आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वस्थ पण शांत ज्वालामुखी : एमी हरझॉग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीच्या नात्यावर अनेक सिनेमे, नाटकं, कादंबऱ्या आतापर्यंत आल्यात. पण या कळीच्या मुद्द्याला थेट तळापर्यंत हात कुणी घातला नाही. एमीचं बेलविल्ले हे नाटक या गूढ गाभाऱ्याची सफर घडवतं.
 
आजूबाजूला खूप काही घडतंय. खूप घुसमट आहे. प्रचंड गुदमरलेपण आहे, पण तरीसुद्धा याचे अपेक्षित प्रतिबिंब समकालीन नाटकात पडताना दिसत नाही. का? आमची प्रतिभा या समस्या आयडेंटिफाय करू शकत नाही की आम्ही ही दृष्टीच गमावून बसलोय? गरज आहे ती वर्तमानाचेच उत्खनन करणाऱ्या तेंडुलकरी शैलीची. ही शैली जोपर्यंत नवीन नाटककार पुनरुज्जीवित करणार नाहीत तोपर्यंत आम्हाला जुन्याच नाटकांचे अभिनव प्रयोग बघून, अतिसवंग व्यावसायिक फार्स बघून आपली भूक भागवावी लागेल. 

तेंडुलकरांची तीव्रतेने आठवण येण्याचे कारण म्हणजे शैली, भोवताल आणि व्यक्त होण्याची पद्धत जरी भिन्न असली तरी तेंडुलकरांच्या दृष्टीचे प्रचंड साम्य असलेली अमेरिकन नाटककार एमी. शांत प्रसंग रचना, साधे संवाद पण प्रचंड अस्वस्थ करणारी धग, असा काहीसा नाट्यानुभव देणारी नाटककार म्हणजे एमी हरझॉग. 

येल स्कूल ऑफ ड्रामामधून पदव्युत्तर पदविका पूर्ण केल्यानंतर एमीचे पहिले नाटक ऑफ ब्रॉडवेवर आले, आफ्टर द रिव्होल्युशननंतर तिने ग्रेट गॉड प्लॅन, ४००० माइल्स, बेलविल्ले आणि मेरी जेन ही एकाहून एक सर्रास नाटकं लिहिली. ऍनी कौफमन या दिग्दर्शिकेच्या कार्याचा आढावा घेताना आपण एमीच्या मेरी जेनचाच आधार घेतला होता. एमीचे प्रत्येकच नाटक अस्वस्थ करायला लावणारे आहे. 

येल रेपर्टरी थिएटरमध्ये दिग्दर्शिका अॅनी कौफमनने नोव्हेंबर २०११ मध्ये ‘बेलविल्ले’ रंगमंचावर आणले. त्यानंतर आजतागायत युरोप, अमेरिकेत या नाटकाचे अनेक प्रयोग झाले. अॅनी आणि एमी या जोडगोळीच्या या नाटकालासुद्धा अनेक पुरस्कार प्राप्त झाले. 

आपल्या पती किंवा पत्नीवर आपण किती विश्वास ठेवतो किंवा किती विश्वास ठेऊ शकतो? पूर्ण प्रामाणिकपणे या प्रश्नांचे उत्तर द्यायचे ठरवले, प्रयत्न केला तरी एका फार मोठ्या अस्वस्थतेला आपल्याला सामोरं जावं लागेल. एमीचं बेलविल्ले हे नाटक या गूढ गाभाऱ्याची सफर घडवते. प्रत्येक नातं सहसा फार आल्हाददायक, सुखी वाटत असलं तरी प्रत्येक नात्यात ‘खोटेपणाचं’ अस्तित्व असतंच. किंबहुना ते असत्य दडवता येईल एवढी स्पेस प्रत्येक नात्यात उपलब्ध असतेच. आणि या एका बाबतीत स्त्री-पुरुष समानता असते. 

बेलविल्ले अॅबी आणि झॅक या पॅरिसमध्ये राहणाऱ्या अमेरिकन जोडप्याची गोष्ट आहे. अॅबी एका दिवशी अचानक दुपारीच आपल्या घरी येते. झॅक तेव्हा आपल्या क्लिनिकमध्ये काम करत असावा अशी तिची अपेक्षा असते. पण घरी आल्यावर तिला वेगळंच चित्र दिसत. झॅक तेव्हा कम्प्युटरवर पॉर्न बघत असतो. अॅबी किंचाळतेच, पण स्वतः ला सावरतेसुद्धा. पण आता मात्र तिच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं. आपला नवरा एक धोकेबाज, पर्व्हर्ट आहे की तो केवळ त्या वेळेचा, तंत्रज्ञानाचा क्षणिक दुरुपयोग करत होता? या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं की आपली प्रतारणा झाली म्हणून रणकंदन माजवावं? 

नात्याची घट्ट वीण उकलली की त्याच्या पिळातून अनेक सत्य, असत्यं बाहेर पडू लागतात आणि ते प्रत्येक श्वापद काही  मूलभूत प्रश्न होऊन आपल्या समोर उभे राहातात. या कसोटीवर अर्थातच कोणतंच नातं टिकू शकत नाही.  मनाला खोलवर भिडणारे, सत्याच्या कसोटीवर चपखल उतरणारे वास्तववादी सिद्धान्त हि ३४ वर्षांची नाटककार सहज साध्या भाषेत आपल्या समोर मांडते. किरकोळ वाटणाऱ्या घटनेपासून सुरू झालेले हे नाटक नात्यांच्या न उलगडलेल्या कोपऱ्यांना, अडगळींना चव्हाट्यावर मांडते. आणि थरकाप उडवणारे सायकॉलॉजिकल थ्रिलर म्हणून संपते. म्हणूनच टाइम मॅगझिनमध्ये या नाटकाचा आणि एमीचा ‘Masterly... Among the new crop of young American playwrights, Herzog is in a class by herself.’ अशा शब्दांत गौरव होतो.
 

बातम्या आणखी आहेत...