आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीत दहशतवाद्यांविरोधात कारवाईचे मॉकड्रील, मंदिर परिसरात रात्री ११ ते ३ पर्यंत सराव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवनाथ दिघे

शिर्डी - २६/११ ची घटना देशाच्या नजरेत असतानाच सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या व सर्वाधिक गर्दी असलेल्या शिर्डीत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने रंगीत तालीम केली. शिर्डीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याचा सुगावा लागताच राष्ट्रीय सुरक्षा पथक एमआय १७ या अत्याधुनिक लष्कराचे हेलिकॉप्टर शिर्डीत दाखल झाले अन‌् काही मिनिटांच्या आत अतिरेकी लपलेल्या इमारतीच्या छतावर कमांडो उतरले. इमारतीच्या टेरेसवर अतिरेकी लपून बसलेल्या ठिकाणी जात अतिरेक्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, एक अतिरेकी आत्मघाती हल्ल्याच्या तयारीत असतानाच त्याच्यावरही एनएसजीच्या कमांडाेंनी झडप घालत त्याला यमसदनी पाठवले. शिर्डीत लष्कराचे हेलिकॉप्टर येते आणि बॉम्ब फुटल्याचा मोठा आवाज येतो. यामुळे काही काळ शिर्डी परिसरात घबराट निर्माण झाली. काही वेळातच हा दहशतवादी हल्ला नसून एनएसजीने संकट व्यवस्थापनाचा सराव केला असल्याचे समोर येताच स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

शिर्डीसारख्या आंतरराष्ट्रीय व गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने शिर्डीत दोन दिवस संकट व्यवस्थापनाचा सराव करण्यासाठी मॉकड्रीलचे आयोजन केले अाहे. त्याची सोमवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान सरावाला सुरुवात झाली. सर्वाधिक भाविक भेट देणारे ठिकाण म्हणून शिर्डी समोर आले. नुकतेच वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड््स ध्येही शिर्डीची नोंद घेण्यात आली आहे.

सोमवारी रमंदिर परिसरात संकट व्यवस्थापनाचा सराव करण्यात आला. अचानक दहशतवादी हल्ला झाला, भाविकांना दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले तर कसा प्रतिकार करावयाचा याबाबत हा सराव करण्यात आला. या मोहिमेत मुंबई एनएसजीचे १२५ जवान सहभागी झाले आहेत. त्यांच्यासह श्वानपथक, बॉम्बनाशक पथकासह डॉक्टर्सचा सहभाग आहे. यामुळे संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर येऊन त्या दुरुस्त करता येऊ शकतील, असाही उद्देश आहे. नागरिकांना व भाविकांना या मोहिमेचा त्रास होऊ नये म्हणून एनएसजी काळजी घेत आहे. कुणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. शिर्डी विमानतळावरही मंगळवारी असाच सराव हाेणार असल्याचेही सांगण्यात आले.

शिर्डीतील या व्यवस्थापन सरावासाठी राष्ट्रीय सुरक्षा पथकाने महाराष्ट्र पोलिस व साईबाबा संस्थानला आगाऊ कल्पना दिली होती. मात्र, त्याची कोणतीही वाच्यता होणार नाही, याची काळजी घेतानाच नागरिक व भाविकांमध्ये घबराट होणार नाही याचीही काळजी घेतली गेली. एनएसजीच्या या ऑपरेशनसाठी १२५ कमांडोज, एक एमआय १७ हे अत्याधुनिक  हेलिकॉप्टर, डॉग स्क्वॉड, डॉक्टरांची टीम, बॉम्ब नष्ट करणारे पथक, बॉम्बशोधक पथक तैनात करण्यात आले होते.मंदिर परिसरात रात्री ११ ते ३ पर्यंत सराव  


भाविकांची कोणतीही गैरसोय व घबराटीचे वातावरण होऊ नये म्हणून साईबाबा मंदिर परिसरात मंदिर बंद झाल्यानंतर रात्री ११ वाजता सुरू केलेले आपत्ती व्यवस्थापन ऑपरेशन मध्यरात्रीपर्यंत सुरू होते. एनएसजीचे अधिकारी व १०० कमांडो यात सहभागी होऊन त्यांनी चित्तथरारक सराव केला. एनएसजीच्या या ऑपरेशनमुळे साई मंदिरातील सुरक्षेबाबतच्या त्रुटी समोर येण्यास मदत होणार आहे.