आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळची अकांचा आणि तिचा ‘कथा घेरा’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेपाळमध्ये थिएटर होत असेल का? रंगभूमीची परंपरा असेल का? असली तरी त्यात नेपाळी स्त्रीचे योगदान असेल का? या देशाविषयीचे आपले जे समज आहेत त्यानुसार उत्तर नाही असंच येतं. पण खरंच तिथे तशी परिस्थिती आहे का?

 

नेपाळला रंगभूमीची मोठी परंपरा आहे. पण नेपाळी भाषेत लेखक नसल्यामुळे नेपाळी थिएटरला डार्क पिरियडसुद्धा बघावा लागला. ही उणीव भरून काढली भानूभक्त नावाच्या लेखकाने. पण नेपाळमध्ये फेमिनिस्ट थिएटरचं अस्तित्व आहे का? या प्रश्नाचा शोध घेताना एक नाव धाडकन समोर येतं, अकांचा कर्की! 


अकांचाने बंगळुरूच्या क्राइस्ट कॉलेजमधून मानसशास्त्राची मास्टर डिग्री मिळवली. नेपाळमध्ये परतल्यावर केवळ कन्सल्टन्सीवर न थांबता ती थिएटर करू लागली. तिच्या अथक प्रयत्नांतून नवीन नाट्यसंस्था उदयाला आली, “कथा घेरा”. आधी सांगितल्याप्रमाणे नेपाळमध्ये तशी लेखकांची वानवाच. आपल्या भाषेत लिहिणारे नाटककार नसतील तर एक तर ती रंगभूमी जुन्याच संहितांवर अवलंबून राहते, पुढे सरकत नाही किंवा ती संहिता आणि संकल्पना आयात करू लागते किंवा थांबतेच. ही घुसमट रंगभूमीसाठी प्रचंड घातक आहे. मराठी रंगभूमीसुद्धा अशीच थांबल्यासारखी झालीय. एलकुंचवार, तेंडुलकर यांच्यानंतर काय? या प्रश्नाचं उत्तर आज तरी सापडत नाही. तर अशा स्थितीवर अकांचाने एक उपाय केला आणि त्यातूनच नेपाळमध्ये एक वेगळी परंपरा रंगभूमीवर निर्माण झाली. 


कथा घेराच्या सादरीकरणासाठी प्रेक्षक गोळा होतात आणि आपापले अनुभव मांडतात. त्यांचे त्यांचे अनुभव ऐकून परफॉर्मर्स तत्काळ सादरीकरणाची रूपरेषा ठरवतात आणि नाटक सुरू होतं. २०१७ मध्ये अकांचाने सुरू केलेलं कथा घेरा आज नेपाळमधील स्वयंपूर्ण नाट्य संस्था आहे. विशेष म्हणजे ही संस्था पूर्णपणे महिलाच सांभाळतात. त्यामुळे महिलांच्या समस्या, महिलांच्या गोष्टीवर कथा घेरा सत्याच्या तळाशी जाऊन शुद्ध आणि प्रामाणिक प्रकटीकरण करू शकतं. उदाहरण सांगायचं झालं तर जगभर धुमाकूळ घालणाऱ्या ‘व्हजायना मोनोलॉग’चे भारतातल्या कुठल्याही भाषेत जेवढे प्रयोग झाले नसतील त्यापेक्षा जास्त कथा घेराने केलेले आहेत. 
कथा घेरामध्ये गाजलेले अजून एक नाटक म्हणजे बर्नोर्ड स्लेडचे ‘सेम टाइम, नेक्स्ट इयर’ हे नाटक. बर्नोर्डने १९७५ मध्ये लिहिलेल्या या नाटकाचा प्लॉटच भन्नाट आहे. व्हिएतनाम युद्ध, हिप्पी चळवळीची पार्श्वभूमी आणि त्या पार्श्वभूमीवर चोरून अनैतिक संबंध सांभाळण्यासाठी एका कोझी रूममध्ये भेटणारं एक जोडपं. दोन अंक आणि सहा प्रसंगांत विभागलेले नाटक साधारण चोवीस वर्षांचा कालखंड दाखवते. 


या चोवीस वर्षांत डोरिस आणि जॉर्ज दरवर्षी एका तारखेला इथे भेटतात. डोरिस कॉलेज गर्ल ते बिझनेस वुमन असा प्रवास करते, तर जॉर्ज अकाउंटंटच राहतो. डोरिस आर्थिक प्रगती करते, तर जॉर्ज त्याच पातळीवर राहिलेला असला तरी माणूस म्हणून समृद्ध झालेला असतो. वर्षं लोटतात, स्थित्यंतरं होत जातात. त्याचा डोरिस आणि जॉर्जच्या नात्यावर काय परिणाम होतो, अशी या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे. 


एकाच ठिकाणी, केवळ दोन पात्रांत घडणारे नाटक, प्रेक्षकांच्या पचनी न पडणारी संकल्पना आणि तीसुद्धा सादर करायची नेपाळमध्ये. अशक्यप्राय वाटणारी ही गोष्ट. पण दिग्दर्शक चे शंकेर आणि जॉर्ज आणि डोरिसच्या भूमिकेत दिव्य देव आणि अकांचा कर्की हे आव्हान लीलया पेलतात. या नाटकाचा प्रयोग एवढा प्रभावी होतो की लोक अकांचा आणि देवला खरोखरचे प्रेमी समजू लागतात. व्यसनाची प्रचंड तलफ लागावी आणि ते पूर्ण केल्याशिवाय चैन पडू नये असे हे नाटक. या नाटकाचा तेवढाच प्रभावी प्रयोग नेपाळमध्ये होतो. एक मुलगी भारतात शिकून, भारतीय रंगभूमीचा संस्कार घेऊन आपल्या मायदेशी जाते आणि तिथली रंगभूमी जळमटं झटकून टाकते ही एक दखलपात्र गोष्ट आहे. मराठी रंगभूमीवरसुद्धा विजया मेहतांनी घडवलेल्या चमत्कारासारखे चमत्कार पुन्हा घडावेत ही अपेक्षा...

बातम्या आणखी आहेत...