पती आणि सासू गप्पा करताना मी ऐकत हाेते, मला आणि मुलीस शाॅक देऊन मारण्याचे कारस्थान त्यांच्यात सुरू हाेते. कारण यामुळे काेणाला संशय येणार नव्हता. मी सकाळी उठल्यावर भावास फाेन केला आणि ताे मला घेऊन जाण्यास आला तेव्हा सासरच्यांनी मारहाण सुरू केली. भावाने पाेलिसांत तक्रार देण्याची धमकी दिली तेव्हा मला जाऊ दिले. मुलगी दीड वर्षाची झाली तेव्हा पाेलिसाच्या नाेकरीत रुजू झाले. एक दिवस मी सारे मेडल पाहून रडत बसले. तेव्हा आई म्हणाली, गुडियास माझ्या जवळ ठेव आणि कुस्तीचे प्रशिक्षण पुन्हा सुरू कर. मी २०१८ मध्ये कुस्तीत पुनरागमन केले. नॅशनल कुस्ती चॅम्पियनशिप आणि नेपाळमधील दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत सतत गाेल्ड मेडल पटकावले. डिसेंबर २०१९ मध्ये जालंदरमध्ये सीनियर नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये गाेल्ड पटकावला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर ३३ वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले, परंतु केवळ ११ स्पर्धेत मी जिंकले. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत मी चाैथ्या स्थानी आहे. यावर्षीच्या ऑलिम्पिकसाठी निवड व्हावी यासाठी मी जिवाची बाजी लावणार आहे. मी इतकेच सांगू शकेन की, मुलगी जन्मास आली असेल तर तिला मुलांसारखेच प्रेम द्या, संधी द्या. मीदेखील कुणाची तरी मुलगीच आहे, देशासाठी कितीतरी गाेल्ड मेडल जिंकले आहेत, आता पाेलिस उपनिरीक्षक आहे.
(शब्दांकन : राजकिशाेर यादव, दिल्ली)
भारतीय कुस्तीपटू गुरशरणप्रीत काैर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.