आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदे : काँग्रेस मजबूतच, आर्थिक दहशतवादातून भाजपची वाढ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर : 'ईडी, सीबीआय अशा संस्थांचा वापर करून काँग्रेस व मित्रपक्षांच्या नेत्यांवर दडपण आणलं जातंय. साखर कारखान्यांना मदत करण्याऐवजी त्यांना अडचणीत आणले जात आहे. त्यापासून बचावासाठी दोन्ही काँग्रेसचे काही नेते भाजप-शिवसेनेत जात आहेत. हा भाजपचा एक प्रकारे आर्थिक दहशतवादच आहे. त्यातून ते पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांचा हा फुगा कधी फुटेल सांगता येणार नाही. यापूर्वीही काँग्रेस विरोधी पक्षात होती. आज समन्वयाचा अभाव वाटत असला तरीही काँग्रेस पक्ष समर्थपणे सत्तेत आलेला दिसेल,' असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 'दिव्य मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत केला.

प्रश्न : २०१४ ला केंद्र आणि राज्यातही भाजपचं सरकार आलं. २०१९ ला केंद्रात पुन्हा भाजपच, मग विधानसभेच्या निवडणुकांत काय हाेईल?
शिंदे : भारतीय जनता पक्ष केवळ आश्वासने देताना दिसताे. शेतकरी अडचणीत आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न मोठा आहे. त्यांनी अनेक आश्वासने दिली, पण ती पूर्ण केली जात नाहीत. सोलापूरचेच पाहा... चादरीपासून सैन्याला ड्रेस बनवण्यासह अनेक आश्वासने दिली, ती पूर्ण झाली नाहीत. भाजप केवळ भावनात्मक मुद्द्यांवर निवडणुका लढवते. यापूर्वी त्यांनी बालाकोट, पठाणकोट हल्ला, काश्मीर व पाकिस्तान मुद्दे घेऊनच प्रचार केला. ते लोकांना काही तरी भीती घालण्याचा प्रयत्न करतात आणि त्याआडून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता त्यांच्या हातात राममंदिराचा मुद्दा आहेच. ३७० कलमाच्या मुद्द्यावरच भाषणे चालू आहेत. जनतेला आता पुन्हा भावनेच्या आहारी आणण्याचे प्रयत्न होत आहेत. जनतेने आता तरी सावध झाले पाहिजे. आजवर त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भावनेच्या जोरावर जिंकल्या, पण देशातील परिस्थिती सध्या निराळी आहे. देशाची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. युवकांना रोजगार नाही. दुसरीकडे काेटींनी राेजगार कमी झाला. समाजात जाती-धर्माच्या बाबतीत अस्थिर वातावरण आहे. त्यामुळे सर्वधर्मसमभाव जपण्यासाठी लोकांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसाेबत राहिले पाहिजे.

प्रश्न : सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष मोदींविरुद्ध बोलतात, मग निवडणुकीत का एकत्र येत नाहीत?
शिंदे : धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येत नाहीत हे खरे आहे, एकत्र यायला पाहिजेत. पण जागावाटपावरून शंका-कुशंका निर्माण होतात. सुदैवाने महाराष्ट्रात सध्या काही प्रमाणात चांगली आघाडी झाली आहे. त्याचा चांगला परिणामही दिसेल.

प्रश्न : काँग्रेसला सत्ता आणि संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असतानाही आज पक्षाचे संघटन विस्कळीत का?
शिंदे : पक्षात समन्वय दिसत नसल्याचे चित्र आहे, पण समन्वय होईल. कार्यकर्ते मनातील भावना बोलून दाखवण्याचा प्रयत्न करतात. आत्मचिंतन करताना दिसतात. सध्या दोन राज्यांत निवडणुका आहेत. या दाेन्ही ठिकाणी कार्यकर्ते सक्रिय झाले अाहेत. काही नेते दुसऱ्या पक्षात गेलेत, पण असे प्रकार यापूर्वीही झालेत. १९८०, १९८९ व १९९१ मध्ये असे घडले होते. त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेस पुन्हा समर्थपणे उभी राहिली. सोनिया गांधी यांच्यावर सातत्याने टीका-टिप्पणी केली गेली, पण देशातील जनतेने त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसला दहा वर्षे सत्ता दिली. सोनिया गांधी यांनीही समर्थपणे कारभार बघितला. त्या वेळी विरोधी पक्षांनी सोनिया, राजीव गांधी यांच्याबद्दल काहूर माजवले होते. आज राहुल गांधींबद्दल बोलतात, पूर्वी इंदिरा गांधी यांना 'गूंगी गुडिया' म्हटले होते. पण अशा सगळ्या परिस्थितीतूनही काँग्रेस उभी राहिली, आजही त्याच परिस्थितीतून जात आहाेत, नक्कीच समर्थपणे उभे राहू याची खात्री आहे.

प्रश्न : गेल्या पाच वर्षांत राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार कसा होता?
शिंदे : २०१४ च्या सुरुवातीला वाटले होते, राज्यात विकासाची भाषा केली, पण पुढे कुठे काहीच केले नाही. जशी विकासाची भाषा केली तसे काम झाले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. युवकांचे प्रश्न तसेच आहेत. बेरोजगारी वाढत चालली आहे. मोठी आश्वासने दिली. पण मुंबईत शिवस्मारकाचे काम पूर्ण करू शकले नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारकही झाले नाही. राज्यात गुन्हेगारी वाढलेली आहे. यापूर्वी राज्यात इतकी गुन्हेगारी कधी वाढली नव्हती.

प्रश्न : निवडणुकीनंतर काँग्रेसची स्थिती काय?
शिंदे : आमची परिस्थिती सुधारलेली असेल. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मिळून आम्ही नक्कीच सरकार स्थापन करू, अशी स्थिती आहे. बाकीचे पक्ष जात, धर्मावर निवडणुकीत उतरले आहेत. आम्ही राष्ट्रीय विचारावर, सर्वधर्मसमभावाची भूमिका घेऊन उतरलो आहाेत. शेतकरी, दलित, विद्यार्थी, तरुण, महिला यांचे प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीत जनतेकडे निघालो आहोत. त्यामुळे वरवर अशी भाजप- सेनेची वाढ होताना दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र काँग्रेस आघाडी मजबूत झालेली निवडणुकीनंतर दिसेल.


भाजपचा 'काँग्रेसमुक्त भारत'चा फुगा फुटेल... 
प्रश्न : 'काँग्रेसमुक्त भारत'च्या प्रयत्नाला काँग्रेस कसे आव्हान दे
णार?
शिंदे : सध्या देशात आणि राज्यातही काँग्रेस व मित्रपक्षाच्या नेत्यांवर आर्थिक दडपण आणले जातेय. ईडी, सीबीआय यांसारख्या संघटनांकडून गुन्हे दाखल केले जात आहेत. साखर कारखाने वाचवण्यासाठी नेते, कारखानदार भाजपत जात आहेत. हा एक प्रकारे आर्थिक दहशतवादच आहे. त्या माध्यमातून भाजप वाढवण्याचे काम होत आहे. 'काँग्रेसमुक्त भारत'चा त्यांचा फुगा कधी फुटेल सांगता येत नाही. त्यामुळे हा प्रयत्न यशस्वी होणार नाहीच.