आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांनी साईबाबांच्या जन्मस्थळावरून केलेल्या उल्लेखामुळे शिर्डीकर संतप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी : साईबाबांनी आपल्या संपूर्ण हयातीत जात, धर्म, गाव याची कुठेही वाच्यता केली नाही. साईचरित्रातही त्याबाबत कोठेही उल्लेख नाही. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे साईबाबांच्या पाथरी येथील जन्मस्थळाच्या विकासासाठी आराखडा तयार असून तीर्थक्षेत्र निर्माण करणार असल्याची घोषणा केल्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर साईभक्तांनी संताप व्यक्त केला आहे.

साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती शिर्डीला आले असता त्यांच्या भाषणातही साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख झाल्यावर उपस्थित असलेल्या साईभक्तांनी मोठा गदारोळ करून राष्ट्रपतींच्या भाषणातील साईंच्या जन्मस्थळाच्या उल्लेखाला आक्षेप घेतला होता. त्यानंतर शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. त्यानंतर हा विषय संपुष्टात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलताना त्यांनी साईबाबांचे जन्मगाव पाथरी असा उल्लेख करून पाथरीच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर झाला असून लवकरच भूमिपूजन करणार असल्याची घोषणा केल्यावर शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. साईबाबांनी जगाला सर्वधर्म समभावाची शिकवण देऊन श्रध्दा आणि सबुरी हा मंत्र दिला. आयुष्यभर पडक्या मशिदीत राहून दीनदुबळ्यांची सेवा केली. साईबाबा कोणत्या जातीचे आहेत, ते कोठून आले याबाबत साईबाबांनी आपल्या हयातीत कोणाला सांगितले नाही. जे साईबाबांना मान्य नव्हते त्यावर चर्चाच नको हीच भूमिका आजवर साईभक्तांची राहिलेली आहे. बाबांविषयी अधिकृत माहिती साईसतचरित्रातच आहे. मात्र, मुख्यमंत्री साईभक्त असतानाही त्यांनी साईबाबांच्या जन्मस्थळाचा उल्लेख करून परत नव्या वादाला जन्म घातल्याने साईभक्तांच्या संघर्षाचा सामना मुख्यमंत्र्यांना करावा लागेल.

पाथरीच्या विकासाबाबत आमची हरकत नाही, साईंचे नाव नकाे

पाथरीच्या विकासाला कितीही मदत करा त्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र, पाथरी या गावाचा साईबाबांचे जन्मस्थान असा उल्लेख करण्याला साईभक्त आणि शिर्डीकरांचा आक्षेप आहे. साईबाबांनी आपल्या जन्म, गाव, पंथ याबद्दल कधीच कोणाला सांगितले नाही. अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक साईबाबांच्याच विचाराला नख लावण्याचे काम केले जात आहे. कैलासबापू कोते, माजी विश्वस्त ,साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था ,शिर्डी

साई सच्चरित्रात जन्माचा उल्लेख नाही

साईबाबांबद्दल अधिकृत पुरावा म्हणून साई सच्चरित्रात हेच आहे. साई सच्चरित्रात कुठेही साईबाबांच्या जन्म व जन्मस्थळाचा उल्लेख नाही. ज्या बाबी ज्ञात नाहीत त्या अज्ञात आहेत, अधिकृत बोलणे कठीण आहे. डॉ. सुरेश हावरे अध्यक्ष,श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी
 

बातम्या आणखी आहेत...