मिस यू बीबी..

दिव्य मराठी

Apr 23,2019 12:04:00 AM IST


बर्गमनच्या चित्रपटाची नायिका अशी ज्यांची ओळख होती, ज्यांनी चित्रपटात काम केलं त्याच ताकदीनं रंगभूमीही गाजवली त्या बॉबी अँडरसन यांच्याबद्दल आजच्या भागात...


भारतातील नाट्य विभागांविषयी एका रंगकर्मीने मुद्दा उपस्थित केला होता. या नाट्य विभागांची ओळख सिनेमा, टीव्हीत गेलेल्या माजी विद्यार्थ्यांमुळे निर्माण झाली. पण व्रतस्थपणे नाटकातच राहिलेल्या कलावंतांना मात्र तशी ओळख, पाहिजे ते ग्लॅमर मिळाले नाही. अशी त्याची तक्रार होती. व्यावसायिक नाटकातसुद्धा टीव्ही, सिनेमातला चेहरा असेल तर बुकिंगची शाश्वती असते. त्यातही पुरुष नटांचीच सरशी आहे. पूर्वी नाटकात गाजलेले नट सिनेमात घेतले जायचे. आता प्रवास उलटा दिसतो. सिनेमा किंवा टीव्हीतून बाद झालेले नट रंगभूमीवरूनसुद्धा बाद होतात. हा ऊहापोह करण्याचं कारण म्हणजे बीबी अँडरसन. इंगमार बर्गमनच्या सेव्हन्थ सील, पर्सोना या गाजलेल्या चित्रपटांची नटी. १४ एप्रिलला वयाच्या ८३ व्या वर्षी तिचं निधन झालं. ज्या खुबीने ती चित्रपटात दिसली त्याच ताकदीने तिने रंगभूमीसुद्धा गाजवली.अगदी सत्तरी ओलांडूनसुद्धा ती रंगभूमीवर काम करत होती.


१९५५ मध्ये बीबी बर्गमनच्या स्माइल्स ऑफ समर नाइटमध्ये पहिल्यांदा दिसली. बीबीने बर्गमनच्या तेरा चित्रपटांत काम केले. त्या पूर्वी तिने स्वीडनच्या रॉयल ड्रॅमॅटिक थिएटर स्कूलमध्ये नाटकाचे शिक्षण घेतले. बर्गमनच्या चित्रपटांमुळे तिला अमेरिकन, इतर भाषांतील चित्रपट मिळाले, पण तिने थिएटर सोडले नाही.१९९० मध्ये ती नाट्य दिग्दर्शनाकडे वळली. बीबीच्या नाटकांपैकी फुल सर्कल (१९७३) आणि द नाइट अॅट द ट्रिबेड्स (१९७७) नाटकांचा विशेष उल्लेख होतो. दुसऱ्या महायुद्दात सर्वाधिक होरपळलेला देश अशीही स्विडनची ओळख आहे. कदाचित त्यामुळेच रोमँटिसिझमचा जराही प्रभाव स्वीडिश कलाकृतीवर जाणवत नाही. लेखक जेव्हा वास्तवाच्या अधिक जवळ जाऊन धाडसाने पात्र रंगवू लागतो तेव्हा ते पात्र रंगमंचावर उभं करण्यासाठी केवळ नटाचे नाट्यतंत्रच नाही तर त्याची माणूस म्हणून उंचीसुद्धा पणाला लागते. नाइट अॅट...मध्ये बीबीने जिवंत केलेली सिरीही अशीच आव्हानात्मक आहे. सिरी एक अभिनेत्री आहे, एका नाटककाराची बायको आहे. त्याला आपल्या बायकोचे लेस्बियनबरोबर पूर्वी संबंध होते असा संशय असतो. ती स्त्री जेव्हा सिरीबरोबर नाटकाच्या तालमी करू लागते, जेव्हा तालमीत काही विशिष्ट प्रसंग येतात तेव्हा नाटककाराचा संशय बळावतो. आपला नवरा आपले व्यक्तिगत आयुष्य चव्हाट्यावर आणून चर्चा करतो, नाटकाच्या माध्यमातून आपला सन्मान विकतो हे सहन न होऊन सिरी नाटककाराला घटस्फोट देते, असा नाटकाचा शेवट आहे. १८९० च्या पार्श्वभूमीवर असलेलं हे नाटक १९७७ मध्ये रंगमंचावर येतं. याचा संबंध सत्तरीत सुरू झालेल्या फेमिनिझमसोबत असतोच. २०१८ या बर्गमनच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्विडिश सरकारने त्याचे सिनेमे जगभरातल्या चित्रपट महोत्सवांना उपलब्ध करून दिले होते. त्यामुळे बीबी अँडर्सनला पुन्हा मोठ्या पडद्यावर बघता आलं. दुर्दैवाने तिने अभिनय, दिग्दर्शन केलेल्या नाटकांच्या चित्रफिती सहज उपलब्ध नाहीत. चित्रपट महोत्सवासारखी सोय नाटकांविषयी नाही. प्रा. वामन केंद्रेंनी भारतात आणलेलं थिएटर ऑलिम्पिक जर काही वर्ष आधी भारतात आलं असतं तर कदाचित बीबीचा अभिनय प्रत्यक्षात बघता आला असता. बीबी सिनेमात इतका उत्तम अभिनय करायची तर नाटकात काय कमाल करत असेल असं स्वप्नरंजन करण्याशिवाय आपल्या हाती काही उरत नाही.


शिव कदम

X