आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छडी लागे छमछम विद्या येई घमघम

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्पा कांबळे

मुलांवर प्रेम करा हे आपल्याला माहीत असतं, पण त्यांना सन्मानानं वागवा हे आपल्याला शिकून घ्यावं लागतं. मुलांना नुसतेच उद्याचे आपले भविष्य समजू नका तर त्यांना वर्तमानाचा निर्भळ नितळ आनंद आजच, आताच लाभू द्या.
शामची आई या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी चित्रपटातील "छडी लागे छमछम विद्या येई घमघम' हे गीत कोणत्याही दर्दी मराठी माणसाला आठवत असेलच. लहानगा श्याम त्याचे मास्तर शाळेत नसताना ज्या खोड्या काढतो त्या खोड्या या गाण्यात दाखवलेल्या आहेत.शाळेत पचापचा पान खाऊन थुंकणारे मास्तर या मुलांसाठी हेटाळणीचा विषय आहेत. शिवीगाळ करणारा हा शिक्षक  मुलांना पुराणातील यमासारखा वाटतोय. तर छडी हातावर पडली की विद्या येते  या गृहीतकाला छेद देणारे हे गाणे शिक्षकाचे विडंबन करणारे आहे. हे गाणे पाहून मला प्रश्न पडलाय की, मास्तर शाळेत विद्यार्थ्यांना मारतात हे मुलांच्या घरी माहीत असेल काय?असेलच, कारण पालकच कित्येकदा शिक्षकांना आमचा मुलगा नीट शिकला नाही तर त्याला मारा असे सांगत असतात. केवळ शाळेतील शिक्षकच नाही तर कुटुंबातील इतर सदस्य (आईवडिलांचा मारण्याचा अधिकार मोठा) ट्यूशनचे सर, मॅडम, कराटे, चित्रकला या छंदवर्गाचे शिक्षक या सगळ्यांकडून लहान मुलांना मारणे, ओरडणे हे सर्रासपणे केले जाते. मुलांवर होणाऱ्या मारहाणीचे उदाहरणच द्यायचे झाले तर -थोबाडीत देणे, पट्टीने हातावर फटके मारणे, डोळे वटारणे, घरातून बाहेर काढण्याची धमकी देणे, घालूनपाडून बोलणे, अबोला धरणे, उठाबशा काढायला लावणे, ओणवे उभे करणे, हाताची घडी तोंडावर बोट ठेवायला लावणे यासारख्या अनेक प्रकारच्या शिक्षा  मुले पालकांकडून  सहन करत असतात. 


खेदाची गोष्ट हीच आहे की, मोठी माणसे लहानांना ज्या विविध प्रकारच्या शिक्षा देतात त्या शिक्षा त्या मोठ्यांनीही त्यांच्या लहानपणी सहन केलेल्या असतात. पालकांकडून मुलांवर होणारी ही हिंसा Cycle of domestic  violence असते. मार (शब्दाचेही मार) दिल्याने मुले सुधारतात या धारणेवर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही हिंसा वारसाहक्काने पोहोचवली जाते. माझा प्रश्न असा आहे की, समाजातील सर्वच थरात अंगवळणी पडलेल्या या शिक्षांचा मुलावर काही दूरगामी परिणाम होतो की त्या निरुपद्रवी असतात?Alice in Wonderland हे लहान मुलांचे मनोरंजक पुस्तक तर तुम्हाला ठाऊक असेलच, पण Alice Miller एलिस मिलर या विदुषीने बालपणावर केलेले काम तुम्ही ऐकले आहे का? एलिस मिलरने लहान मुलांसाठी अनेक संशोधनात्मक पुस्तके लिहिली आहेत. काफ्का, हिटलर, व्हर्जिनिया व्लूफ यासारख्या प्रसिद्ध लोकांच्या बालपणाचा अभ्यास करून तिने त्यांच्या प्रौढवयातील व्यक्तिमत्त्वाचा व बालपणातील अनुभवाचा संबंध उलगडवून लावला आहे.तिच्याच शब्दात सांगायचे झाले तर Child abuse is still sanctioned — indeed, held in high regard — in our society as long as it is defined as child-rearing. It is a tragic fact that parents beat their children in order to escape the emotions from how they were treated by their own parents.” ( Alice Miller, The Drama of the Gifted Child: The Search for the True Self )मुलांना वाढवताना मुलांचे मोठ्यांकडून शोषणच होत असते हे वरील कठोर शब्दातून तिने सांगितले आहे. मुलांचे स्वतंत्र भावनाविश्व नाकारणाऱ्या, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हिंसेचा समग्र समाजावर होणारा भयंकर परिणाम तिने समप्रमाण दाखवून दिलेला आहे. हुकूमशहा हिटलरने लाखो ज्यूंचा अनन्वित छळ करून त्यांना मृत्युदंड दिला होता,हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण इतरांना छळणाऱ्या त्या क्रूरकर्मा हिटलरचे स्वतःचे लहानपण आत्यंतिक छळात गेलेले होते हे फारच कमी लोकांना माहीत असेल. वडिलांच्या जाचाला कंटाळून त्याने घर सोडून जाण्याचाही प्रयत्न केला होता. हिटलरने बालवयात अनुभवलेली घरगुती हिंसा आणि त्याने सत्तेवर आल्यानंतर इतरांप्रति केलेली अमानुष हिंसा यांचा संबंध असल्याचे तिने तिच्या अभ्यासातून दाखवून दिलेले आहे. आपल्या विवेचनात यापुढेही जाऊन एलिस असे म्हणते की, आपल्याला प्रौढ वयात होणारे शाररीक ,मानसिक आजार, व्यसनाधीनता,शरीरात येणारे ट्यूमर, मूडस्विंगस, या सगळ्यांचे कारण आपल्या लहानपणी मिळालेल्या अनुभव शिदोरीवर आहे. तिच्यासारख्या अनेक अभ्यासकांच्या प्रयत्नांतूनच जगभरात मुलांवर होणाऱ्या सर्व प्रकारच्या घरगुती हिंसेचा आता विरोध होत आहे. अनेक देशांमध्ये मुले आपल्या पालकांविरुद्ध तक्रार करू शकतात. भारतातही Section 323 of the Indian Penal Code (IPC) for voluntarily causing hurt and Section 23 of the Child Protection Act 2010. नुसार मुलांना केलेल्या मारहाणीबद्दल शिक्षक व इतर व्यक्तींवर खटला भरला जाऊ शकतो. मिनिस्ट्री आॅफ चाइल्ड व वेल्फअरने सुचवलेल्या बाल न्याय कायद्यातील सुधारणेनुसार मुलांना शारीरिक व भावनिक इजा करणाऱ्या व्यक्तीला सात वर्षाची शिक्षा होऊ शकते आणि त्याची नोकरीही जाऊ शकते.जर मुलांना मारायचे नाही, त्यांना ओरडायचे नाही, मग मुलांना वाढवायचे तरी कस,े असा प्रश्न मग आपल्यासमोर पडतो. कारण यापेक्षा दुसरा मार्ग सोपा मार्ग आपल्याला माहीतच नसतो. आपल्या देशातही  बालहक्कावर, बालशिक्षणावर निगुतीने काम करणारी अनेक मंडळी आपल्या आसपास आहेत. राजीव तांबे हे असेच एक तज्ञ आहेत. या अवलिया माणसाने मुलांच्या भावविश्वाचा भाग बनून शिक्षणावर उल्लेखनीय काम केले आहे. मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहली आहेत. अक्कम बक्कम, गमंत गँग,गुलाबी सई,बंटू बडबडे,प्रेमळ भूत अशी गमतीशीर नावे आहेत पाहा त्यांनी लिहलेल्या पुस्तकांची. छोट्यांसाठी अनेक सर्जनशील चर्चासत्रे भरविली आहेत.सोपे सोपे प्रयोग करून मुलांना अभ्यासात गोडी लावण्याचा प्रयत्न केला आहे. पालकांचे प्रबोधन करून मुलांचे व त्यांचे नाते उबदार करण्यासाठी व्याख्याने दिली आहेत.मुलांना वाढवायचे कसे याचे उत्तर जर असे शोधले तर मिळेलही, पण सर्वात आधी पालकत्वाचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे. पालकत्व म्हणजे आपल्या मुलांवर अधिकार गाजवणं, त्यांना रागावणं, मारणं, त्यांचा अपमान करणं, सतत मागे लागणं, चारचौघांदेखत त्यांची लाज काढणं, त्यांना धमक्या देणं, सतत आज्ञा करणं, खोचक प्रश्न विचारणं, अविश्वास दाखवणं, शिक्षा करणं, अबोला धरणं, उपहास करणं, टोमणे मारणं, नव्हे. तर पालकत्व म्हणजे हे सगळे टाळून मुलांना एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून दर्जा देणे.मुलांवर प्रेम करा हे आपल्याला माहीत असतं, पण त्यांना सन्मानानं वागवा हे आपल्याला शिकून घ्यावं लागतं आणि म्हणूनच Paulo Pinheiro, (2007, UN General Assembly) यांनी कळकळीने सांगितलेय  Children are sick of being called ‘the future’. They want to enjoy their childhoods, free of violence,now. मुलांना नुसतेच उद्याचे आपले भविष्य समजू नका तर त्यांना वर्तमानाचा निर्भळ नितळ आनंद आजच, आताच लाभू द्या.(लेखात व्यक्त झालेली मते ही लेखिकेची व्यक्तिगत मते आहेत.)
 

बातम्या आणखी आहेत...