आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावित्रीची आफ्रिकन लेक, अॅमा अता ऐदू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचितांच्या हक्कासाठी लढताना आजोबांना आलेलं हौतात्म्य हा तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. जाणीवा बळकट करणाऱ्या या प्रसंगातून तावून सुलाखून निघालेली नाटककार म्हणजे अॅमा अता ऐदू...

 

आफ्रिका, असा देश ज्याने मोहनदासमधील महात्मा गांधींना जन्म दिला, जिथल्या गुलामांच्या वेदनेतून खोल जखम मानवी इतिहासात कुठेच सापडत नाही, असा देश ज्याने प्रत्येक यशस्वी लेखकी, दिग्दर्शक, नाटककाराला भुरळ घातली. अशा देशात रंगभूमीची काय परंपरा असेल? जिथे मूठभर लोक माणसाला माणसाप्रमाणे जगू देत नव्हते, तिथे स्त्रीची काय अवस्था असेल? उत्तम कलाकृती निर्माण होण्यासाठी जी भूमी लागते ती तर तिथे आहे. पण त्या भूमीला सृजनासाठी जी संस्कृती आणि परंपरेची मशागत लागते ती तिथे उपलब्ध होती का? जागतिक रंगभूमी इतिहासातल्या  प्रमाण पुस्तकातही आफ्रिकेचा फार उल्लेख सापडत नाही. अॅफ्रो अमेरिकन या कि वर्ड ला सर्च करून काही धागे हाताशी येतात आणि एक नाव पुढे येतं अॅमा अता ऐदू. 


अॅमाचा जन्म २३ मार्च १९४२ ला घाना प्रांतात झाला. घर काम करणारे आईवडील. परिस्थिती बेताची. लेखक, नाटककार व्हावं अशी पार्श्वभूमी नाही. पण स्फोटक संवेदनशीलता हृदयात साठवणारी एक जबरदस्त घटना अॅमाच्या आयुष्यात घडली होती. आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तसं आफ्रिकन देशांना मिळालं नव्हतं. तिथे निकलोनियलिझम चा उदय झाला होता. या अंतर्गत जमीनदार किंवा सशक्त समूहाला जमिनीचे हक्क दिलेजाऊ लागले होते. अर्थातच याला कष्टकऱ्यांचा विरोध होता. असा विरोध करत असतानाच अॅमाच्या आजोबांची निकालोनियलिस्ट कडून हत्या करण्यात आली.  


वंचितांच्या हक्कांसाठी लढताना तिच्या आजोबांना हौतात्म्य आलं होतं. ही वेदना अॅमाची जाणीव बळकट करत गेली. या घटनेमुळे ऐदूच्या आई वडिलांनी त्यांच्या गावात शाळा उघडली. शिक्षण नसणं हाच आपल्या मागासलेपणाचे कारण आहे, अशी त्यांची ठाम समजूत होती. या शापातून मुक्त व्हायचं असेल तर शिक्षणाला पर्याय नाही हे त्यांनी ऐदूच्या मनावर बिंबवलं. परिणाणी हायस्कूलला असतानाच अॅमानं लेखक व्हायचं ठरवल. घाना विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर तिने डिलेमा ऑफ अ घोस्ट हे नाटक १९६४ मध्ये लिहिलं आणि ती पहिली आफ्रिकन महिला नाटककार झाली. 


या नाटकाला अॅफ्रो अमेरिकन पार्श्वभूमी आहे. एका आफ्रिकन स्त्रीची अॅफ्रो अमेरिकन कुटुंबात होणारी कुचंबणा याचं अत्यंत संवेदनशील चित्रण या नाटकात आहे. जगभरात या नाटकाचे फार प्रयोग झाले नाहीत. पण या नाटकामुळे अॅमाचे अमेरिका आणि जगात सन्मान झाले. लेखनाबरोबर ती समाजकार्यातसुद्धा सक्रिय होती. याची फलश्रुती म्हणून तिच्या आयुष्यात अजून एक घटना घडली. तिला १९८२ मध्ये शिक्षण मंत्री म्हणून नियुक्त केलं गेलं. पण राजकीय महत्त्वाकांक्षा म्हणून पद मिळवणं आणि समाजासाठी एखादं पद स्वीकारणं यात फरक असतो. अॅमाची संवेदनशीलता तिला अस्वस्थ करत होती. अठरा महिन्यांनंतर तिने राजीनामापत्र लिहिलं. त्याचा आशय होता, “आफ्रिकेतील वंचितांपर्यंत सामान पातळीने शिक्षण पोहोचवू शकत नसल्यामुळे मी या पदाचा राजीनामा देत आहे. पुढे अॅमाने विपुल लेखन केले. Our Sister Killjoy ही कादंबरी, Anowa हे नाटक, Someone Talking to Sometime, Birds and Other Poems, An Angry Letter in January हे  काव्यसंग्रह आहेत. The Art of Ama- ata या  Yaba Badoe या ब्रिटिश डाक्युमेंट्री मेकरने बनवलेल्या डॉक्युमेंट्रीमधून आपल्याला अॅमाचे व्यक्तिमत्त्व अनुभवता येते. अॅमाच्या अनेक व्हिडिओ लिंक्स आपल्याला यूट्यूबवर बघायला मिळतात. हे व्हिडिओ बघून एकच गोष्ट आपल्याला प्रकर्षाने जाणवते, मानवता आणि सकारात्मकता असेल तर अनेक वाईट घटना तुम्हाला नाउमेद करू शकत नाहीत, मोठ्यातली मोठी आमिषं तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकत नाहीत.

सावित्रीच्या या आफ्रिकन लेकीला फुल्यांच्या शिष्याचा मुजरा!

बातम्या आणखी आहेत...