आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साई मंदिरामुळे शिर्डीमध्ये २५ हजार जणांना राेजगार, वर्षाला अडीच-तीन हजार कोटींची होते उलाढाल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्वच्छतेसाठी शिर्डी नगरपंचायतीला संस्थानकडून दरमहा ४२.५१ लाख रुपयांचा निधी दिला जाताे
  • २०१९-२० या वर्षी २ लाख रुग्णांनी सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलचा, तर ४ लाख लाेकांनी साईनाथ हॉस्पिटलमधून उपचार घेतले

प्रवीण ब्रह्मपूरकर

औरंगाबाद - ‘सबका मालिका एक’ असा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांचे समाधिस्थळ असलेले नगर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र शिर्डी हे जगभर प्रसिद्ध आहे. वर्षातील बाराही महिने इथे भाविकांची अलाेट गर्दी असते. गेल्या वर्षी तब्बल ५७ लाख लाेकांनी साईंचे दर्शन घेतल्याची ट्रस्टकडे नाेंद आहे. राेजच्या भाविकांची संख्या ४० ते ५० हजारांच्या घरात असते. धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून या शहरात व परिसरात सुमारे २५ हजारहून अधिक लाेकांना राेजगार प्राप्त झाल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतून समाेर आले आहे. एकट्या शिर्डी संस्थानमध्ये कायमस्वरूपी व कंत्राटी असे सहा हजार कर्मचारी आहेत. त्यांच्या वेतनावर वार्षिक शंभर कोटी रुपयांचा खर्च हाेताे. शहरात लाॅज, हाॅटेल, रेस्टाॅरंटची संख्या ३ हजारांपेक्षा जास्त आहे. तिथे १५ हजारांहून अधिक लाेक काम करतात. धार्मिक वस्तूंची दुकाने व पर्यटनस्थळाशी संबंधित व्यवसायातून वर्षाकाठी अडीच ते ३ हजार कोटींची उलाढाल होते. शिर्डीत दररोज ४५ ते ५० हजार भाविकांना प्रसादालयाच्या माध्यमातून माेफत जेवण दिले जाते. ट्रस्टच्या सर्व भक्त निवास व धर्मशाळेत २४०० खाेल्यांच्या माध्यमातून भक्तांच्या निवासाची व्यवस्था केली जाते, अशी माहिती शिर्डी संस्थानचे माजी अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. स्वच्छतेबाबत गौरव

स्वच्छतेसाठी शिर्डी नगरपंचायतीला संस्थानकडून दरमहा ४२.५१ लाख रुपयांचा निधी दिला जाताे. या माध्यमातून शहरात स्वच्छतेची कामे केली जातात. स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात २०१८ मध्ये शिर्डी नगरपंचायतीला देशात तिसरा व राज्यात दुसरा क्रमांक व १५ कोटींचे बक्षीस मिळाले होते. आरोग्यसेवेचा लाभ

शिर्डीत संस्थानची २ रुग्णालये आहेत. २०१९-२० या वर्षी २ लाख रुग्णांनी सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटलचा, तर ४ लाख लाेकांनी साईनाथ हॉस्पिटलमधून उपचार घेतले. यात २६ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या.