आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इट्स ऑल नॉट राइट : लुसी किर्कवूड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या नागरिकांच्या मानवाधिकारासाठी जागरूक असलेल्या शासनकर्त्यांना विश्वात्मक करण्याचा प्रयत्न लुसी किर्कवूड करते, म्हणून ती कुठल्याही सीमांच्या पलीकडे जाऊन  लिहिणारी नाटककार ठरते.
 
प्रत्येक व्यक्ती तीन पातळ्यांवर जगत असतो. प्रोफेशनल, पर्सनल आणि प्रायव्हेट. जगणे आपल्याला काय म्हणून आणि  ओळखावे  तो त्या अपेक्षित भूमिकेला उत्तम वठवत असतो. आणि  आपल्या प्रायव्हेट डिझायर्स पूर्ण करण्यासाठी त्याची अगतिक धडपड सुरू असते. त्यामुळे वरवर सभ्य दिसणारा समाज आतल्या आत आसक्तींच्या चिखलात, गाळात तुडुंब लोळत असतो. त्यामुळे कितीही कठोर कायदे आले, शासक आले तरी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांची संख्या थोडीफार कमीजास्त होते, पण हे गुन्हे घडणं थांबत नाही. ही पिळवणूक थांबवायची असेल तर समाजाला अंतर्मुख व्हावं लागेल, त्याला लेखकांनी, कलावंतांनी अंतर्मुख व्हायला भाग पाडावं लागेल. ती ताकद एका लेखकात, नाटककारात नक्कीच असते असा विश्वास देणारी नाटककार म्हणजे लुसी किर्कवूड आणि तिचे सध्या गाजत असलेले ‘It Felt Empty When the Heart Went At First But It Is Alright Now’ असं भलं मोठं टायटल असलेलं नाटक.  

लुसी ब्रिटिश नाटककार आहे. एडिनबर्ग विद्यापीठातून तिने इंग्रजी साहित्याची पदवी प्राप्त केली आहे. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच ती इम्प्रोव्हर्ट्स या इम्प्रोव्हायजेशनल कॉमेडी ट्रूपची सदस्य होती. विद्यापीठाच्या थिएटर कंपनीसाठीसुद्धा ती लिहीत होती. 

आजही नाटक लिहिणे हा पूर्णवेळ व्यवसाय होऊ शकत नाही. त्यामुळेच कदाचित आपल्या देशात उत्तमोत्तम सिनेमे लिहिणारे नव्या दमाचे पटकथाकार निर्माण होत आहेत, पण नाटककारांची वानवा तीव्रतेने जाणवते. ब्रिटन आणि अमेरिकेत तरुण नाटककार निर्माण होण्याचे कारण तिथे नाटककारांसाठी वेगवेगळ्या ट्रूप्स आणि संस्थांकडे असलेली आर्थिक तरतूदसुद्धा असू शकते. 

नॅशनल स्टुडंट ड्रम फेस्टिव्हलमध्ये लुसीचे पहिले नाटक ग्रेडी हॉट पोटॅटो हे नाटक सादर झाले. यात तिने अभिनयही केला होता. त्यानंतर लुसीच्या गेरॉनीमो, कट, अनकट , गन्स अँड बटर अशा अनेक प्रयोगशील नाटकांची सादरीकरणं झाली. त्यानंतर लुसीने It Felt Empty When The Heart Went At First But It Is Alright Now हे नाटक लिहिलं.  हे नाटक डीजाना नावाच्या एका कॉल गर्लच्या जीवनावर बेतलंय. मूळ क्रोएशियाची असलेल्या डीजानाला तिचा प्रियकरच एका सेक्स रॅकेटमध्ये अडकवतो. नाटक सुरू होतं तेव्हा आपल्याला डीजानाची रूम दिसते. सुरुवातीला डीजाना एखादं पात्र असेल असं वाटतं, पण नंतर लक्षात येतं की ती रूममध्ये असलेल्या कुणाशी तरी बोलत असते. पण रूममध्ये तर ती एकटीच आहे. प्रेक्षकांच्या नंतर लक्षात येत की ती एका अदृश्य पात्राबरोबर बोलत आहे. आणि हे पात्र दुसरं-तिसरं कुणी नसून तिच्यासाठी आलेलं गिऱ्हाईक आहे.  काही आर्थिक मोबदल्यानंतर तिला या सगळ्यातून सुटका होण्याची अपेक्षा आहे. डीजाना आपली गोष्ट सांगू लागते. ती कुठेच मेलोड्रामाचा वापर करत नाही, आपली करुण कहाणी सांगत प्रेक्षकांना इमोशनल करत नाही. उलट तिचं बोलणं बिनधास्त, बोल्ड वाटतं. पण या सादरीकरणाबरोबरच समांतर चालणारं सबटेक्स्ट काळजाला चरे पाडू लागतं. बोलण्याच्या ओघात डीजाना त्या अदृश्य पात्राला नाटकाचं टायटलसुद्धा उलगडून सांगते. ती तिच्याकडे दडवून थेअवलेला एका सात वर्षाच्या मुलीचा फोटो बाहेर काढते. त्या मुलीचं हार्ट ट्रान्सप्लांट केलेलं आहे. डीजाना त्या मुलीचा एका पत्रकाराबरोबरचा प्रसंग सांगते. हार्ट ट्रान्सप्लांट झाल्यावर तो पत्रकार मुलीला हाऊ डज इट फील असं विचारतो , तेव्हा ती मुलगी उत्तर देते, It Felt Empty When the Heart Went At First But It Is Alright Now. आतापर्यंत उथळ आणि वेश्येच्या तथाकथित परिभाषेला साजेशी वाटणारी डीजाना भावुक होते. साध्या शब्दात त्या मुलीने डीजानाचे दुःख व्यक्त केलेले असते.  डीजानाची कहाणी संपत येते, सुटकेची तिच्या प्रियकराने दिलेली वेळ संपत येते. पण सुटका होत नाही, पोलिसांच्या टापांचा आवाज येतो. एका पक्ष्याची पिंजऱ्यातच सुटकेसाठीची धडपड सुरू होते. गिऱ्हाईक तृप्त होऊन परत जाते. पण डीजानाच्या जीवनाचं चक्र त्याच रुटीनने फिरत राहतं. आपल्या नागरिकांच्या मानवाधिकारासाठी जागरूक असलेल्या शासनकर्त्यांना विश्वात्मक करण्याचा प्रयत्न लुसी किर्कवूड करते, म्हणून ती कुठल्याही सीमांच्या पलीकडे जाऊन  लिहिणारी नाटककार ठरते.  

बातम्या आणखी आहेत...